महंत नरेंद्र गिरी आत्महत्या प्रकरण : यूपी सरकारने केली CBI चौकशीची मागणी

संशयास्पद मृत्यूमागील कारण अद्यापही गुलदस्त्यात

Mahant Narendra Giri

अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूमागील कारणाचा अद्यापही उलगडा झालेला नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी उत्तर प्रदेश सरकारने केली आहे.

संशयास्पद मृत्यूमुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचे वाटत असले तरीही उत्तर प्रदेश पोलीस सर्व बाजूने तपास करताहेत. याचदरम्यान, महंत गिरी यांच्या मृत्यूमागे संपत्तीचा वाद असल्याचं कारण असून, त्यांना व्हिडीओच्या माध्यमातून कोणीतरी ब्लॅकमेल करत असल्याचेही समोर आले आहे.

महंत गिरी यांच्या खोलीत पोलिसांना सुसाईड नोट सापडली होती. त्यात शिष्य आनंद गिरी आपला मानसिक छळ करत असल्याचा आरोप करण्यात आलेला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून महंत गिरी आणि आनंद गिरी यांच्यात उत्तराधिकारीपदावरून वाद सुरू होता. यामुळे महंतांच्या मृत्यूचा थेट संबंध आनंद गिरी यांच्याशी असल्याचीही शक्यता व्यक्त केली जाते आहे. याचपार्श्वभूमीवर गिरी यांना अटक करण्यात आली.

दरम्यान मीडियाशी बोलताना आनंद गिरी यांनी आपल्याला याप्रकरणात अडकवण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. तसेच, महंत गिरी आत्महत्या करूच शकत नाहीत. संपत्तीसाठी त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोपही आनंद गिरी यांनी केला होता. तसेच, १२०० किलोमीटर दूर अंतरावरुन मी एखाद्याला आत्महत्येसाठी कसे उद्युक्त करू शकतो, असंही आनंद गिरी यांनी म्हटलं होतं.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. याच अनुषंगाने राज्य सरकारने हायकोर्टातही सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यामुळे आता केंद्र सरकार सीबीआय चौकशीबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.