सुप्रीम कोर्टाने टोचले कान !

संपादकीय

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात शुक्रवारी अतिशय कडक शब्दात, गंभीर ताशेरे ओढत कानउघाडणी केली आहे. सध्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांकडून ज्यापध्दतीने एकमेकांवर तोशेरे ओढताना धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी विधानं केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा प्रकरणात नोंदवलेली मतं खरं तर सर्वच राजकीय पक्षांचे कान टोचणारी आहेत. तसंच देशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करणारीही आहेत.

सुप्रीम कोर्टानं तर उदयपूर येथील टेलरच्या हत्येच्या घटनेला नुपूर शर्माच जबाबदार आहेत, असं भाष्य करून देशात जे काही घडत आहे, त्याला नुपूर शर्मा एकट्याच जबाबदार आहेत, असंही म्हटलं आहे. नुपूर शर्मा यांनी प्रेषितांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात देशभरात काहूर माजले आहे. मुस्लीम समाजात नुपूर शर्मांविरोधात प्रचंड असंतोष पसरला असून ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलनं करून आपल्या भावना व्यक्त केल्या गेल्या. शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्याने देश जातीय दंगलीच्या उंबरठ्यावर पोचण्याची भीती आहे. भाजपनं हे प्रकरण अंगाशी येऊ नये यासाठी नुपूर शर्मांना भाजपमधून निलंबित करण्याची कारवाई केली आहे. पण, त्यांच्यावर कठोर कारवाई न केल्यानं भाजपला टीकेचा सामना करावा लागत आहे.

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर उदयपूरमध्ये एका टेलरच्या हत्येनं वेगळंच वळण घेतलं आहे. उदयपूरमधील कन्हैय्यालाल टेलरने नुपूर शर्मा यांच्या बाजूने एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. त्यानंतर त्याला ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या. मंगळवारी शहरातील गजबजलेल्या मालदास स्ट्रीट येथील दुकानात शिरून दोघांनी त्याची हत्या केली. मारेकर्‍यांनी या हत्येची जबाबदारी घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला होता. आता या हत्याकांडाचे कनेक्शन थेट पाकिस्थानशी जोडलं जात आहे. दावत-ए-इस्लाम या पाकिस्तानी संघटनेचे रियाझ जब्बार आणि गौस मोहम्मद यांचा यात संबंध असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दोघेही पाकिस्तान आणि आखाती देशातील लोकांच्या संपर्कात होते. त्यांच्या मोबाईलमध्ये त्या देशातील नंबर आढळले असून पाकिस्तानमधील नंबरवर दोघांचं सर्वाधिक बोलणं व्हायचं. दोघांनी कराचीत प्रशिक्षण घेतलं, असा दावा गृहराज्यमंत्री राजेंद्र यादव यांनी केला आहे. दोघांच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे पुढे येऊ लागले आहेत.

देश हादरवून सोडणारी ही घटना ताजी असताना शनिवारी महाराष्ट्रातील अमरावती शहरात उदयपूर पॅटर्नप्रमाणे व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या झाली. सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांच्या काही पोस्ट व्हायरल केल्यानं ही हत्या झाल्याचा प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी इरफान खान याला अटक करण्यात आलेली आहे. याघटनेची गंभीरपणे नोंद घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने या हत्येचा तपास एनआयएकडे दिला आहे. महाराष्ट्रातील अमरावतीत घडलेल्या घटनेच्या आदल्यादिवशीच सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना तीव्र शब्दात फटकारून कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. नुपूर यांच्या बेलगाम वक्तव्याने संपूर्ण देशभर वणवा पेटला. त्यांनी त्वरीत देशाची माफी मागायला हवी होती. आताही त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, असेही सुप्रीम कोर्टानं त्यांना सुनावलं आहे. प्रेषितांबद्दल टिप्पण्या एकतर थिल्लर प्रसिध्दीसाठी, राजकीय हेतूनं किंवा दुष्कृत्यासाठी केल्या गेल्या असाव्यात, असं मतही कोर्टानं नोंदवलं आहे. नुपूर शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जे. बी. पार्डीवाला यांनी मांडलेली मतं देशात आजच्या घडीला सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर चिंता व्यक्त करणारी अशीच आहेत. नुपूर शर्मा यांनी केलेली विधानं अस्वस्थ करणारी आणि अहंकारी आहेत. अशी विधाने करण्याची काय गरज होती, असंही कोर्टानं म्हटलं आहे.

शर्मा यांच्या वकिलाने जीवाला धोका असल्याचा केलेला दावा खोडताना खंडपीठाने त्याच समाजाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहेत, असं सांगत फटकारलं. तसंच शर्मा यांची याचिकाही फेटाळून लावली आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे देशात दुर्दैवी घटना घडल्या आहेत, असं मत नोंदवत कोर्टाने केंद्र सरकार आणि भाजपलाही अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. एफआयआर नोंदवूनही जेव्हा तुम्हाला अटक केली जात नाही, तेव्हा त्यातून तुमचा प्रभाव दिसतो. आपल्या पाठीमागे शक्ती आहे, असं वाटत असल्यामुळेच शर्मा यांनी बेजबाबदार विधाने केली, असे खडे बोलही कोर्टाने सुनावले आहेत. तुम्ही एखाद्या पक्षाचे प्रवक्ते असाल, तर प्रवक्तेपण म्हणजे अशी वक्तव्ये करण्याचा परवाना नाही, असेही कोर्टाने शर्मा यांची याचिका फेटाळून लावताना सुनावलं आहे. राजकीय नेत्यांना सुनावत असताना कोर्टाने वृत्तवाहिन्यांचीही कानउघाडणी केली आहे. वृत्तवाहिन्यांच्या चर्चेच्या विषयांवर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. दूरचित्रवाहिनीवरील ती चर्चा कशासाठी होती? तो अजेंडा दामटण्याचा कार्यक्रम होता का? वृत्तवाहिनीने न्यायप्रविष्ट विषयच का निवडला? संबंधित वाहिनीवर चर्चेचा गैरवापर होत होता तर शर्मा यांनीच प्रथम सूत्रसंचालकाविरोधात तक्रार दाखल करायला हवी होती, असंही कोर्टानं सुनावलं आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे प्रवक्ते, काही वाहिन्यांचे संपादक, पत्रकार, इतकंच नाही तर काही अभिनेते, अभिनेत्री बेलगाम, वाचाळवीर होत टीका-टिप्पणी करताना दिसत आहेत. आपली जीभ घसरत चालली असल्याचं भानही त्यांना नसतं. पण, जाणीवपूर्वक अशी वक्तव्य करून थिल्लर प्रसिध्दी मिळवण्याचा त्यामागे हेतू असल्याचं कोर्टाचं म्हणणं योग्य असंच आहे. म्हणूनच कोर्टाने शर्मा प्रकरणात मांडलेली मतं सगळ्यांनीच लक्षात घेण्यासारखी आहेत. अँकर अर्णब गोसावी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अनादर करणारी वक्तव्य करत होते. ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊतांना आपला संताप अनावर झाल्याने त्यांची मीडियासमोरच जीभ घसरली होती.

केतकी चितळेंने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने तिला जेलची हवा खावी लागली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही पवारांबद्दल भाष्य करताना जीभ नको तितकी घसरली होती. त्याआधी कंगणा रानावतनेही जीभ सैल सोडली होती. हनुमान चालिसाच्या आडून राणा दाम्पत्याने धुडगूस घातला. जवळपास सर्वच राजकीय पक्षातील अशा नेत्यांचे गेल्या वर्ष-दीड वर्षातील वर्तन हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नव्हते. यापार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा प्रकरणात व्यक्त केलेली मते ही सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी असून संबंधितांचे कान टोचणारी आहेत. आक्षेपार्ह वक्तव्यानंंतर ज्यांनी हत्या केल्या त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईलच, पण अशा शक्तींना डोके वर काढू देण्याची संधी देणे हे एकूणच समाज स्वाथ्यासाठी हानिकारक आहे.