घरसंपादकीयअग्रलेखभाजप घराणेशाहीचेच पुजारी

भाजप घराणेशाहीचेच पुजारी

Subscribe

काँग्रेस पक्षातील घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार टीका केली खरी, पण त्यांच्याच पक्षाने पुन्हा एकदा घराणेशाहीला कुरवाळले आहे. लोकसभेसाठी महाराष्ट्रातील २० जागा जाहीर करताना त्यांनी तब्बल ८ जागांवर घराणेशाही जोपासली आहे. म्हणजे जवळपास ४० टक्के जागांवर घराणेशाहीतील उमेदवारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. यात स्व. गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली.

विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे, माजी केंद्रीय मंत्री स्व. वेदप्रकाश गोयल यांचे पुत्र पीयूष गोयल, माजी मंत्री एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे, माजी मंत्री ए. टी. पवार यांची स्नुषा डॉ. भारती पवार आणि माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र रणजितसिंह नाईक यांना उमेदवारी देऊन भाजपने घराणेशाहीला पुजले आहे.

- Advertisement -

गेल्या सहा महिन्यांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे देशभर दौरे केले त्यात, प्रत्येक ठिकाणी ते घराणेशाहीवर तुटून पडले. केंद्रात नेहरु आणि गांधी घराणे, तर राज्यात ठाकरे आणि पवार घरण्यांना लक्ष्य करीत घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आणला, पण मोदींनी या मंत्रिमंडळावर नजर फिरवली, तर भाजपचा खोटारडेपणा दिसून येतो. यात मंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा पंकज सिंह आमदार आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सासुबाई जयश्री बॅनर्जी भाजपच्या मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत. यशवंत सिन्हा यांचे पुत्र मंत्री जयंत सिन्हा, साहिबसिंग वर्मा यांचा पुत्र पर्वेश वर्मा, कल्याण सिंह यांंचे पुत्र राजीव सिंह ही सगळी घराणेशाहीचीच अपत्ये आहेत. भाजपच्या ४०० खासदारांपैकी तब्बल ४५ खासदारांची पार्श्वभूमी घराणेशाहीची आहे. महाराष्ट्रात १०६ आमदारांपैकी २५ आमदारांची पार्श्वभूमी घराणेशाहीची आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरपंत आमदार होते. काकी शोभाताई फडणवीस मंत्री होत्या. त्यामुळे ‘आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्टे’ ही म्हण भाजपला लागू पडत आहे.

- Advertisement -

घराणेशाहीला कुरवाळतानाच भाजपने उमेदवारांची निवड मात्र अतिशय विचारपूर्वक केल्याचे दिसते. जळगावचे खासदार असलेले उन्मेष पाटील यांना दुसर्‍यांदा उमेदवारी द्यायला पक्षाने नकार दिला आहे. त्यांच्या जागेवर स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चाळीसगावचे आदार मंगेश चव्हाण आणि उन्मेष पाटील यांच्यात गेल्या पाच वर्षात कमालीचे वैर वाढले होते. मंगेश चव्हाण हे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे निकटर्तीय मानले जातात. त्यात उन्मेष चव्हाण यांचा स्थानिक आणि राज्यस्तरीय नेत्यांशी दुरावा निर्माण झाल्याने त्यांची उमेदवारी हातची गेली.

रावेरमध्ये एकनाथ खडसेंची स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळण्याविषयी शंका होती, परंतु पक्षनिष्ठा आणि एकनाथ खडसे यांनी घेतलेली सौम्य भूमिका यामुळे रक्षा यांना पुन्हा संधी मिळाली. दुसरीकडे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने जाहीरपणे नाराजी व्यक्त करणार्‍या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना बिडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांच्या जागेवर ही उमेदवारी असली तरी पारंपरिक विरोधक धनंजय मुंडे यांना मात्र महाविकास आघाडीमुळे आता पंकजा यांचा प्रचार करावा लागेल असे दिसते. ओबीसी मतांवर, विशेषत: वंजारी समाजाच्या मतांवर डोळा ठेवत भाजपने ही उमेदवारी निश्चित केल्याचे दिसते.

मुंबईतील दोन जागांवर उमेदवारी घोषित करताना विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांचा पत्ता कट केला आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टींनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा तब्बल ४ लाख ६५ हजार मतांनी धुव्वा उडवला होता. शेट्टींनी सुरक्षित करून ठेवलेल्या या मतदारसंघात पीयूष गोयल यांना उतरविण्यात येणार आहे. अर्थात शेट्टी यांचे राजकीय करिअर संपवण्यापेक्षा त्यांचा विचार विधानसभेतही होऊ शकतो. तसेच मनोज कोटक यांच्या जागी मुलुंडचे विद्यमान आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देऊन धक्कातंत्राचा वापर केला आहे. वास्तविक, या मतदारसंघात कोटेचा यांची कामगिरी समाधानकारक होती.

२०१९ पूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या ईशान्य मुंबईचे खासदार होते. त्यांची कामगिरी पाहता त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणे अपेक्षित होते, परंतु मध्यंतरीच्या काळात मुंबई महापालिकेच्या कारभारावरून सोमय्या यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत वितुष्ट निर्माण झाले होते. २०१९ मध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेची मनधरणी करावी लागली होती.

त्यावेळी शिवसेनेच्या सांगण्यावरून ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करण्यात आला आणि मनोज कोटक यांना उमेदवारी मिळाली. त्यावेळी मनोज कोटक यांनी संजय दीना पाटील यांचा पराभव केला होता, परंतु सोमय्या आणि कोटक या दोघांनाही बाजूला ठेवत चक्क मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देत भाजपने अनोखी खेळी खेळली आहे. सर्वेक्षणावर चालणारा हा पक्ष तिसर्‍या यादीत यापेक्षा अधिक धक्के देईल, असा अंदाज आहे. एकूणच भाजपच्या दुसर्‍या यादीतून घराणेशाही, वशिलेबाजी आणि बेरजेचे राजकारण यांचा परिपाक दिसून येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -