Coronavirus: दारू नाही म्हणून पेंट प्यायले; तिघांचा मृत्यू

tamilnadu tasmac shop closed
प्रातिनिधिक छायाचित्र

तामिळनाडू राज्यातील चेंगलपट्टू या ठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे. येथील तिघांचा पेंट प्यायल्यामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे दारुची दुकाने बंद आहेत. काही तळीरामांना हे लॉकडाऊन असह्य झाले आहे. दारूला पर्याय म्हणून चेंगलपट्टू येथील तिघांनी पेंट प्यायले होते, मात्र त्यांचा दुर्दैवाने त्यानंतर मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार तिघेही दारूच्या आहारी गेलेले होते. लॉकडाऊनच्या काळात कुठेही दारू मिळत नसल्यामुळे त्यांनी नशेसाठी इतर पर्याय वापरण्याचा मनसुबा आखला. इरेला पेटलेल्या तिघांनीही पेंटमध्ये वर्निशचे मिश्रण करत ते प्राशन केले. रविवारी ही घटना घडली होती. शिवशंकर, प्रदीप आणि सिवारामन अशी या तीन तळीरामांची नावे आहेत. पेंट प्यायल्यानंतर तिघांचीही प्रकृती खालावली होती. उलट्या आणि इतर त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे एकामागून एक असा तिघांचाही मृत्यू झाला.

दि. २५ मार्च पासून अवघा देश लॉकडाऊन झालेला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. दारूच्या दुकानांवर देखील बंदी घातलेली आहे. तसेच तिथे होणारी गर्दी टाळण्याचे देखील पोलिसांमोर आव्हान राहिले असते. तामिळनाडू सरकारने मागच्याच आठवड्यात राज्याच्या नियंत्रणाखालील TASMAC दुकानेही बंद केली आहेत. १४ एप्रिलपर्यंत ही बंदी कामय राहणार आहे.

काही दिवसांपूर्वी नागपूरमध्येही असाच प्रकार घडला होता. एका रिक्षाचालकाने दारू मिळत नसल्यामुळे तणावाखाली येत स्वतःला जाळून घेतले होते. केरळमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. त्यामुळे तेथील मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर ज्यांना प्रिसक्रिप्शन लिहून देथील अशा लोकांना पोलिसांच्या परवानगीने घरपोच मद्य मिळेल, असा निर्णय घेतला होता. मात्र केरळच्या हायकोर्टाने नंतर या निर्णयाला स्थगिती दिली.