संस्कृत पंडित श्रीपाद सातवळेकर

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सातवळेकरांना औंध संस्थानातच नोकरी मिळाली (१९००) पण ती सोडून हैदराबाद संस्थानात येऊन तेथे त्यांनी आपला कलागार (स्टुडिओ) काढला

श्रीपाद दामोदर सातवळेकर हे थोर वेदाभ्यासक, वेदप्रसारक, चित्रकार, संस्कृत पंडित होते. त्यांचा जन्म 19 सप्टेंबर 1867 रोजी सावंतवाडी संस्थानातील कोलगाव येथे झाला. इंग्रजी सहावीपर्यंतचे शालेय शिक्षण सावंतवाडी येथे झाले. १८९० मध्ये त्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेच्या आणि शिल्पकलेच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांना रावबहादूर (एम. व्ही.) धुरंधर, एम. एफ. पीठावाला, एस. पी. आगासकर, ए. एक्स. त्रिंदाद यांसारखे थोर चित्रकार सहाध्यायी म्हणून लाभले. ‘जे. जे.’ मध्ये असताना त्यांना अनेक पारितोषिके मिळाली. प्रतिष्ठेचे ‘मेयो’ पदकही दोनदा मिळाले. औंध संस्थानचे अधिपती भवानराव पंतप्रतिनिधी यांचा स्नेहही त्यांना लाभला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सातवळेकरांना औंध संस्थानातच नोकरी मिळाली (१९००) पण ती सोडून हैदराबाद संस्थानात येऊन तेथे त्यांनी आपला कलागार (स्टुडिओ) काढला. एक चित्रकार म्हणून हैदराबादमध्ये त्यांचा निजामाशी संबंध आला आणि जमही बसला. व्यक्तिचित्रकार म्हणून ते ख्याती पावले. राजे, सरदार आदींनी त्यांच्याकडून आपली व्यक्तिचित्रे काढून घेतली.
या सुमारास भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जोरात होती. पंडितजी आर्य समाजाकडे आकृष्ट झाले. १९०१-१८ पर्यंत त्यांनी आर्य समाजाचे काम केले. चित्रकलेप्रमाणेच वेदाध्ययनाचा वारसाही त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला होता. त्यांनी वेदांवर व्याख्याने दिली. स्वामी दयानंद सरस्वतींच्या सत्यार्थप्रकाश व ऋग्वेदादिभाष्य भूमिका या ग्रंथांचे त्यांनी भाषांतर केले. विश्ववृत्त या कोल्हापूरच्या एका नियतकालिकातून त्यांनी ‘वैदिक राष्ट्रगीत’ (१९०७) प्रसिद्घ केले. औंध येथील वास्तव्यात ‘वैदिक धर्म’ (१९१९) हे हिंदी व ‘पुरुषार्थ’ (१९२४) हे मराठी मासिक त्यांनी काढले. त्यांतून प्रामुख्याने वैदिक वाङ्मय व तत्त्वज्ञान या विषयांचे लेखन त्यांनी केले. त्यांची ग्रंथसंपदा विपुल असून मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये त्यांचे सुमारे ४०० ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. अशा या महान संस्कृत पंडिताचे ३१ जुलै १९६८ रोजी निधन झाले.