घरसंपादकीयअग्रलेखउत्साहमूर्ती मोदी...हतबल विरोधक

उत्साहमूर्ती मोदी…हतबल विरोधक

Subscribe

भारतीय संसदेची नवी इमारत सेंट्रल व्हिस्टाचा अतिशय भव्य असा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी झाला. या सोहळ्यामध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी कालबाह्य ठरवलेला सेंगोल राजदंड पुन्हा नव्याने संसदेत स्थापित केला. या भव्य दिव्य कार्यक्रमाचे स्वरुप पाहिले तर सब कूछ मोदी, असेच चित्र उभे राहिले होते. मोदींनी स्वत: पुढाकार घेऊन बांधलेल्या या भव्य वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याने आपले डोळे दिपून जाणार आहेत. मोदींवर कायम टीकेचे बाण सोडणारे आपण चेहर्‍यावर कृत्रिम हास्य आणून हतबल होणार आहोत, या भव्य सोहळ्यात पंतप्रधान मोदींशी आपल्याला हस्तांदोलन करून त्यांचे कौतुक करावे लागणार आहे, याची विरोधकांना नक्कीच कल्पना होती. त्यामुळे राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांना निमंत्रण न दिल्याचे निमित्त करून विरोधकांनी या सोहळ्याला जाण्याचे टाळले. खरे तर दौपदी मुर्मू या भाजपच्या वतीने राष्ट्रपती झालेल्या आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठी सध्या जे विरोधात आहेत, त्यांनी मतदान केलेले नव्हते. त्यामुळे मोदींनी राष्ट्रपतींना निमंत्रित केले नाही, याविषयी विरोधकांना कळवळा वाटण्याचे काही कारण नव्हते, हे अगदी सहज समजण्यासारखे होते. त्यामुळे तो त्यांचा दिखावा होता हे दिसून आले. खरे तर लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष आहे, तरीही मोदींना पाडण्यासाठी देेशातील विरोधी पक्षाचे नेते देशव्यापी आघाडी करण्यासाठी एकमेकांच्या भेटी घेत आहेत. मोदी हे कसे लोकशाहीविरोधक आहेत, आता जर मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर पुन्हा देशात लोकसभेच्या निवडणुका होणार नाहीत, देशातील लोकशाही अस्तंगत होऊन मोदींची हुकूमशाही येईल, असे आरोप विरोधी पक्षांकडून होत आहेेत. त्यामुळेच काहीही करून यावेळी मोदी आणि भाजप यांना रोखायलाच हवे, यासाठी विरोधकांची धडपड सुरू आहे.

आजवर भारत हा तसा थर्ल्ड वर्ल्ड कंट्रिजमध्ये गणला जाणारा देश होता. जगातील प्रगत देशांच्या नजरेत एक गरजू देश अशीच भारताची प्रतिमा होती, पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर मात्र परिस्थिती बदलली, अर्थात, मोदींच्या आगमन कालात जागतिक परिस्थितीही बदलली होती, ती मोदींना पोषक ठरली. असे असले तरी त्याचा फायदा घेण्यासाठी जी हिंमत लागते ती मोदींनी दाखवली. मोदींनी जगातील अनेक प्रगत देशांशी करार करून मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक भारतात येईल, याची सोय केली. भारतीय स्वत:हून काही करू शकतात, हा विश्वास जागवला. कुठल्याही गोष्टीत अतिशय भव्यता असायला हवी, हा मोदींचा सुरुवातीपासून ध्यास होता. त्यातून सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात जास्त उंचीचा पुतळा गुजरातमध्ये उभारण्यात आला. हा पुतळा चीनकडून बनवून घेण्यात आला, अशी टीका विरोधकांकडून झाली, पण मोदींनी तो भव्य पुतळा उभा करून दाखवला हे महत्वाचे असल्यामुळे विरोधकांच्या त्या टीकेला तसा अर्थ राहिला नाही. दिल्लीत ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आलेल्या शासकीय इमारती आता जुन्या झाल्या आहेत, त्यामुळे त्याविषयी विचार करायला हवा, अशी चर्चा सरकारी पातळीवर सुरू होती. पण त्याला हात कुणी घालायचा असा प्रश्न होता. आताची संसदेची इमारत ही जुनी तर झालीच आहे, पण त्याचबरोबर पुढील काळात वाढणारी खासदारांची संख्या आणि शासकीय कार्यालयांसाठी ती अपुरी पडत होती. मोदींनी पुढील अनेक वर्षांचा विचार करून संसद भवनाची नवी इमारत उभारण्याचा संकल्प करून तो त्यांच्या कार्यकालातच पूर्ण केला. एखाद्या प्रकल्पाचे उद्घाटन करून तो आपल्याच कार्यकालात पूर्ण करण्याची किमया मोदींनी अनेक प्रकल्पांच्या बाबतीत करून दाखवली आहे. मोदींचा कामाचा हा धडाका विरोधकांना अचंबित करून टाकणारा आहे. राम मंदिर, काश्मीरमधील ३७० कलम रद्द, तिहेरी तलाक रद्द करणे या अशक्यप्राय वाटणार्‍या गोष्टी त्यांनी करून दाखवल्या आहेत.

- Advertisement -

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा लोकसभेत प्रवेश करताना त्यांनी संसद भवनाच्या पायर्‍यांवर डोके टेकवून दंडवत घातला. आज संसद भवनाचे उद्घाटन करताना बरेच धार्मिक विधी करण्यात आले. धर्म हा मानवी जीवनाचा भाग आहे, कारण मानवाच्या उत्क्रांतीतच धर्माची निर्मिती झालेली आहे. पण राजकारणात धर्माचा फार हस्तक्षेप होऊ लागला तर मात्र राजकारणाला धार्मिक रंग येण्याची दाट शक्यता असते. या भव्य सोहळ्याचे आयोजन करताना मोदींनी राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांना निमंत्रित केले नाही, ही घटना खटकणारी आहेच. पण जेव्हा पंतप्रधानांकडे त्यांच्या पक्षाचे बहुमत असते तेव्हा राष्ट्रपती हे रबर स्टॅम्प असतात हे स्वत: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही दाखवून दिले आहे. सध्या मोदींकडे बहुमत आहे, तसेच निवडून आलेल्या खासदारांवर चांगलाच वचक आहे. त्यामुळे त्यांना एनडीएतील मित्र पक्षांचीही तशी गरज राहिलेली नाही. तसेच मोदी जेव्हा विदेशात जातात, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी होते. मोदींची ही लोकप्रियता पाहून देशवासीयांचे मन मोहरून येते. कधी काळी प्राणीही खाणार नाहीत असे गहू भारताला पाठविणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आज पंतप्रधान मोदींना ऑटोग्राफ प्लिज म्हणतात. त्यामुळे मोदींचा उत्साह प्रचंड वाढलेला आहे, पण तो लोकशाहीच्या मुळावर येणार नाही, याचीही त्यांनी काळजी घ्यायला हवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -