घरसंपादकीयओपेडसबसे बडा खिलाडी..दादा, भाऊ की भाई...?

सबसे बडा खिलाडी..दादा, भाऊ की भाई…?

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्वत: आणि त्यांच्या समर्थकांना दादा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत असले तरी योग्य संधीची वाट पाहण्याखेरीज सध्या पर्याय नाही. याबरोबरच या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये जे खरे चाणक्य आहेत, अशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील मुख्यमंत्रीपदावर पुन्हा यायचंच आहे. सध्या मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनाही पुढेही आपले हे पद टिकवून ठेवायचे आहे, मात्र या तिन्ही नेत्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात कोण किती खासदार निवडून आणतो यावर पुढील मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्याच पक्षाच्या प्रमुखाविरोधात व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटले आणि शिवसेनेच्या ४० व ठाकरे समर्थक १० अपक्ष अशा एकूण तब्बल ५० आमदारांसह थेट गुवाहाटी गाठली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी सातत्याने घडत आहेत. या नाट्यमय घडामोडींमुळेच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तर काही दिवसांपूर्वीच विधानसभेचे विरोधी पक्षनेते व तब्बल चौथ्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले राष्ट्रवादीचे मातब्बर नेते अजित पवार यांनी त्यांच्याबरोबर समर्थक आमदारांसह राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.

अजितदादा यांनी स्वतः तर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र त्यांच्याबरोबर आणखीन ८ राष्ट्रवादीच्या आमदारांनीदेखील मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे एकीकडे ज्या शिंदे फडणवीस सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे शीर्षस्थ नेतृत्व महाराष्ट्रातील सक्षम डबल इंजिन सरकार म्हणत होते या डबल इंजिन सरकारमध्ये अजित पवार यांचा समावेश झाल्याने आता हे सरकार ट्रिपल इंजिन सरकार झाले आहे. त्यातही ट्रिपल इंजिन हा शब्द काहीसा सरकारच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार असल्यामुळे या सरकारमधील चाणक्य देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी ट्रिपल इंजिन सरकारऐवजी हे त्रिशूळधारी सरकार असल्याचे सांगण्यात सुरुवात केली आहे.

- Advertisement -

अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनातच बोलताना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी २०२४ पर्यंत एकनाथ शिंदे हेच कायम असतील, असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे, मात्र त्यानंतरही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत माध्यमांमध्ये होणारी चर्चा ही काही थांबलेली नाही. यामध्ये राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कट्टर समर्थकांचा जो वर्ग आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जे अजितदादा या सरकारमध्ये येण्यापूर्वी तब्बल तीन वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेले आहे अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध डावलून केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यासाठी आलेले नाहीत. त्यांना दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मुख्यमंत्रीपदाबाबतचा स्पष्ट शब्द असल्याखेरीज ते शिंदे फडणवीस सरकारमध्ये काही सामील झालेले नाहीत, ही राष्ट्रवादीच्या अजित पवार समर्थक नेत्यांची धारणा आहे.

त्यामुळेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चा आता संगीत खुर्चीच्या खेळासारख्या प्रसारमाध्यमांपासून ते जनतेपर्यंत रंगत आहेत. यामध्ये प्रामुख्याने राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा ही गेल्या सव्वा वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत सक्षमपणे चालवत असले तरी अजित पवार हे या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाल्यामुळे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे भाजपमधील चाणक्य तब्बल पाच वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलेले हे शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील अत्यंत तगडे नेतृत्व आणि प्रशासनावर स्वतःची एक हाती हुकूमत असलेले अजित पवार यांच्यासारखे मातब्बर आणि मुरब्बी नेते हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे साहजिकच या दोन अत्यंत वरिष्ठ उपमुख्यमंत्र्यांच्या सावलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काम करावे लागत आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.

- Advertisement -

अर्थात एकनाथ शिंदे हे ज्या परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या ४० आणि १० अपक्ष अशा तब्बल ५० आमदारांना घेऊन भाजपबरोबर सत्ता स्थापन करण्यास तयार झाले, त्यावेळची परिस्थिती आणि स्थिर डबल इंजिन सरकार असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या समर्थक आमदारांसह सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेळची परिस्थिती या दोन्ही परिस्थितींमध्ये बरीच तफावत आहे. ही तफावत लक्षात घेण्याची गरज आहे. मुळात शिवसेनेमध्ये यापूर्वी बंड झालेली होती मग ते शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या १२ आमदारांसह केलेली बंडखोरी असो की त्यानंतर माजी मुख्यमंत्री व आत्ताचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले बंड असो किंवा त्यानंतरही राज ठाकरे यांनी केलेले उघड बंड असो.

शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव अथवा बंड आणि त्यापूर्वी शिवसेनेत झालेली अन्य बंडे यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरून अविश्वास ठराव येण्याआधीच पायउतार होणे अधिक पसंत केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेले जे कोणी आमदार, खासदार होते, नगरसेवक होते, तसेच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी होते त्यांना कुणालाही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ज्याप्रकारे आक्रमक शिवसैनिक घडवत असत आणि अशा आक्रमक आणि जहाल शिवसैनिकांना सत्तेच्या पदांवर बसवत असत.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले तेदेखील बरेच बोलके होते, मात्र त्या मागची उद्धव ठाकरे यांची अंतस्थ भूमिका थोडी वेगळी होती जी त्यांच्या भाषणांमधून आता बर्‍याच वेळा पुढे येते. कोणत्याही झाडाची जुनी पाने गळून गेल्यानंतर त्या झाडाला पुन्हा नवीन पालवी फुटत असते. हे ते आपल्या भाषणात वारंवार सांगतात. तथापि एकनाथ शिंदे एक केवळ शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले नाही तर थेट शिवसेनेवरच कब्जा केला.

एवढं सविस्तर सांगण्याचे प्रयोजन म्हणजे शिंदे फडणवीस सरकारमध्ये आता ट्रिपल इंजिन म्हणून दाखल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अगदी आजही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मला मुख्यमंत्री व्हायचे आहे हे आता काही स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असा रोखठोक प्रश्न विचारत त्यांचा मुख्यमंत्रीपदावरचा दावा अधिक प्रभावीपणे मांडला. अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचे आहे यात काही नवीन नाही. त्यात पुन्हा एकनाथ शिंदे यांच्यासारख्या कमी अनुभवी नेत्याच्या हाताखाली काम करावे लागत असल्यामुळे दादांचा स्वाभिमान दुखावत असणार. मात्र असे असले तरी पुणे येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर कार्यक्रमात अजित पवार यांना उद्देशून दादा आपने देर करदी, असे बोलून एक प्रकारे त्यांना तूर्त तरी उपमुख्यमंत्री म्हणूनच काम करावे लागणार, असे संकेत दिले.

त्यामुळे अजित पवार यांना कितीही वाटत असले आणि त्यांच्या समर्थकांना दादा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत असले तरी योग्य संधीची वाट पाहण्याखेरीज सध्या पर्याय नाही आणि याबरोबरच या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये जे खरे चाणक्य आहेत, ज्यांच्या पाठीशी भाजपच्या १०५ आमदारांचं प्रबळ पाठबळ उभे आहे, अशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील मुख्यमंत्रीपदावर पुन्हा यायचंच आहे, मात्र या तिन्ही नेत्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपला ४५ खासदार निवडून आणायचे आहेत. खासदार निवडून आणणे ते नगरसेवक निवडून आणणे इतके सोपे नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघाही नेत्यांचा पूर्ण कस लागणार आहे. केंद्रीय भाजप नेत्यांना महाराष्ट्रातील सत्तेपेक्षा देशाची सत्ता अत्यंत महत्त्वाची आहे आणि देशाची सत्ता ही निवडून आलेल्या खासदारांवर ठरत असते.

त्यामुळे जर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १८ ते २० च्या दरम्यान शिवसेनेचे खासदार निवडून आणू शकले तर निश्चितच २०२४ नंतरही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा ही शिंदे यांच्याकडे जाण्याची चिन्हे आहेत. अजितदादांना जर मुख्यमंत्री व्हायचे असेल तर निश्चितच शरद पवार यांच्याकडे असलेले खासदार पाडून तेथे अजित पवारांना स्वत:चे खासदार निवडून आणावे लागणार आहेत. मुळात बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांना स्वतःचा खासदार निवडून आणावा लागणार आहे. हे सर्व करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात भाजपचे जे २२ खासदार आहेत तो आकडा वाढून २५ वर नेता येईल का, या दृष्टीनेदेखील प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार याचे उत्तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहायला मिळाले तर कोणाला आश्चर्य वाटू नये.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -