घरसंपादकीयओपेड'क' कोकणातला... 'प' पर्यटनातला... 'ग' गैरसोयीतला

‘क’ कोकणातला… ‘प’ पर्यटनातला… ‘ग’ गैरसोयीतला

Subscribe

कोकणच्या शेजारील गोवा आणि केरळ या छोट्या राज्यांनी केवळ पर्यटनावर आपली प्रगती केली आहे. तेथे कोकणाप्रमाणे रासायनिक कारखानदारी लादण्याचा आगाऊपणा करण्यात आला नाही. कोकण रेल्वेमुळे गोवा आणि केरळमध्ये पर्यटनासाठी जाणार्‍यांची संख्या वाढल्याचे आजही आपण लक्षात घेत नाही. जे केरळात, गोव्यात आहे तेच कोकणातील डहाणूपासून सिंधुदुर्गातील बांद्यापर्यंत आहे, पण पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाकडून केले जात नाहीत.

अलीकडच्या काही वर्षांत कोकणातील पर्यटनाचा बोलबाला मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कोकणला लाभलेला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा पर्यटकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. याशिवाय गड, किल्ले आहेत. किल्ल्यांचा मेरूमणी असलेला रायगड किल्ला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आहे. याशिवाय सिंधुदुर्गापासून रायगडच्या उरणपर्यंत अनेक किल्ले, जलदुर्ग आहेत. त्याचप्रमाणे ऐतिहासिक मंदिरे, अष्टविनायकांपैकी पाली आणि महड क्षेत्र, रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यात दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र हरिहरेश्वर आहे. याशिवाय अभयारण्य, वॉटर स्पोर्ट्स, एकापेक्षा एक सरस खाद्यपदार्थांची रेलचेल असे बरेच काही कोकणात आहे. खवय्यांना प्यारी विविध प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात आहे. असे सगळं काही असल्याने पर्यटक कोकणावर फिदा नसतील तरच नवल…!

यापूर्वी कोकणातील समुद्र किनार्‍यांना फारसे कोणी विचारत नसत. याला कारणेही तशीच होती. दळणवळणाच्या आणि रस्त्यांच्या सुविधा अगदीच अल्प होत्या. एकतर एसटीचा प्रवास अन्यथा खासगी वाहन भाड्याने घेऊन जावे लागत असे. आता तशी परिस्थिती नाही. वाहनांची संख्या वाढली, रेल्वे आली आणि रस्त्याचे जाळेही पसरले आहे. त्यामुळे पर्यटक सहजरित्या पाहिजे त्या ठिकाणी पर्यटनाला जाण्याचा बेत आखू शकतात. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद फोफावल्यानंतर देश-विदेशातील पर्यटकांनी तिकडे पाठ फिरवली.

- Advertisement -

त्यामुळे बराचसा पर्यटक कोकणाकडे वळला ही वस्तुस्थिती आहे. समुद्र किनार्‍यावर तो मनसोक्त रमला. पर्यटकांची कोकणात गर्दी वाढली ती अशी! विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र इथपासून देशाच्या विविध भागातून पर्यटक कोकणात येत आहेत. गोव्याची सफर करण्यापूर्वी विदेशी पर्यटक कोकणही अनुभवत आहेत. सलग सुट्ट्या असल्या की कोकणातील समुद्रकिनारे हमखास फुलून जात आहेत. दिवाळी, नाताळ, थर्टी फर्स्ट आणि नववर्षाचे स्वागत याप्रसंगी तर गर्दीला उधाण येते. यंदाही गर्दी होणार यात शंका नाही. आतापासूनच पर्यटनाचा माहोल सुरू झाला आहे. दुकाने, हॉटेल रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने सजवली गेली आहेत.

मात्र कोकणात पर्यटनाचा बोलबाला सुरू असताना मूलभूत सुविधांच्या नावाने चक्क बोंब आहे. अनेकदा यावर ओरड होते, परंतु एकतर त्याकडे लक्ष दिले जात नाही किंवा थातूरमातूर आर्थिक निधीचा लेप लावला जातो. कोकणाला निसर्गाने सर्व काही भरभरून दिले असले तरी त्याची जपणूक आम्हाला करता आलेली नाही हे कडवट वास्तव आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्य सर्वच दृष्टीने आपल्या कैक पटीने पुढे असताना कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न पाहण्यात आले, नव्हे कोकणातील नेत्यांसह इतरांचे ‘कोकणचा कॅलिफोर्निया करू’ हे एक आवडते वाक्य होऊन गेले. असे वाक्य कानावर पडले की कोकणवासीयही हुरळून जात होते. आता या वाक्यातील फोलपणा लक्षात आल्याने ‘कॅलिफोर्निया’ आता ‘कायापालट’पुरताच सीमित राहिला आहे.

