घरसंपादकीयअग्रलेखछत्रपती शिवाजी महाराज आणि भावनिक राजकारण

छत्रपती शिवाजी महाराज आणि भावनिक राजकारण

Subscribe

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असल्याची चर्चा राजकारणासाठी नवी नाही. मराठी व्यक्तीला मुंबईत घर नाकारण्यात आल्यावरून मराठी राजकारण, समाजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या मुद्याचा दूरगामी गडद परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय दोन स्तरांवर एकाच वेळेस समांतर चालवला जातो. पहिला विषय छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यपद्धती, त्यांचे समाज आणि राजकारण, मुत्सद्दीपणा, निर्णयक्षमता, रयतेप्रती असलेली काळजी, जबाबदारी, ध्येयधोरणे, अठरा पगड जातीसमूहांना सोबत घेऊन केलेली स्वराज्याची स्थापना आणि एकूणच कार्य कर्तृत्वाने इतिहासावर कोरलेले छत्रपती शिवाजी महाराज हे नाव हा एक भाग, तर दुसरा भाग महाराजांच्या केवळ प्रतीकांचा विषय बनून राहिला आहे.

महाराजांची शिकवण आणि कार्यकर्तृत्वातून मिळणारी प्रेरणा ही प्रतिकांची बांधिल नाही, तरीही ऐतिहासिक प्रतीकांचा विषय राजकीय उद्देशाने चर्चिला जातो. ज्या बेरोजगारी, पायाभूत सुविधा, आरक्षण, नोकरभरती, महागाई, आरोग्य, शेतकर्‍यांचे प्रश्न, नैसर्गिक आपत्तीतून निर्माण होणारे प्रश्न, शिक्षण आदी वेळी लोकांवर थेट परिणाम करणारे विषय समोर आणले जातात. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय घेऊन होणारे भावनिक राजकारण नवे नाही, असाच प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेही केला जातो. महाराष्ट्रातील गड किल्ले हे खरेतरी छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या इतिहासाचे साक्षीदार आहेत, मात्र या ऐतिहासिक ठेव्याकडे महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या सरकारांनी पुरेसे लक्ष दिलेले आहे का? हा प्रश्न आहेच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील संदर्भ आणि या इतिहासाच्या अभ्यासासाठी गड-किल्ल्यांच्या संवर्धन, संगोपनासाठी सातत्यपूर्ण दूरगामी असे कोणते धोरण यशस्वी झालेले आहे, महाराजांच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी विद्यापीठ आणि शैक्षणिक स्तरावर संशोधनासाठी काय पावले उचलली गेली आहेत. महाराष्ट्रातील गड-किल्ले केवळ पर्यटनांची ठिकाणे ठरू नयेत यासाठी कोणते उपाय आहेत. जगाच्या इतिहासावर परिणाम करणार्‍या राजे, महाराज आणि सम्राटांच्या ऐतिहासिक योगदानाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठे आणि अभ्यास, संशोधन गटांकडून घेतली जाते, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे दैदिप्यमान कार्यकर्तृत्व समोर येण्यासाठी राज्य आणि सरकारच्या संशोधन, अभ्यास संस्थांना पूरक अशा कोणत्या योजना राबवल्या गेल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकांआधी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘स्मारक’ उभारण्यावरून केलेले भावनिक राजकारण नवे नाही. पाचशे कोटी, हजार कोटी, महाराजांच्या स्मारकाची उंची यावरून झालेले राजकारण केवळ भावनिक होते. स्मारके त्यांची केली जातात, त्यांना आठवण्यासाठी प्रतीकांची गरज असते, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव इथल्या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात आणि मराठी माणसांच्या श्वास आणि रक्तपेशीतही सामावलेले आहे. महाराजांच्या नावाने होणार्‍या भावनिक राजकारणाच्या सत्तेच्या हेतूपासून म्हणूनच नागरिकांनी सावध राहायला हवे.

- Advertisement -

अरबी समुद्रात उभारले जाणारे स्मारक, भवानी तलवार, गड किल्ल्यांचा विषय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या मुद्यावरून राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. लंडनहून वाघनखे आणली जाण्याचा विषय सद्यस्थितीत चर्चिला जात आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारच्या धोरणाबाबत राज्यातील मराठा समुदाय साशंक आहे. आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम मराठा समुदायाचा राहिला आहे. या समुदायाकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्राचे राजकारण शक्य नाही. याशिवाय सहकार, साखर, शिक्षण, सत्ता आदी घटकांवरही या समुदायाच्या राजकारणाचा अमिट असा ठसा आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनहून आणून या समुदायाला पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सरकारचा असू शकतो, त्यामुळेच महाराजांच्या नावाने भावनिक राजकारणाचा हा एक भाग असणे शक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केलेले राजकारण यशस्वी ठरत असल्याचा अनुभव येथील राजकारणाच्या गाठीशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक नाव कुठल्याही जाती धर्माच्या पलीकडे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील नागरिकांनाही प्रेरणा देणारे आहे.

महाराजांची वाघनखे ताब्यात घेताना शिवकालीन पोशाख करणे, त्यावर सोन्याचा वर्ख असण्याच्या येणार्‍या बातम्या या भावनिक राजकारणाचा एक भाग असू शकतात. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून लंडनमधील वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. या वाघनखांच्या वापर करून महाराजांनी अफझलखानाला संपवले, असा इतिहास आहे, मात्र महाराजांचा इतिहास केवळ अफझलखानाचा मृत्यू एवढाच नाही, त्याही पलीकडे महाराजांची स्वराज्य संकल्पना, राजकीय दूरदृष्टी आणि रयतेप्रती असलेली आत्मियता आणि रयतेचे राजे कसे असावेत, याचे आदर्श उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज आहेत, परंतु महाराजांचा इतिहास केवळ अफझल खानाच्या मृत्यूभोवतीच केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न होत असेल, तर नागरिकांनी यातील सत्ताकारण समजून घ्यायला हवे. या विषयावरून आता संजय मंडलीक आणि अदित्य ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखे आणली जाताना शिवकालीन पोषाखाचा विषय समोर आणला आहे, तर पुढील वर्षी ३५० व्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने एक कोटी शिवभक्तांचे पोर्टल सुरू केले जाणार आहे. याचे काम केले जात असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडून तीन वर्षांसाठी कर्जावर ही वाघनखे महाराष्ट्राच्या ताब्यात दिली जाणार आहेत. महाराष्ट्रातील उल्लेखनीय वस्तूसंग्रहालयात ही वाघनखे नागरिकांना दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत, मात्र ही वाघनखे महाराजांनी वापरली नाहीत, अशी शंका उपस्थित करून जितेंद्र आव्हाडांनी खळबळ उडवून दिली आहे. या विषयावरून पुन्हा महाराजांना केंद्रस्थानी ठेवून राजकारणातील टीका-टिप्पणी सुरू होणार आहे. पुढील महिन्यात 16 नोव्हेंबरला शिवरायांची वाघनखे मुंबईत आणण्यात येणार आहेत. ही वाघनखे खरंच महाराजांनी वापरली होती का? या प्रश्नावरून राजकारण सुरू होणार हे स्पष्ट आहेच, मात्र हे होत असताना महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे मूळ उद्दिष्ट, त्या विषयाला पुन्हा सविस्तर बगल राजकारण आणि सत्तेकडून दिली जाणार आहे. निवडणुका जवळ आल्या असताना ही वाघनखे का आणली जात आहेत? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. या वाघनखांच्या सुरक्षेसाठी सरकारने ११ जणांची समिती नेमली आहे.

- Advertisement -

वाघनखे, चिलखते, तलवार, पुतळे, स्मारके, पोषाख या गोष्टी निर्जीव आहेत. त्यापासून प्रेरणा निश्चितच घ्यावी, परंतु या गोष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांचा इतिहास नव्हे, छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व त्याही पलीकडे विचार, इतिहास, धोरणे, मानवी आत्मसन्मान, खरे स्वराज्य, खरी लोकशाही असे जाती, धर्माच्या पलीकडे आकाश व्यापणारे आहे. महाराजांच्या स्वराज्याची उभारणी करताना महाराजांनी जी राजकीय, सामाजिक तत्वे घालून दिली होती, त्या पायाचा अभ्यास आणि त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची खरी गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना तेच खरे अभिवादन ठरणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -