घरदेश-विदेश...तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, राजनाथ सिंह यांचा चीन-पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा

…तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, राजनाथ सिंह यांचा चीन-पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा

Subscribe

नवी दिल्ली : भारत हा शांतताप्रिय देश असून त्याने कधीही दुसऱ्या देशाला दुखावण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु कुणी भारतातील शांतता आणि सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तानचे प्रत्यक्ष नाव न घेता दिला. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांनी हा इशारा दिला.

- Advertisement -

मारुती वीर जवान ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेनं आज (16 ऑक्टोबर 2022) आयोजित केलेल्या ‘शहीदों को सलाम’ या कार्यक्रमाला, संरक्षणमंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. ते म्हणाले की, सीमांवर बारीक नजर ठेवली जात आहे. देश सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. ज्याप्रकारे आपल्या क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्याचप्रकारे सशस्त्र दलांचे जवान आणि अधिकारी, प्रदेश, धर्म, जात आणि भाषा यांच्या पलिकडे जाऊन, मातृभूमीची निःस्वार्थपणे सेवा करतात आणि वेगवेगळ्या धोक्यांपासून लोकांचे रक्षण करतात, असे ते म्हणाले.

सशस्त्र दलांना स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे आणि इतर लष्करी सामग्रीने सुसज्ज करून देशाच्या सुरक्षायंत्रणेला बळ देणे हा सरकारचा अग्रक्रम आहे, यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. ‘मेड इन इंडिया’ युद्धनौका आणि इतर लष्करी साहित्याचा, भारतीय संरक्षण दलाच्या ताब्यात अंतर्भाव करणे, हे भारतीय संरक्षण दल संपूर्ण आत्मनिर्भर करण्याच्या संकल्पाचं प्रतिबिंब आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

आपल्या स्वातंत्र्यसैनिक आणि सैनिकांचे आदर्श आणि संकल्प पुढे नेणे, आपल्या राष्ट्राची एकता, एकात्मता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे आणि सामर्थ्यशाली, समृद्ध आणि स्वावलंबी नवभारत घडवण्यात योगदान देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे राजनाथ सिंह यांनी, राष्ट्रसेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर स्वातंत्र्यसैनिक आणि सशस्त्र दलाच्या जवानांना आदरांजली वाहताना सांगितले.

सशस्त्र दलातील जवान, अधिकारी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याचा तसेच बलिदानाचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मारुती वीर जवान ट्रस्टचे प्रतिनिधी, तसेच हुतात्मा वीरांचे कुटुंबीयही या कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -