घरसंपादकीयअग्रलेखभाजपला काँग्रेसची धास्ती?

भाजपला काँग्रेसची धास्ती?

Subscribe

लोकसभेचे बिगुल अद्याप वाजण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर विविध कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर वर्तमानपत्र आणि टीव्हीवर मोदी सरकारच्या जाहिरातींचा भडिमार सुरू झाला आहे. सरकारी खर्चात मोदींनी स्वत:च्या प्रचाराचा जोरदार धुरळा उडवला आहे. अबकी बार चारसो पारचा नारा देणार्‍या मोदींनी दुसरीकडे काँग्रेसला आपले लक्ष्य केले आहे.

नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावरच हल्लाबोल केला. काँग्रेसने देशाची कशी वाट लावली हेच मोदी अजूनही जाहीर सभांमधून सांगत आहेत. नितीशकुमार यांना आपल्या कळपात सामील करून भाजपने इंडिया आघाडीत मिठाचा खडा टाकला. त्यामुळे काँग्रेस वगळता इतर पक्षांकडून फारसे आव्हान नसल्याचेच भाजपला वाटू लागले आहे. त्यातूनच काँग्रेस टीकेचे लक्ष्य बनली आहे. लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होतील.

- Advertisement -

त्या दृष्टीने भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळे करत फिरत आहेत. त्यानिमित्ताने जाहीर सभांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनही केले जात आहे. सध्याच्या घडीला भाजपला आव्हान देण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही असेच चित्र निर्माण झाले आहे. त्यातच कमजोर विरोधकांमध्ये जागावाटपात होत नसलेले एकमत भाजपला बळ देत आहे. इंडिया आघाडीची जोरदार घोषणा झाल्यानंतर काही महिन्यांतच अंतर्गत मतभेद, कलहामुळे त्यांच्यात मनोमिलन, मतैक्य झालेले दिसत नाही.

आधी ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांनी वेगळी चूल मांडली. त्यामुळे भाजपकडून इंडिया आघाडी नेस्तनाबूत झाल्याची घोषणा केली गेली. इंडिया आघाडी गुंडाळली जाईल, अशी राजकीय अटकळ बांधली जात असतानाच आप आणि समाजवादी पक्षाने काँग्रेसशी जुळवून घेतल्याने भाजप चक्रावून गेली नसेल तरच नवल. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात काँग्रेसने एक पाऊल मागे घेत तडजोडीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये जागावाटपामध्ये शिक्कामोर्तब झालेले दिसून आले आहे. आपसोबत असल्याने गुजरात, गोवा, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड राज्यात तर समाजवादी पक्षामुळे उत्तर प्रदेशात भाजपपुढे आव्हान उभे करण्यास इंडिया आघाडीला संधी मिळाली आहे.

- Advertisement -

इंडिया आघाडीवर भाजपकडून सातत्याने टीका केली गेली, थट्टा केली गेली. इंडिया आघाडीची स्थापना भाजपविरोधातून झाली आहे. काँग्रेसच्या भूमिकेशी इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष सहमत नाहीतच. काँग्रेसबद्दल ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध पक्षीय नेत्यांना आकस आहे. तरीही भाजपविरोधात देशात एकत्रित येण्याच्या उद्देशाने इंडिया आघाडी अजून टिकून आहे. पश्चिम बंगाल, पंजाब, केरळमध्ये इंडिया आघातील घटक पक्षात जागावाटप झाले नसले तरी इंडिया आघाडीत बेबनाव नाही. भाजप मजबूत असलेल्या राज्यांमध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपात सहमती होत असल्याने भाजपपुढे आव्हान असणार आहे.

पश्चिम बंगालसारख्या राज्यात इंडिया आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढले तर त्याचा फटका भाजपला बसेल, अशी समज इंडिया आघाडीतील नेत्यांना आली आहे. म्हणूनच जागावाटपात मतभिन्नता होऊन भाजपला फायदा होऊ नये याची खबरदारी इंडिया आघाडीकडून घेतली जात आहे. भाजपला तीनशेच्या आत रोखण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे. नितीश कुमारांना फोडून भाजपने इंडिया आघाडीला सुरुंग लावला होता. या खेळीने भाजपने अर्धी लढाई जिंकलीही होती, पण इंडिया आघाडी आणि काँग्रेसला टार्गेट करण्यासाठी आक्रमक झालेल्या भाजपमुळे इंडिया आघाडी सावधपणे पावले उचलताना दिसू लागली आहे.

भाजपकडून प्रारंभी राहुल गांधी यांना असेच टार्गेट केले गेले. राहुल गांधींची पप्पू म्हणत अवहेलना केली गेली. या टीकेमुळे की काय राहुल गांधींचे व्यक्तिमत्त्व बदलू लागल्याचे दिसत आहे. सुरुवातीचे अपरिपक्व वर्तन, राजकीय चातुर्याचा अभाव, त्यात काँग्रेसचा पडता काळ यामुळे राहुल गांधींच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते, पण भाजपने सतत त्यांच्यावर टीकेची झोड उठवून त्यांना राजकीयदृष्ठ्या जिवंत ठेवले. राहुल विरुद्ध मोदी हा सामना फायदेशीर आहे, असे भाजपला वाटल्याने राहुल गांधींची प्रतिमाहनन करण्याचे भाजपने प्रयत्न केले.

त्यासाठी ‘युवराज’, ‘पप्पू’ अशी संभावना भाजपकडून सातत्याने केली गेली. भाजप सातत्याने राहुल गांधींवरच निशाणा साधत राहिल्याने राहुल गांधी सतत राजकीय पटलावर झळकत राहिले. भाजपकडून चोहोबाजूंनी होत असलेल्या टीकेमुळे राहुल गांधी यांनी आपल्यामध्ये कालसुसंगत सुधारणा केली. सातत्याने अपयश आणि अवहेलना झेलणार्‍या माणसांची काही वेळा भीतीच नष्ट होऊन जाते. तोच प्रकार राहुल गांधी यांच्याबाबत घडताना दिसत आहे. आता ज्या बेधडकपणे ते राजकीय वाटचाल करत आहेत त्यावरून दिसते की ते भाजपशी लढायला तयार आहेत.

प्रस्थापित माध्यमे विरोधकांना लोकांपर्यंत पोहचू देत नाहीत, या राजकीय गरजेतून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करून राहुल गांधी रस्त्यावर उतरून समाजातील सर्व स्तरातील सर्व प्रकारच्या लोकांना भेटत आहेत. काँग्रेस पक्षातून अनेक दिग्गज आणि आघाडीतून घटक पक्ष बाहेर जात असतानाही राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू ठेवली. या पार्श्वभूमीवर मोदींची गॅरंटी असताना आणि २०२४ साठी जय्यत तयारी करण्यात येत असताना भाजपला विशेषतः नरेंद्र मोदी यांना आजही काँग्रेसची धास्ती का वाटते, या प्रश्नात भाजपची भीती दडलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -