घरसंपादकीयअग्रलेखमृत्यूचा महामार्ग!

मृत्यूचा महामार्ग!

Subscribe

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत अपघाताचा ठपका महामार्ग प्राधिकरणावरच ठेवण्यात आला आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या त्रुटींवर पोलिसांनी बोट ठेवले आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत अपघाताचा ठपका महामार्ग प्राधिकरणावरच ठेवण्यात आला आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या त्रुटींवर पोलिसांनी बोट ठेवले आहे. हा महामार्ग तीन लेनचा आहे. पण, त्यातील दोनच लेन वापरात आहेत. तर चालकांना सावधानता बाळगण्यासाठी कोणतेही सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. दुभाजकावर आणि पुलावर पिवळे ब्लिंकर्सदेखील नाहीत. या कारणांस्तव मिस्त्रींचा मृत्यू झाला असल्याची शक्यता पोलिसांनी अहवालात व्यक्त केली आहे. मिस्त्री यांच्या गाडीत काही बिघाड आहे का, हे जर्मनीतील पथकाने तपासले असून, गाडी अगदी व्यवस्थित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मिस्त्री यांच्या अपघातानंतर लगेचच पुढच्या आठवड्यात महामार्गावरील आमगाव उड्डाणपूलावर एकाच ठिकाणी चोवीस तासात दोन अपघात होऊन सहा प्रवाशांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद हायवे मृत्यूचा सापळा बनला असल्याची गंभीर बाब अपघातांच्या मालिकांनंतर चव्हाट्यावर आली आहे. सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडिज कारला ४ सप्टेंबर रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटीजवळील सूर्या नदीच्या पुलावरील धोकादायक वळणावर अपघात झाला. त्यात ते जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एकाचा या भयावह अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गाची अत्यंत धोकादायक जीवघेणी अवस्था उजेडात आली आहे.

- Advertisement -

मिस्त्री यांचा ज्या चारोटीजवळील रस्त्यावर मृत्यू झाला, तो भाग अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जातो. अहमदाबादहून मुंबईला जात असताना सूर्या नदीच्या पुलापूर्वी धोकादायक वळण लागते. त्या वळणानंतर तीन लेनचा महामार्ग दोन लेनचा बनतो. हा पाचशे मीटरचा भाग मोठ्या प्रमाणावर अपघातांना निमंत्रण देतो, असे पोलीस अधिकार्‍यांचेच म्हणणे आहे. चिंचोटी आणि मनोरजवळच्या भागांतही अधूनमधून जीवघेणे अपघात घडले आहेत. या मार्गावरील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी सरकार ठोस पावले कधी उचलणार, यासाठी आणखी किती जणांच्या मृत्यूची वाट पाहणार, असे संतप्त सवाल वाहन चालक करीत आहेत.

मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर सारा देश हादरला होता. या अपघाताची चर्चा सुरू असतानाच सोळाव्या दिवशी अवघ्या चोवीस तासात एकाच ठिकाणी झालेल्या दोन अपघातात सहा जणांचे प्राण गेले. अपघातात मृत्युमुखी पडलेले सायरस मिस्त्रींसारखे प्रतिष्ठीत व्यक्ती नसल्याने त्यावर फारशी चर्चा झाली नाही. महामार्गावर आमगाव येथील उड्डाणपुलावर गेल्या सोमवारी रात्री मोटार आणि टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला होता. तर, दुसर्‍या दिवशी मंगळवारी दुपारी अन्य एक मोटार आणि टेम्पोमध्ये पुन्हा त्याचठिकाणी भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आणि एक गंभीर जखमी झाला.

- Advertisement -

याप्रकरणी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर देखरेख, दुरुस्ती करणारी कंत्राटदार कंपनी आर. के. जैन इन्फ्रा प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापक राम राठोड आणि संबंधित अधिकार्‍यांवर तलासरी पोलीस ठाण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूने मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे. या महामार्गाचा ठाण्यातील घोडबंदर ते पालघरच्या दापचारीपर्यंतचा शंभर किमीचा भाग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. मागील आठ महिन्यांत या भागात तब्बल २६२ मोठे अपघात घडले असून त्यात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९२ जण गंभीर जखमी झाले आहेत. चारोटीजवळच्या ‘ब्लॅक स्पॉट’वर २५ भीषण अपघातांमध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. ही अपघातांची मालिका रोखण्यासाठी सरकार गंभीर कधी बनणार, असा सवाल वाहन चालकांकडून केला जात आहे.

जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान महामार्गावर वसईच्या हद्दीतील चिंचोटीजवळ ३४ भीषण अपघात झाले आहेत. त्यात २५ जणांचा मृत्यू झाला. याच कालावधीत मनोरजवळ झालेल्या १० अपघातांत ११ जणांनी प्राण गमावले. महामार्गावर भरधाव ड्रायव्हिंग तसेच चालकाच्या चुकांमुळे काही अपघात झाले आहेत. पण, त्याचबरोबर बर्‍याच अपघातांना या महामार्गाची योग्यरीत्या होत नसलेली देखभाल, दुरुस्ती कारणीभूत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. धोक्याचा इशारा देणारे सूचना फलक आणि वेगनियंत्रक उपाययोजनांची वानवा याबाबीही अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. मिस्त्री यांच्या अपघातात पोलिसांनी यावर प्रकाशझोत टाकला आहे. हा महामार्ग ‘नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया’च्या अखत्यारीत येतो. येथे टोल गोळा करणार्‍या खासगी एजन्सीची महामार्ग देखभालीची जबाबदारी आहे, असे महाराष्ट्र महामार्ग पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी सांगतात.

पण, पावसाळ्यात महामार्गावर अनेक खड्डे पडून त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे खड्डे चुकवताना जवळपास दररोज अपघात होत असून त्यात निरपराध्यांचे प्राण जात आहेत. महामार्गावरील खड्डे बुजवावेत यासाठी आमदार राजेश पाटील यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी गेल्या दोन महिन्यात अनेकदा आंदोलने केली. खानिवडे टोलनाकाही काहीवेळा बंद पाडण्यात आला. पण, थातूरमातूर मलमपट्टी करण्यापलीकडे कोणतेही काम झाले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अपघातांची मालिका सुरुच आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीचा अहवाल धक्कादायक आहे. या अहवालात पोलिसांनी अपघातात महामार्ग प्राधिकरणाच्या त्रुटींकडे लक्ष वेधत अपघाताला प्राधिकरणालाही जबाबदार धरण्यात आले आहे. महामार्ग तीन लेनचा आहे. पण, त्यातील दोनच लेन वापरात आहेत.

चालकांना सावधानता बाळगण्यासाठी सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. दुभाजकावर आणि पुलावर पिवळे ब्लिंकर्सदेखील नाहीत. या कारणांस्तव मिस्त्रींचा मृत्यू झाला असल्याची शक्यता पोलिसांनी अहवालात नमूद केली आहे. जर्मनीच्या पथकाने गाडी सुस्थितीत असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे रस्त्यामुळेच अपघात झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गेल्या सोमवारी झालेल्या अपघातानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर देखरेख, दुरुस्ती करणारी कंत्राटदार कंपनी आर. के. जैन इन्फ्रा प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापक राम राठोड आणि संबंधित अधिकार्‍यांवर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने अपघात रोखले जातील, याची काही शाश्वती नाही. महामार्ग धोकादायक असताना टोलवसुली का केली जाते हा खरा प्रश्न आहे. टोलवसुली बंद करून महामार्ग सुरक्षित करा, अशी वाहन चालक आणि प्रवाशांची मागणी आहे. त्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून वाहन चालकांवरच अपघातांचे खापर फोडण्याचे काम सरकारकडून केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -