घरसंपादकीयअग्रलेखवाचाळवीरांना न भयं न लज्जा!

वाचाळवीरांना न भयं न लज्जा!

Subscribe

शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात आता राजकीय नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे सतत वादाचे प्रसंग होऊ लागले आहेत. बेताल वक्तव्यांनी आता महिलांचा अनादर करण्याचे प्रसंग वारंवार होताना दिसत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे जबाबादर मंत्रीही त्यात मागे नाहीत. गेल्या आठवड्यात संभाजी भिडे यांच्या टिकलीवरून संताप व्यक्त होत असतानाच मंत्री गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांनी सर्व संस्कारांना फाटा देत राजकारणात सक्रियपणे काम करत असलेल्या महिलांबद्दलच अपशब्द काढण्याचं काम केलं आहे. महाराष्ट्राचा अवमान करण्याचं काम दस्तुरखुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून याच वर्षात दोनदा झालं. औरंगाबादमध्ये २७ फेब्रुवारीला श्री समर्थ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ‘चाण्याक्यांशिवाया चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?. असं धक्कादायक विधान राज्यपालांनी केलं होतं.

त्यानंतर पुण्यात १४ फेब्रुवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण समारंभात भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी, सावित्रीबाईंचं लग्न १० व्या वर्षी झालं. तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे १३ वर्ष होतं. कल्पना करा की त्या वयात मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील, असं वक्तव्य करत सावित्रीबाईंचा अवमान करण्याचं काम केलं होतं. राज्यात सत्तांतर झाल्यापासून आणि सत्तांतर होण्याआधीपासून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची जीभ वारंवार घसरताना दिसत आहे. सत्तांतरानंतर राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा आपल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आले आहेत. सुप्रिया सुळे यांनी खोक्यावरून केलेली टीका अब्दुल सत्तार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. या टीकेवर प्रतिक्रिया देताना सत्तारांचा तोल गेला. विरोधकांवर टीका करताना अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. आम्हाला खोके म्हणणारे लोकं भिकार** असल्याचं सत्तार म्हणाले.

- Advertisement -

सुप्रिया सुळे यांचादेखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला. विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केलं. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे एक नव्या वादाला सुरुवात झाली आहे. याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत सत्तार यांना माफी मागण्याचे निर्देश दिले. तर मंत्री दीपक केसरकर यांनीही याप्रकरणी माफी मागून वादावर पडदा टाकण्याचां काम केलं. त्यानंतर सत्तार यांनीही माफी मागत असल्याचं सागितलं. आपण केलेल्या वक्तव्याबद्दल काही गैर आहे, असं मात्र माफी मागत असलेल्या सत्तारांच्या आवेशातून दिसलं नाही. उलट, खोक्यावरून बोलणार्‍यांना त्याच भाषेत उत्तर देऊ, असं म्हणत गिरे तो भी टांग उपर, असाच त्यांचा अविर्भाव होता. यावेळी सिल्लोड येथे उपस्थित असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता सत्तार यांच्याविषयी काही बोलण्यास नकार दिला.

याआधी विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही जीभ घसरली होती. दिल्लीत कोणाच्या बैठका झाल्यानंतर मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण देण्याबाबतचा निकाल लागला, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यामुळे चंद्रकांत पाटील चांगलेच संतापले होते. चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली होती. तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या, अशा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला होता. गेल्या आठवड्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कुंकू लाव, तरच तुझ्याशी बोलेन असं एका महिला पत्रकाराला उद्देशून केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. हा वाद सुरू असतानाच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांबद्दल विशेषतः सुप्रिया सुळेंबद्दल अतिशय गलिच्छ वक्तव्य करून महिलांचा अनादर करण्याचं काम केलं आहे.

- Advertisement -

त्याआधी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना नटी म्हणत राजकीय क्षेत्रातील तमाम महिला वर्गाचा अवमान करण्याचं काम केलं आहे. गुलाबराव पाटील यांनी याआधीही महिलांबद्दल काहीवेळा अपशब्द वापरले आहेतच. विशेष म्हणून सुषमा अंधारे यांनी जळगाव जिल्ह्यात काही सभा घेतल्या. होत्या. पण, सभांमध्ये अंधारे यांनी कुणावरही टीका केली नव्हती. असं असताना गुलाबराव पाटलांनी त्यांचा अवमान करण्याचं काम केलं. एकतर खासदार संजय राऊत यांच्यानंतर उध्दव ठाकरे गटाची बाजू अगदी प्रभावीपणे मांडणारा कुणीही दुसरा नेता नाही. अशावेळी सुषमा अंधारे ठाकरे गटाची बाजू दमदारपणे मांडत आहेत. शिंदे गट आणि भाजपला आक्रमकपणे प्रत्युतर देताना दिसत आहेत. त्यामुळेच अंधारे ह्याच आता टार्गेट आहेत. त्यातूनच गुलाबराव पाटलांनी टीका केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

राजकारणात टीका-टिप्पणी होतच असते. प्रत्येक राजकीय नेत्यांना ती करावीच लागते. त्याबद्दल कुणाचंही दुमत नाही. पण, राजकीय क्षेत्रात हिरीरीने भाग घेत असलेल्या महिलांवर टीका करताना पातळी तोडून बोलणं शोभा देत नाही. यातून आपली वैचारिक दिवाळखोरीच दिसून येते, याचं भान राजकीय नेत्यांनी ठेवायला हवं. एखादा नेता किंवा मंत्री विरोधी पक्षातील महिलांबद्दल अशा पध्दतीने अवमानकारक भाष्य करत असेल तर संबंधित पक्षनेतृत्वाने त्याला आवरणं गरजेचं आहे. पण, सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संघर्षात तसं होताना दिसत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांच्यासारखे नेते तर अधूनमधून खालच्या पातळीवर जाऊन करत असलेली टीकाटीप्पणी नेतृत्व दुर्लक्षित करतानाच दिसते.

त्यामुळे जाणूनबुजून वाद निर्माण करण्याचं काम सत्ताधार्‍यांकडून केलं जात नाही ना असा संशय घेण्यास वाव आहे. कुठल्याही महिलेचा अवमान करणं योग्य नाही. महिलांचा सन्मान राखत जरुर टीका करा, असा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिलेला सल्ला महत्वाचा आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं आवश्यक बनलं आहे. त्यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा आरक्षित ठेवल्या गेल्या आहेत. त्यामागची हीच भूमिका आहे. पण, अनेकदा महिलांबद्दल आक्षेपार्ह विधाने करून त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम राजकीय नेत्यांकडून केलं जात असताना दिसत आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा असा अवमान कधीच सहन केला जाणार नाही, याचं भान नेत्यांनी ठेवण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -