घरसंपादकीयदिन विशेषकवी, कथा-कादंबरीकार चिं. त्र्यं. खानोलकर

कवी, कथा-कादंबरीकार चिं. त्र्यं. खानोलकर

Subscribe

चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचा आज स्मृतिदिन. चि. त्र्यं. खानोलकर हे प्रसिद्ध मराठी कवी, कथा-कादंबरीकार आणि नाटककार होते. त्यांनी ‘आरती प्रभु’ या नावाने कविता लेखन केले. त्यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी रत्नागिरीतील बागलांची राई यथे झाला. त्यांचे शिक्षण कुडाळ, सावंतवाडी आणि मुंबई येथील शाळांतून झाले.

‘गुरूकुल’ (लोणावळे), आकाशवाणीचे मुंबई केंद्र आणि मुंबई विद्यापीठ या ठिकाणी १९५९ ते १९६५ या कालखंडात नोकर्‍या केल्या. त्यानंतर मात्र केवळ लेखनासच वाहून घेतले. कवितासंग्रह : ‘जोगवा’ (१९५९), ‘दिवेलागण’ (१९६२), ‘नक्षत्रांचे देणे’ (१९७५). कादंबर्‍या : ‘रात्र काळी घागर काळी’ (१९६३), ‘अजगर’ (१९६५), ‘कोंडुरा’ (१९६६), ‘त्रिशंकू’ (१९६८). नाटके : ‘एक शून्य बाजीराव’ (१९६६), ‘सगेसोयरे’ (१९६७), ‘अवध्य’ (१९७२), ‘कालाय तस्मै नमः’ (१९७२). कथासंग्रह : ‘सनई’ (१९६४), ‘गणुराया आणि चानी’ (१९७०), ‘राखी पाखरू’ (१९७१). इत्यादी साहित्याची त्यांनी निर्मिती केली.‘कालाय तस्मै नमः’ या त्यांच्या नाट्यकृतीची १९७२ मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून आकाशवाणीतर्फे निवड झाली. खानोलकर मूलतः कवी होते.

- Advertisement -

शब्दांचे अर्थ व ध्वनी यांच्या समग्र भावाशयांचा समर्थ उपयोग कवितेप्रमाणेच ते इतर लेखनातही करून घेत. कोकणातील जीवसृष्टी व निसर्ग यांच्या परस्परानुप्रवेशी एकसंध दर्शनातून ते प्रादेशिक जीवनाचा उभा छेद सादर करतात. त्यांनी निर्मिलेल्या व्यक्ती जिवंत, हाडामासाच्या वाटतात आणि तरी त्या मूलभूत मानवी वृत्तींचे प्रतिनिधित्व करतात. आधुनिक पाश्चात्य विचारसरणी किंवा कलाविष्कार यांचे प्रत्यक्ष संस्कार खानोलकरांच्यावर नसूनही आधुनिक जाणिवेची अनेक वैशिष्ठ्ये त्यांच्या लेखनात आढळतात. अशा या प्रतिभाशाली लेखकाचे २६ एप्रिल १९७६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -