घरदिवाळी 2022नक्षीदार रांगोळीने सजलेली अन् उटण्याच्या सुगंधात न्हायलेली दिवाळी

नक्षीदार रांगोळीने सजलेली अन् उटण्याच्या सुगंधात न्हायलेली दिवाळी

Subscribe

मुंबई : प्राचीन काळापासून भारतात सण-समारंभामध्ये, पूजेमध्ये, शुभकार्यात रांगोळी काढली जाते. पूर्वीच्या काळी स्त्रिया दररोज आपल्या घराबाहेरील अंगणामध्ये रांगोळी काढत असत. असं म्हणतात की, रांगोळीमुळे वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे हिंदू संस्कृतीमध्ये तिला मानाचे स्थान आहे. काही धर्म ग्रंथांनुसार स्त्रियांना अवगत असलेल्या चौसष्ट कलांमध्ये रांगोळीचा देखील समावेश आहे.

रांगोळी कशी तयार होते?
खरंतर, रांगोळी म्हणजे डोलोमाइट नावाच्या दगडापासून कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेला चूरा; जो आपण रांगोळी म्हणून वापरतो. मात्र, पूर्वी रांगोळी म्हणून कोरड्या पीठाचा वापर केला जायचा. तसेच रंग म्हणून हळद आणि कुंकू, गुलाल, अष्टगंधाचा वापर केला जायचा.

- Advertisement -

महाराष्ट्र आणि रांगोळीचं अनोख नातं
महाराष्ट्रातील संस्कृतीतही रांगोळीला खूप मोलाचे स्थान आहे. पूर्वी खेड्यांमध्ये अंगणात सडा-रांगोळी काढली जायची. मात्र, अलीकडच्या बदलत्या काळात दररोज नाही, पण प्रत्येक सण-समारंभामध्ये आणि कार्यक्रमामध्ये रांगोळी आवडीने काढली जाते. रांगोळीसाठी अनेकदा सार्वजनिक सणांचे औचित्य साधत मोठमोठ्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.

ठिपक्यांची रांगोळी ते संस्कारभारती
पूर्वी ठिपक्यांच्या रांगोळीची पद्घत होती. त्यानंतर हळूहळू बदलत्या काळानुसार रांगोळीच्या प्रकारांमध्ये अनेक बदल होऊ लागले. सुरुवातीला यामध्ये ठिपक्यांची रांगोळी होती, त्यानंतर चैत्रांगण रांगोळी, फुलांची रांगोळी, संस्कारभारती रांगोळी, पोट्रेट रांगोळी यांसारखे अनेक नवनवीन प्रकार आले आहेत.

- Advertisement -

रांगोळी आणि शुभचिन्ह


अनेकदा पूजेमध्ये रांगोळी काढताना हिंदू धर्मातील शुभचिन्हांचा देखील वापर केला जातो. यामध्ये कमळाचे फूल, लक्ष्मीची पावलं, गोपद्म, स्वास्तिक, शंख, कासव, सूर्य यांचा देखील वापर केला जातो. या प्रकारची रांगोळी प्रामुख्याने देवघरासमोर काढली जाते.

रांगोळीचे नवे स्वरुप
अलीकडे वेळेअभावी अनेकजण हातांनी रांगोळी काढण्याऐवजी छाप्यांच्या रांगोळीला पसंती देतात. त्यासाठी बाजारातील नानाविध प्रकारचे नक्षीदार छापे उपलब्ध आहेत. सध्या या छापांना खूप मागणी आहे. ठिपक्यांच्या रांगोळीच्या तुलनेत या छापांच्या मदतीने विविध आकाराची रांगोळी अतिशय कमी वेळेत काढली जाते. बाजारात हे छाप 10 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत मिळतात. आजकाल रांगोळीचा वापर देखील कमी केला जात आहे. त्याऐवजी तयार साचा वापरला जातो. यामध्ये विविध रंगाचे नक्षीदार साचे असतात आणि ते विविध आकारात उपलब्ध असून तेच दारासमोर किंवा गॅलेरीत मांडले जातात.

अभ्यंगस्नाला उटण्याचे महत्त्व


दिवाळीमध्ये फराळ, रांगोळी, रोषणाई, फटाके, दिवे यांच्यासोबतच उटण्याला देखील विशेष महत्त्वाचे स्थान आहे. दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा पूर्वीपासून सुरू आहे. असं म्हणतात की, दिवाळीच्या काळात हिवाळा ऋतू सुरू होतो. ज्यामुळे आपल्या शरीरावरील त्वचा हळूहळू कोरडी होते. त्यामुळे त्वचेला तजेलदार आणि तेजस्वी करण्यासाठी दिवाळीत उटणे लावले जाते. पूर्वीच्या काळी अनेकजण नियमीत उटण्याचा वापर करायचे. तसेच अलीकडे देखील अनेकजण त्वचा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी बाजारातील आयुर्वेदिक उटण्याचा वापर करतात.

पंचगव्याचा देखील वापर
गायीचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टी एकत्र करून पंचगव्य तयार केले जाते. अलीकडे पंचगव्य बाजारामध्ये विकतही मिळते. अनेकजण दिवाळीत पंचगव्याचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करतात. दिवाळीच्या पहाटे उटणे लावण्यापूर्वी संपूर्ण शरीराला पंचगव्य लावले जाते. असं म्हणतात की, पंचगव्य लावल्याने शरीराचे शुद्धीकरण होते आणि शरीराला ऊर्जा प्रदान करते, असे मानले जाते. तसेच यामध्ये अनेक औषधी गुण देखील असतात, ज्यामुळे अनेक रोगांपासून आपले रक्षण होते. पूर्वी देखील कोणतेही धार्मिक कार्य करण्यापूर्वी शरीर शुद्ध करण्यासाठी पंचगव्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जायचा.

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -