घरसंपादकीयओपेडअब्दुल सत्तारांची दुर्बुद्धी सुप्रिया सुळेंसाठी इष्टापत्ती!

अब्दुल सत्तारांची दुर्बुद्धी सुप्रिया सुळेंसाठी इष्टापत्ती!

Subscribe

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी गलिच्छ भाषेचा वापर केल्यानंतर उभ्या महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली. राष्ट्रवादी काँग्रेससोबतच अनेकांनी सत्तारांचा निषेध केला. एका महिलेविषयी एक मंत्री इतक्या वाईट प्रकारे बोलतो, हे लक्षात आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तारांना दिलगिरी व्यक्त करण्याचे आदेश दिले. सत्तार यांनी वापरलेल्या भाषेचे कुणीही समर्थन करू शकणार नाही, पण त्यांना सुचलेल्या दुर्बुद्धीचा राज्यभरातून निषेध होत असताना त्याच वेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेल्या संयमित प्रतिक्रियेतून त्यांचे सुसंस्कृत व्यक्तिमत्व उजळून निघाले आहे. त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पुढील काळात पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांना मिळू शकेल.

राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या फडणवीस आणि शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या शिवराळ आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. पूर्वी शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचा छातीठोक दावा करणारे अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केलेल्या खोके टीकेला उत्तर देताना अतिशय खालची भाषा वापरली. आपण एका महिलेला उद्देशून हे बोलत आहोत, याचेही भान त्यांना राहिले नाही. पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी त्याच शिवीचा वारंवार उच्चार करत सगळी राजकीय नेते मंडळीही तशीच आहेत, असे बोलून खरे तर सगळ्या राजकीय नेते मंडळींचेच वस्त्रहरण केले. सत्तार यांनी अशी खालच्या दर्जाची भाषा वापरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, पण त्यांनी थेट सुप्रिया सुळे यांच्याविषयी ती भाषा वापरल्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने राज्यभर रस्त्यावर उतरले. त्यांनी सत्तार यांचे पुतळे जाळून निषेध केला.

काहींनी सत्तारांच्या घरावर दगडफेक केली. सत्तारांच्या विरोधात आक्रमक आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर राज्यातील विविध स्तरातील महिलांकडून सत्तारांचा निषेेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या प्रतिनिधींनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्य महिला आयोगासह अगदी राष्ट्रीय महिला आयोगापासून ते लोकसभा अध्यक्षांपर्यंत अब्दुल सत्तारांवर कारवाईसाठी धाव घेण्यात आली आहे. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राज्यात तापणारे वातावरण लक्षात घेतल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तार यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सत्तार थोडेस वरमले आणि त्यांनी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी पत्रकारांशी बोलताना, अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य हे चुकीचे आहे. त्याचे समर्थन होेऊ शकत नाही, संयम सगळ्यांनीच पाळायला हवा. पण सारखे खोके खोके करू नये, असे सांगितले.

- Advertisement -

सुप्रिया सुळे या त्यांचा संयमी स्वभाव आणि संतुलित वक्तव्य यासाठी ओळखल्या जातात. त्या वक्तशीर आणि अभ्यासू आहेत, त्यामुळे त्यांना सात वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले आहे. त्याचसोबत त्या राज्य आणि देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार यांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी गलिच्छ भाषा वापरली गेल्यानंतर मोठी प्रतिक्रिया उमटणे सहाजिक होते. दोन दिवस राज्यात त्यावर आंदोलन सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी आपल्या संयमित स्वभावाला अनुसरून अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत अतिशय संयमित भाषेत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे बोलणे ही आपली पंरपरा नाही. तारतम्य न बाळगणार्‍या लोकांविरोधात प्रतिक्रिया आल्या. संवेदना व्यक्त केल्या ही बाब आश्वासक आहे.

आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूया आणि महाराष्ट्राची संस्कृती जपूया, कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. सुप्रिया सुळे यांनीच खुद्द संमजसपणा घेऊन शांततेचे आवाहन केल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेले आक्रमक आंदोलन शांत होईल. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी होईल, मालमत्तेचे नुकसान होणार नाही, सामान्य माणसांची गैरसोय होणार नाही. त्यात पुन्हा सुप्रियाताई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना कुठलीही टीकात्मक किंवा आक्षेपार्ह भाषा वापरली नाही, त्यामुळे महाराष्ट्रभरात त्यांची प्रतिमा अधिक उजळून निघाली आहे. त्याचा त्यांना महाराष्ट्रातील पुढील राजकीय वाटचालीत मोठा फायदा होणार आहे, यात शंका नाही. कारण महाराष्ट्राच्या राजकारण विविध राजकीय नेत्यांच्या कन्या सक्रिय आहेत. त्या सगळ्यांच्या तुलनेत सुप्रिया सुळे त्यांच्या संयमितपणामुळे आणि परिपक्व विचारांमुळे उठून दिसतात. आपल्याकडून कुठलेही आक्षेपार्ह विधान होणार नाही, त्यामुळे जनमानसातील आपली प्रतिमा खराब होणार नाही, याची त्या काळजी घेत असतात.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यस्थानी येण्यासाठी बाकीच्या नेत्यांच्या कन्यांची जोरदार स्पर्धा सुरू असते. त्यासाठी त्या त्यांच्याच पक्षातील नेत्यांवर प्रसंगी आक्रमक टीका करतात, पण सुप्रियाताई महाराष्ट्राच्या राजकारणात अशी कुठलीही स्पर्धा करत नाहीत, त्यामुळेच एक संयमी आणि सुशील व्यक्तिमत्व अशी त्यांची प्रतिमा लोकांसमोर आहे. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या संदर्भात जे गलिच्छ शब्द वापरले, आपण एका महिलेला उद्देशून ते शब्द वापरत आहोत, याचाही सत्तार यांना विसर पडला. खरे तर आता सुप्रियाताईंचा पक्ष सत्तेवर नाही, त्यामुळे या वादग्रस्त प्रकरणाचा सत्ताधार्‍यांविरोधात भरपूर फायदा घेता असता, आक्रमक भाषा वापरता आली असती, पण त्यांनी तसे न करता आपल्या कार्यकर्त्यांना सुबरीचा सल्ला दिला. एका महिलेविषयी सत्तार यांनी गलिच्छ शिवी वापरल्यामुळे खरे तर राज्यातील सगळ्याच महिलांसाठी ही बाब धक्कादायक होती. त्यांच्या भावनाही दुखावल्या गेल्या होत्या. पण सुप्रिया सुळे यांनी ज्या संयमितपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त करून शांततेचे आवाहन केले, त्यामुळे राज्यातील बहुसंख्य महिला वर्गाच्या मनात त्यांच्याविषयी आदराचे आणि आपलेपणाचे स्थान निर्माण झाले आहे. त्यांच्या या परिपक्वपणाचा त्यांना फायदा होईल.

सुप्रिया सुळे यांच्याविषयी सत्तार यांनी गलिच्छ विधान केल्यानंतर महाराष्ट्रभर हलकल्लोळ उडालेला असताना राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मात्र याविषयी आपली कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अजितदादा यांच्या मौनाबद्दल सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. कारण अजित पवार हे अशा प्रसंगी आक्रमक प्रतिक्रिया देण्यासाठी ओळखले जातात. शिर्डी येेथे नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनाला पहिल्या दिवशी अजितदादा उपस्थित होते, पण दुसर्‍या दिवशी अधिवेशनाला शरद पवार गेल्यावर अजित पवार तिकडे फिरकले नाहीत. काहींच्या मते अजित पवार हे सध्या काही कामासाठी विदेशात गेलेले आहेत, त्यामुळे त्यांची कुठलीही प्रतिक्रिया येत नाही. असे असले तरी अजितदादांची नाराजी हा काही नवा विषय नाही, ती बरेचदा उफाळून आलेली महाराष्ट्राने पाहिलेली आहे. राष्ट्रवादीच्या काही विशेष कार्यक्रमांना अजितदादांनी दांडी मारल्याचे दिसून आलेले आहे. त्यावेळी आश्चर्य व्यक्त करण्यात आलेले आहे. त्यावेळी काही कारण सांगून पक्षाकडून वेळ मारून नेण्यात येतेे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भल्या पहाटे अजितदादांनी घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ हे त्यांच्या नाराजीचा ढळढळीत पुरावा देणारे उदाहरण आहे. शरद पवार यांचा राजकीय वारसदार कोण, अजित पवार की सुप्रिया सुळे, हा प्रश्न नेहमीच चर्चेत येत असतो. सुप्रिया सुळे या राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी अनेक वर्षांपासून अजितदादा शरद पवारांसोबत राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे तेच शरद पवारांचे वारसदार असणार असेच लोकांना वाटत होते, पण सुप्रिया सुळे यांचा राजकारणात अचानक प्रवेश झाल्यानंतर मात्र शरद पवार यांचा नेमका राजकीय वारसदार कोण, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. अजितदादांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. त्यांच्यामध्ये धडाडी आहे. पण अजितदादा हे स्वत:हून निर्णय घेणारे असल्यामुळे त्यांच्याकडे मुख्य सूत्रे दिली तर ते आपल्याला ऐकतील का, असाही प्रश्न शरद पवारांच्या मनात असावा, त्यामुळेच १९९९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादांना मुख्यमंत्री बनवण्याची संधी आलेली असताना शरद पवार यांनी केंद्रात महत्वाची खाती वाढवून घेऊन महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले. याची बोच नक्कीच अजितदादांच्या मनात असणार यात शंका नाही.

पुढील काळात शरद पवार यांनी अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद दिले, पण ते घेण्यासाठी अजितदादादा तयार नव्हते, कारण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असे दिसून येते की, जो उपमुख्यमंत्री होतो तो कधीच मुख्यमंत्री झालेला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारताना अजितदादा साशंक होते. कारण हेच आपले शेवटचे उच्चपद तर ठरणार नाही ना, असे त्यांना वाटत असावे. २०१९ साली शरद पवार यांनी पुढाकार घेऊन शिवसेना आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले तेव्हाही अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदच मिळाले होते, हे लक्षात घ्यावे लागेल. त्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांशी फारसे पटत नाही, अशा नेत्यांचाही एक गट आहे. तो आज शरद पवारांमुळे गप्प आहे, पण पुढील काळात हा गट सुप्रिया सुळे यांना पुढे आणून अजितदादांना शह देऊ शकतो.

सुप्रिया सुळे या खासदार असल्या तरी अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात जास्त रस घेताना दिसत आहेत. त्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची जास्त संख्या नाही, त्यामुळे त्यांचा दिल्लीत फारसा प्रभाव पडत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाकडे सुप्रिया सुळे यांचे लक्ष वळल्यास आश्चर्य वाटू नये, कारण राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असला तरी महाराष्ट्रातच त्यांचा प्रभाव आहे, या पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार हेच त्याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला आहे. परिणामी सुप्रिया सुळेंसाठी महाराष्ट्राची राजकीय जमीन ही अधिक सुपीक आहे. त्यात पुन्हा विविध राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री झाल्या, पण अजून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री झालेली नाही, याची खंत सामाजिक विश्लेषक व्यक्त करत असतात.

दुसर्‍या बाजूला भाजपने अडीच वर्षे सर्व प्रकारचे उपाय केले तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडत नव्हते, शेवटी शिवसेनेतील नाराजांच्या गटाला हाताशी धरून त्यांनी ठाकरे सरकार पाडले. पण फडणवीस आणि शिंदे यांचे सरकार भाजपने ज्या प्रकारे सत्तेत आणले. शिवसेनेचे जे तुकडे उडवले. अगदी त्यांचे निवडणूक चिन्ह आणि नावही जाण्याइतकी परिस्थिती आणली हे काही महाराष्ट्रातील मराठी मनाला पटलेले नाही. त्यामुळेच अंधेरी पूर्व येथील विधानसभेची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी महाराष्ट्रभरातून फौजफाटा गोळा करणार्‍या भाजपला ऐनवेळी माघार घ्यावी लागली. मराठी अस्मिता आपल्यावर उलटणार हे भाजपच्या लक्षात आले होते, त्यामुळे पहिला घास घ्यायला जावे आणि त्यात माशी पडलेली असावी, असे होऊ नये म्हणून आपला उमेदवार मागे घेऊन त्यांनी औदार्याचे प्रदर्शन केले, पण पुढील काळात त्याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीलाच याचा फायदा होईल असे दिसते. पहिल्या वेळी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती, आता दुसर्‍या वेळी ती संधी आपोआप राष्ट्रवादी काँग्रेसकडे येते, आणि त्याच्या मानकरी सुप्रिया सुळे ठरू शकतात.

 

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -