घरसंपादकीयअग्रलेखनितीशकुमारांचा राग बिहारी!

नितीशकुमारांचा राग बिहारी!

Subscribe

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरूंग लावणार्‍या भाजपला बिहारमध्ये सणसणीत धोबीपछाड मिळाला आहे. राजकारण कधीच स्थिर नसलेल्या बिहारात मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. ते आता विरोधी पक्ष असलेल्या तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्याने चूल मांडणार हे स्पष्ट झाले आहे. यासाठी त्यांना काँग्रेसचाही पाठिंबा मिळणार हे जवळपास नक्की आहे. २४३ सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेत नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल (जेडीयू) तिसर्‍या क्रमांकावर आहे. २०२० च्या निवडणुकीत ७५ जागा जिंकून राष्ट्रीय जनता दल प्रथम क्रमांकावर असून, महागठबंधनमधील काँग्रेसला १९ जागा मिळाल्या आहेत.

तर संयुक्त जनता दल आणि भाजप आघाडीला अनुक्रमे ४३ आणि ७४ जागा मिळाल्या. आता राष्ट्रीय जनता दलात काही आमदार सहभागी झाले असल्याने या पक्षाची ताकद ८० पर्यंत पोहचली आहे. तर भाजप ७७ आणि संयुक्त जनता दलाचे ४५ आमदार आहेत. भाजपचे आमदार अधिक असतानाही त्या पक्षाच्या नेत्यांनी नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदी बसवले, तर उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवले. यात भाजपच्या मनाचा मोठेपणा नव्हता तर त्यांना बिहारसारख्या मोठ्या राज्यात पद्धतशीरपणे हातपाय पसरायचे होते. भाजपला या देशात प्रादेशिक पक्षांना शिल्लक ठेवायचे नसल्याने अनेक राज्यांतून तोडाफोडीचे हीन पातळीवरील राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रातही तेच झाले.

- Advertisement -

पण १९८५ पासून प्रदीर्घ काळचा राजकीय अनुभव असलेल्या चाणाक्ष नितीशकुमार यांनी माजी केंद्रीय पोलाद मंत्री आरसीपी सिंह यांच्यामुळे सुरू झालेले राजकारण पक्षाच्या मुळावर येणार नाही याची काळजी घेतली. भाजपपासूनच दूर जाण्याचा निर्णय घेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) त्यांनी धक्का दिला आहे. आरसीपी सिंह यांना नितीशकुमार यांनी राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यापासून ते पंतप्रधानांसोबतच्या दोन बैठकांसह राष्ट्रपतीपदाच्या शपथविधीकडे नितीशकुमार यांनी पाठ फिरवली होती. त्यापासूनच संयुक्त जनता दल आणि भाजपमध्ये आलबेल नसल्याचे संकेत मिळत होते. सिंह हे भाजपच्या जवळ जात असल्याचा संशय संयुक्त जनता दलाच्या नेतृत्त्वाला होता. सिंह यांनी आपल्या पक्षाचे वर्णन ‘बुडती नौका’ असे करीत संयुक्त जनता दलापासून फारकत घेतली.

बिहारचे पाचवेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले आणि सहावेळा खासदार राहिलेले नितीशकुमार हे राष्ट्रीय पातळीवरील एक मुरब्बी नेते समजले जातात. एनडीएमधील घटक असलेल्या एका मोठ्या पक्षाचे नेते होते. पंतप्रधान होण्याची त्यांची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. या अगोदर त्यांची काँग्रेसशी जवळीक होती. मात्र नितीशकुमार यांचा स्वभाव काहीसा शीघ्रकोपी असल्याने त्यांचे कोणत्याही राजकीय पक्षाशी फार काळ जमत नाही हा इतिहास आहे. काँग्रेससोबत दोन वर्षे घरोबा केल्यानंतर ते भाजपसोबत होते. दोन वर्षांनंतर तेथेही बिनसल्याने त्यांनी भाजपची साथ सोडून मंगळवारी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला. बिहारमधील सद्य राजकीय परिस्थिती पाहता भाजपला आता विरोधी पक्षात बसावे लागेल. भाजपचे राजकारण लक्षात घेतले तर बिहारमध्ये ऑपरेशन लोटस राबविण्यात येणारच नाही असे नाही.

- Advertisement -

त्यामुळे नितीशकुमार यांनी चाणाक्षपणे विरोधक असलेल्या तेजस्वी यादव यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही त्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. भाजपविरोधात मोट बांधण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नाला नितीशकुमार यांच्या भाजपपासून दूर होण्याने आयतेच बळ मिळणार आहे. त्यामुळे काँग्रेसही नितीशकुमार यांना पाठिंबा देताना फार काही अटी आणि शर्थी ठेवील अशी तूर्त तरी शक्यता नाही. माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव असलेले तेजस्वी यादव यांचा मात्र बिहारच्या आणि पुढे राष्ट्रीय राजकारणात भाव चांगलाच वधारणार आहे. भाजपशी मैत्री करणारे नितीशकुमार हे त्या पक्षाचा आजपर्यंतचा इतिहास पाहता सावध होते हे ताज्या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.

आरसीपी सिंह यांचा वापर करून संयुक्त जनता दलात फूट पाडण्याचा भाजपचा मनसुबा असू शकतो याची जाणीव राजकारण कोळून प्यायलेल्या नितीशकुमार यांना होती. त्यामुळे त्यांनी सिंह यांना राज्यसभेचे तिकीट नाकारून सर्वप्रथम त्यांचे पंख छाटण्याचे काम केले. सत्तेसाठी निष्ठा पायदळी तुडवून विरोधकांना जाऊन मिळण्यासाठी कशा पटापट उड्या मारल्या जातात याचे ताजे उदाहरण महाराष्ट्रात दिसले. त्यामुळे नितीशकुमार यांनी आमदारांना सत्तेचे आमिष दाखवून भाजप आपल्याकडे वळवेल हे लक्षात घेऊनच तेजस्वी यादव आणि काँग्रेसशी जवळीक साधण्याची धूर्त खेळी केली आहे. त्यामुळे बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल यांचे सरकार येणे ही औपचारिकता उरल्याचे एकूणच घडामोडीवरून दिसून येत आहे. काँग्रेसचाही पाठिंबा मिळणार असल्याने हे महागठबंधन भक्कम पायावर उभे राहू शकते.

मित्राच्या जीवावर मोठे होऊन आपली ताकद पद्धतशीरपणे वाढवायची, ही भाजपची रणनीती आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला जवळ करून नंतर त्याच शिवसेनेचा गळा घोटायला भाजपने मागेपुढे पाहिलेले नाही. यातूनच शिवसेनेत अभूतपूर्व अशी फूट पडली. बिहारात कदाचित हेच होण्याची शक्यता नितीशकुमार यांनी लक्षात घेतली असेल. नितीशकुमार यांनी वयाची एकाहत्तरी ओलांडलेली असली तरी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. नितीशकुमार यांनी भाजपला दूर केले असल्याने तो एनडीएला मोठा धक्का मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, तसेच अकाली दल आधीच एनडीएमधून बाहेर पडले आहेत. त्यापाठोपाठ संयुक्त जनता दलही बाहेर पडला आहे. त्यामुळे एनडीएमध्ये भाजपला किरकोळ ताकद असलेल्या पक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे.

युपीएमध्ये नेता कुणाला करायचा यावरून रुसवाफुगवी सुरू असताना नितीशकुमार युपीएला जाऊन मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे युपीएचा सर्वमान्य नेता म्हणून नितीशकुमार यांच्या नावाची चर्चा होऊ शकते. अर्थात हा ‘जर-तर’ चा विषय आहे. मात्र नितीशकुमार यांची भाजपशी झालेली फारकत विरोधकांना बळ देणारी निश्चितच आहे. त्यामुळे आगामी काळातील राजकारण कोणत्या वळणावर जाणार याकडे सार्‍यांचे लक्ष स्वाभाविकपणे असणार आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि २०२५ ची बिहार विधानसभा निवडणूक नितीशकुमार यांना सोबत घेऊन लढण्याच्या मोदी-शहांच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले आहे. नितीशकुमार, तेजस्वी यादव आणि काँग्रेस यांची आघाडी झालीच तर या दोन्ही निवडणुका भाजपला जड जातील हे नक्की! भाजपने केंद्रीय सत्तेचा वापर करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार मोठ्या परिश्रमाने पाडून सत्ता मिळवली, पण बिहारमध्येही असेच होणार हे लक्षात आल्यावर नितीशकुमार यांनी भाजपला राग बिहारी दाखवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -