घरसंपादकीयओपेडमहिलांवर होणार्‍या अत्याचाराबाबत बधिर भवताल!

महिलांवर होणार्‍या अत्याचाराबाबत बधिर भवताल!

Subscribe

मीरा रोडमधील सरस्वती वैद्य हत्या प्रकरण, मुंबईतील लोकलमध्ये कथित अत्याचाराची घटना, चर्चगेटमध्ये वसतिगृहात तरुणीची झालेली हत्या, त्यानंतर पुण्यात दर्शना पवार या एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीचे बेपत्ता होणे, त्यानंतर तिचा आढळलेला मृतदेह, या घटनेतील या तरुणीची मैत्रीणही बेपत्ता असल्याची माहिती आहे. वरील घटना या मागील एका महिन्याच्या कालावधीतील आहेत. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा विषय गांभीर्याने घेतला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राजधानी दिल्लीतही महिनाभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून भीषण हत्या करण्यात आली.

सरस्वती वैद्य हत्या प्रकरणातील तपास सुरू आहे. जे. जे. रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ या घटनेतील आरोपीच्या वर्तनाचा अभ्यास करत आहेत. महिला आणि मुलींवरील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटना या चिंतेची बाब असताना प्रतिकात्मक वादात माध्यमांचे रकाने भरले जात आहेत, तर वृत्तवाहिन्यांवरही धार्मिक अस्मितांच्या चर्चा घडवल्या जात आहेत. या वरील चारही घटनांकडे सरकारी यंत्रणा, महिला संघटना आणि माध्यमांचेही दुर्लक्ष झाले आहे. या घटनांमध्ये बळी गेलेल्या मुलींविषयी जी माहिती मिळतेय, त्यानंतरही मानवी संवेदना बधिर झाल्यासारखी स्थिती आहे. मीरा रोडमधील सरस्वती वैद्य हत्या प्रकरणातील घटनेत ‘कुकर’ चा संदर्भ या त्याआधीच्या आफताब प्रकरणातील ‘फ्रिज’च्या संदर्भाविरोधात वापरला जात होता. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडातील सामाजिक संदर्भ हा ‘आफताब’ नावाच्या आरोपीमुळे धार्मिक मुद्याकडे वळवण्यात समाजमाध्यमांना यश आले होते. महिलेच्या हत्येपेक्षा आरोपीच्या धर्माचा हवाला देऊन एकमेकांच्या समुदायांना लक्ष्य करण्याचे प्रकार माध्यमांमध्ये त्याही वेळेस नवे नव्हते. हाच प्रकार सरस्वती वैद्य हत्याकांडानंतर समोर आला. यातील आरोपीचे नाव ‘आफताब’ नाही. आता काय कराल, असा प्रश्न समाजमाध्यमांमध्ये चर्चिला गेला. यातील आरोपीचे नाव ‘साने’ होते, तर सरस्वतीचे ‘वैद्य’ असण्यावरही पुरेशी ‘गंभीर’ चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. सरस्वती हत्याकांडातील बळीत सरस्वतीचं ‘अनाथ’ असणं याशिवाय ‘साने’ सारख्या वयाने जवळपास दुप्पट असलेल्या माणसासोबत तिचं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं, त्यानंतर या दोघांनी लग्न केल्याची बातमी समोर येणं, यातून सरस्वती वैद्यच्या हत्येमागे केवळ आरोपी सानेचा एकच चेहरा नाही हे स्पष्ट व्हावे. अनाथ महिलांची जबाबदारी घ्यायला महानतेचा टेंभा मिरवणारी इथली समाज, जात आणि धर्म व्यवस्थाही किती कुचकामी ठरली हेच स्पष्ट व्हावे. एखाद्या तरुण अनाथ मुलीला भवतालमध्ये पुरुषाशिवाय जगणं किती कठीण असावं, त्यातूनच सानेसारख्या विकृतीचा कळस गाठणार्‍यांना असा भयंकर गुन्हा करण्याची संधी मिळावी, यासाठीची पोषक रचना इथल्या भवतालनेच करून दिल्याचे स्पष्ट आहे. सरस्वतीच्या हत्येचा चेहरा जरी सानेचा असला तरी येथील महिलाविषयक सामाजिक धारणांचा हा भयानक परिणाम आहे का? असा प्रश्न आहे. सानेच्या मानसिक स्थितीचा ‘कायदेशीर फायदा’ मिळवून घेण्याचा प्रयत्न या आरोपीकडून होत असणार हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत सरस्वतीच्या ‘हतबल मानसिकेतेचाही विचार’ खचितच दुर्लक्षित करण्यासारखा नाही. अनाथ सरस्वतीच्या जगण्यात ही हतबलता कशी कुठून पेरली गेली, साने हा तिचा नाईलाज होता का? जर तो नाईलाज होता, तर तिच्यावर ही वेळ कशी आली याचा विचार सामाजिक आरोग्याचा विचार करणार्‍या घटकांनी गंभीरपणे करायला हवा. केवळ आरोपी सानेला कायदेशीर मार्गाने शिक्षा करून हा प्रश्न संपणारा नाही.

सरस्वतीच्या चार बहिणी होत्या. त्याही अहमदनगरच्या अनाथालयातच वाढल्या. चार बहिणी आणि जबाबदारी घेणारा भाऊ, पिता, नातेवाईक एकही पुरुष नाही. अशा परिस्थितीचा गैरफायदा सानेनं घेतला. 22 वर्षे वयाच्या सरस्वतीला सानेनं आपुलकी दाखवली. 22 हे वय पुरेपूर जगरहाटी समजण्याचं असतं का? माणसांची पारख करण्याचं असतं का? असे प्रश्न चांगल्या संस्कारी कुटुंबातील वयात येणार्‍या मुलामुलींसाठी सुरक्षिततेतून ‘राखीव’ असतात. सरस्वती आणि तिच्या बहिणींच्या अनाथालयातील संगोपनाने दुनियेची ओळख करून देणारे हे प्रश्न केव्हाच निकालात निघाले होते. हतबलतेतून निर्माण झालेली गरज अनेकदा धोका पत्करायला लावते आणि असा धोका सानेसारखा आपुलकी, जिव्हाळा दाखवून आला असेल तर तो जास्त फसवा, घातकी आणि विषारी वेदना देणारा ठरू शकतो. २०१३ मध्ये सानेशी सरस्वतीची ओळख झाली होती. वयानं कितीतरी मोठा असलेल्या आणि सगळ्यांना ‘मामा’ अशी ओळख करून दिलेल्या सानेला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडण्यामागे सरस्वतीचा नाईलाज होता. म्हणून या नात्याला लिव्ह इन रिलेशनशिपचं पांघरुण घालण्यात आलं. केवळ जगण्यासाठी ‘साने’ला स्वीकारण्यापलीकडे कुठलाही पर्याय न ठेवणार्‍या इथल्या भवतालनंच सरस्वतीची भीषण शोकांतिका केली. बाईला पुरुषाची ‘गरज’ असतेच, त्याशिवाय बाईपण पूर्ण होत नाही, अशी शिकवण देणारा इथला भवताल सानेपेक्षा कित्येक पटीनं जास्त धोकादायक आहे. हा भवताल इतका बधिर असतो की सरस्वतीचे तुकडे झाल्यावरही आरोपी सानेच्या जातधर्म आणि सरस्वतीच्याही जातधर्माची चर्चा करतो. त्यावरून आपला जातीय, धार्मिक अभिनिवेष कुरवाळतो. एका उमलत्या वयाच्या मुलीच्या भीषण शोकांतिकेबाबतच भवताल उदासीन असतो. ही मुलगी असण्यापेक्षा तिचे ‘वैद्य’ असणं जास्त महत्त्वाचं ठरतं.

- Advertisement -

दुसर्‍या घटनेत चर्चगेट येथील वसतिगृहात एका मुलीवर अत्याचार होतो. त्यानंतर तिची हत्या होते. या घटनेमागील कारणांचा शोध घेताना महिलांच्या ढिसाळ व्यवस्थेविषयी माध्यमांमध्ये लिहिले बोलले जात नाही. याविषयी संबंधित यंत्रणेला जाब विचारण्याची गरज याच भवतालला नसते. या भवतालमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणार्‍या सरकारी यंत्रणा, संघटना, माध्यमे, स्त्री संघटनाही येतात. वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर पीडित मुलीला एकटीलाच का ठेवलं होतं, असा प्रश्न पीडितीचे कुटुंबीय विचारतात. मजल्यावरील आणि इमारतीतीलही काही सीसीटीव्ही काम करीत नसल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर सहा-सात जणांचे जबाब घेतले जातात. पीडितेच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्याचा आणि अशी परिस्थिती पुन्हा कुठल्याही महिला, मुलीवर येणार नाही यासाठी ठोस धोरणाची अंमलबजावणी करण्याची चर्चा यावेळीही केली जाते. या महिलेच्या मृत्यूनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते वसतिगृहाची पाहणी करतात. त्यावेळी ही महिला ‘आपली’ नाही, असाच सूर खुल्या समाजमाध्यमांवरून आळवला जातो. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्यांकडून या विषयाचे गांभीर्य इथेही बर्‍यापैकी निकालात निघालेले असते. या घटनेतील आरोपी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची बातमी घटनेनंतर थोड्याच तासांनी समोर येते. यानंतर ही चर्चा थंडावली जाते आणि महिला, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा दुर्लक्षिला जातो. प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला स्वत:चे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुणी कुणाच्या प्रेमात पडावे याविषयी काही ठरवता येत नाही, पण महिला या बहुधा पुरुषांच्या क्रौर्याला बळी पडत असतात असेच दिसते.

महिलांवरील अत्याचार याआधीही होत होतेच. नैना साहनी हत्याकांड, उल्हासनगरातील रिंकू पाटील प्रकरणानंतरही गंभीर चर्चा झाल्या होत्या, मात्र त्यावेळी सोशल मीडिया नसल्यानं अधिकृत समाजमाध्यमांनी या घटनांचा मागोवा घेतला होता. आज अशी परिस्थिती नाही. एका महिन्याच्या कालावधीतच वरील चार घटना घडल्या आहेत. यातील एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलीचा मृतदेह सापडण्याची घटना तर अगदी काही तासांपूर्वीची आहे. या मुलीची मैत्रीण बेपत्ता असल्यानं तिचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. त्यानंतर या प्रकरणाची माहिती समोर येईलच, परंतु समाज नावाच्या आपल्याला घेरून असलेल्या या भवतालमध्ये महिलांना शिकार करणार्‍या टोळ्या सक्रिय असल्याचं स्पष्ट व्हावं. या टोळीतील ‘माणूस’ नाव असलेली विकृती वाढण्यामागची कारणं शोधण्याची गरज आहे. अशा विकृती रेल्वे पुलावर, पुलाखालीच सापडतात असं नाही. त्या कुटुंबातील नातेवाईकांमध्येही असू शकतात. अल्पवयीन मुलामुलींचे शोषण हे अनेकदा कुटुंबातील नातेवाईकांकडूनच झाल्याची उदाहरणे आहेत. आपुलकी ‘दाखवणारी’ किंवा प्रेमाचं नाव देऊन आपले विकृत हेतू साध्य करणारी टोळी ही केवळ लव्ह जिहादपुरता विषय नाही. हा असा अत्याचार केवळ ‘धार्मिकतेवर उगवलेला लैंगिक सूड’ इतक्या मर्यादेत येत नाही, मात्र अत्याचाराला धार्मिक, जातीय रंग देऊन आपले हेतू साध्य करणारे घटकही याच भवतालमध्ये सक्रिय असतात. हेच घटक समाजमाध्यमांवर ‘कुकर’ आणि ‘फ्रिज’मध्ये स्पर्धा लावून असंवेदनशीलतेचा कळस गाठतात. पीडित मुलीच्या नावावरून ‘तर्क’निष्ठ निष्कर्ष काढतात. या महिलांसाठी केवळ महिलांचे मोर्चे निघत नाहीत. मोर्चे ‘आपापल्या’ जातधर्माच्या महिलांसाठी निघतात, त्यांचेच निषेध होतात.

- Advertisement -

सरस्वतीची हतबलता, वसतिगृहातील, लोकल ट्रेनमधील मुलीची असुरक्षितता, दिल्लीतील अल्पवयीन मुलीचं भीषण हत्याकांड आणि अगदीच काही तासांपूर्वी एमपीएससी पुण्यातील मुलीचा मृतदेह सापडण्याची घटना, यात एक साम्य आढळेल. या सर्व महिला बळी पडण्यामागे असणारा ‘पुरुषी घटक’ पोसणारा समुदाय आपला भवताल घेरून आहे. या मुलींच्या रक्ताने थेट आरोपीचे हात बरबटलेले असले तरी या हातांना इथल्या आपल्या भवतालानंच बळ दिलंय का, या प्रश्नाचं उत्तर आपलं ‘उदासीन सोयीस्कर साळसूदपण’ बाजूला ठेवून शोधायला हवं. नीट पाहिलं तर या रक्ताचे काही डाग आपल्याला आपल्याही पांढरपेशा कपड्यांवर दिसतील.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -