म्हणून चीनी सैनिक लाऊडस्पीकरवर पंजाबी गाणी लावतात; १९६२ च्या युद्धातही हेच केले

india china faceoff
चीनी सैनिक भारतीय भाषेतील गाणी लावण्यामागे आहे मोठे कारस्थान

भारत-चीन सीमेवर लडाखच्या भूभागावरुन सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन्ही देश आपापल्या सैन्यशक्तीचे प्रदर्शन कसे करता येईल, याच विचारात गुंतलेले आहेत. भारत आणि चीनकडे जगातील इतर देशांचेही लक्ष लागलेले आहे. यादरम्यान काल चीनी सैनिक लडाख सीमेवर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर पंजाबी गाणी लावत असल्याची बातमी आली होती. चीनने ही आयडीया आताच नाही तर १९६२ च्या युद्धातही वापरली असल्याचे आता जाणकार सांगत आहेत. रणभूमीवर युद्ध सुरु होण्यापूर्वी चीन भारतीय सैनिकांच्या मनोबलावर आक्रमण करत असल्याचे यानिमित्ताने सांगण्यात येत आहे.

लडाखच्या सीमेवर असलेल्या फिंगर ४ या उंचावरील भागात भारतीय सैनिक चीनी सैनिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. भारतीय जवानांचे लक्ष विचलित करण्यासाठी चीनी सैनिकांकडून हे कृत्य केले जात आहे. १९६२ च्या युद्धातही अशाच प्रकारे बॉलिवूडमधील हिंदी गाणी वाजवून धमकी देण्याचा प्रकार चीनने केला होता. यातून आम्हाला हिंदी येते, असाही संदेश चीनी सैनिकांना द्यायचा असतो, असे सांगितले जात आहे.

भारतीय सैनिकांमधील मोठा घटक हा पंजाबी आणि हिंदी भाषिक पट्ट्यातला असतो. मोठ्या आवाजात गाणी वाजवून चीनी सैनिकांना फक्त भारतीय सैनिकांची एकाग्रता भंग करायची नसते तर आम्ही तुमच्या संस्कृतीशी, चित्रपटांशी किती समरस आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न चीनी सैनिक करत असतात. तसेच अशाप्रकारे गाणी लावून चीनला सीमेवर कोणताही तणाव नाही, हा गैरसमज भारतीय सैनिकांच्या माथी मारायचा असतो. दोन्ही देशांच्या राजधानीत जरी खळबळ माजलेली असली तरी लडाखच्या उंचीवर मात्र सगळे आलबेल आहे, असेही चीनींना दाखवायचे असते. त्यातून आपले सैनिक गाफील होतील, असा त्यांचा कयास असावा.

८ सप्टेंबर रोजी याच फिंगर ४ परिसरात भारत आणि चीनी सैनिक आमनेसामने आले होते. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार केला गेला. एप्रिल आणि मे पासून लडाखच्या पँगॉग तलावानजीक असलेल्या कोंगरुंग नाला, गोग्रा आणि फिंगर या भागात भारत-चीन सैनिकांमध्ये तणातणी सुरु आहे. त्यामुळेच भारतीय सरंक्षण विभागाने या भागात सैनिकांची कुमक वाढवली असून चीनच्या आगाऊपणाला आक्रमकपणे उत्तर देण्याचे नियोजन केले आहे.