कोरोना रुग्णाला भेटायला जाताना थांबवलं, म्हणून पत्नीवर पतीने झाडली गोळी!

wife stopped husband who were going to see corona positive patient in auraiya he shot her in noida
कोरोना रुग्णाला भेटायला जाताना थांबवलं, म्हणून पत्नीवर पतीने झाडली गोळी!

कोरोना या जीवघेण्या विषाणूपासून वाचण्यासाठी प्रत्येक कुटुंब खूप काळजी घेत आहे. बाहेरुन आलेल्या व्यक्तीला पूर्ण सॅनिटाईज केल्याशिवाय घरात घेतले जात नाही आहे. कोणाला भेटायचे झाले तरी कुटुंबातील सदस्य मास्क लाव, सोशल डिस्टन्सिंगचे पालन कर असा सल्ला नेहमी देत असतात. पण असा सल्ला दिल्याने काही वेळा महागात पडल्याच्या काही घडना समोर आल्या आहेत. दरम्यान कोरोनाबाधित रुग्णाला भेटण्यापासून रोखल्यामुळे पतीने रागाच्या भरात पत्नीवर गोळी झाडल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडा सेक्टर ११६ मध्ये ही घटना घडली आहे. परंतु या घटनेच्या वेळी घरात सात वर्षाच्या मुलाने वडिलांचा हात पकडल्यामुळे पत्नीचा जीव थोडक्यात बचावला आहे. या घटनेविरोधात पत्नीने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांच्या माहितीनुसार, सेक्टर ११६ मधील जाहिदाबाद गावाजवळ श्वेता यादव आपल्या कुटुंबासह राहते. श्वेताचा पती अमित यादव हा वकील आहे. दरम्यान त्याच्या नातेवाईकाला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता अमितने त्या कोरोनाबाधित नातेवाईकाला भेटायला औरेया येथे जात असल्याचे पत्नीला सांगितले. त्यावेळेस श्वेताने त्याला रोखले. तो कोरोनाबाधित असून त्याच्या भेटीनंतर सर्व कुटुंबाला कोरोनाची लागण होईल असे श्वेताने अमितला सांगितले. त्यामुळे अमितला राग आला आणि त्याने रागाच्या भरात श्वेतावर गोळी झाडली.

पण त्यावेळेस सात वर्षाच्या मुलाने अमितचा हात पकडला आणि त्यामुळे गोळी भिंतीवर लागली. श्वेताने आरडाओरडा केल्यानंतर अमित घटनास्थळावरुन पळून गेला. आता आरोपी पती अमितवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्याला अटक केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

माहितीनुसार, अमितने ज्या पिस्तुलने गोळी झाडली, त्या पिस्तुलचा परवाना आहे की, त्याने बेकायदेशीर रित्या खरेदी केली याची माहिती अद्याप पोलिसांना मिळू शकलेली नाही आहे. या घटनेबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.


हेही वाचा – १८८ दिवसांनंतर ताजमहाल पर्यटकांसाठी खुला, पहिला प्रवेश केला चीनच्या पर्यटकाने