- Advertisement -

कोकणच्या शेजारील गोवा आणि केरळ या छोट्या राज्यांनी केवळ पर्यटनावर आपली प्रगती केली आहे. तेथे कोकणाप्रमाणे रासायनिक कारखानदारी लादण्याचा आगाऊपणा करण्यात आला नाही. कोकण रेल्वेमुळे गोवा आणि केरळमध्ये पर्यटनासाठी जाणार्‍यांची संख्या वाढल्याचे आजही आपण लक्षात घेत नाही. जे केरळात, गोव्यात आहे तेच कोकणातील डहाणूपासून सिंधुदुर्गातील बांद्यापर्यंत आहे, पण पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाकडून केले जात नाहीत. पर्यटन विकासासाठी निधी दिला म्हणजे भागत नाही.

येणारा निधी नेमका किती प्रमाणात खर्च झाला याचे आकडे कधीच समोर येत नाहीत. कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेवून किंवा त्यांचा ‘विकास’ लक्षात घेऊन कोकणाचा पर्यटन विकास होणार नाही. सध्या रायगड जिल्ह्यात विशेष बोलबाला असलेल्या अलिबाग, मुरूड, श्रीवर्धनमधील दिवेआगर येथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्याकडे दैनिक ‘आपलं महानगर’नेही अनेकदा लक्ष वेधले आहे. समुद्र किनार्‍यांचे सुशोभीकरण वगैरे ठीक आहे, मात्र पर्यटनस्थळांकडे येणारे रस्ते आणि इतर वेगवेगळ्या सुविधा याबाबत आनंदी आनंद आहे. समुद्र किनार्‍यांवरील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे.

गेल्या काही वर्षांत मुरूड तालुक्यातील काशीद या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समुद्र किनार्‍यावर पोहताना बुडून मरणार्‍यांचे प्रमाण लक्षणीय आहे. काही दिवसांपूर्वी आठवड्यात दोघांचा मृत्यू झाला. पर्यटकांच्या आततायीपणामुळे बहुतांश अपघाती दुर्घटना घडतात, पण फिरायला येणारे पर्यटक बेभान झालेले असतात हे लक्षात घेऊन लाईफ गार्डची संख्या वाढविण्याचे काम स्थानिक प्रशासनाचे आहे. पाण्यात धोकादायक ठिकाणी पोहायला उतरू नका, असे बोर्ड लावूनही पर्यटक त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. त्यामुळे दुर्घटना घडू नयेत यासाठी अधिक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन काही दक्षता अगोदर घ्यायला हवी. काही ठिकाणी पर्यटक कर घेतला जातो. त्यातून पर्यटकांना काय दिले जाते हा कळीचा मुद्दा आहे. स्थानिक ग्रामपंचायती पर्यटक कर घेतात, वाहन थांब्याचे पैसे घेतात, मग समुद्र किनार्‍यांची योग्य ती साफसफाई राज्य शासनाने करावी, अशी अपेक्षा करतात.

कोकणातील असे समुद्रकिनारे दाखविता येतील की तेथे प्रसाधनगृहांची धड व्यवस्था नाही. यात महिलांची कुचंबणा होते. जेथे प्रसाधनगृहे आहेत त्यांची देखभाल आणि दुरुस्ती होत नसल्याने ‘कार्यभाग’ उघड्यावरच आटोपण्याची वेळ अनेकांवर येते. यातून अस्वच्छता होते. समुद्र किनार्‍यांवर सेल्फी पॉइंट जरूर तयार करावेत, परंतु त्यापूर्वी समुद्र किनारपट्टीची लांबी पाहून पर्यटकांना सोयीची ठरतील अशी प्रसाधनगृहे, चेंजिंग रूमचीही सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. योग्य आणि पिण्यालायक पाणीही बहुतांश किनारपट्ट्यांवर त्याचप्रमाणे अन्य पर्यटनस्थळांवर उपलब्ध नाही. गड, किल्ल्यांच्या ठिकाणी तर पिण्याचे पाणी नसणे हा हमखास येणारा अनुभव आहे.

प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडणार्‍या कोकणात येणार्‍या पर्यटकांना बाटलीबंद पाण्याचाच आधार असतो याच्यासारखा अजब विरोधाभास दुसरा नसावा. मोबाईलला रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक पर्यटनस्थळी येत असतात. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्याची मागणी जुनी आहे. एखादी दुर्घटना घडली तर बाहेरगावी संपर्क साधणे कित्येकदा अडचणीचे ठरते. कॅलिफोर्नियाचे स्वप्न दाखविणार्‍यांनी तेथे कशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत ते सांगितले पाहिजे. गोवा आणि केरळला जमले ते महाराष्ट्राला जमत नाही यामागे केवळ आणि केवळ स्वार्थीपणा, आपमतलबीपणा असल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

कोकणातील पर्यटनस्थळांकडे येणार्‍या रस्त्यांचे जाळे बर्‍यापैकी झाले असले तरी दर्जाबाबत काय बोलावे अशी परिस्थिती आहे. आम्ही फिरायला येतो आणि कुठेतरी ट्रॅफिकमध्ये तासन्तास अडकून पडतो ही तक्रार आता नित्याची झाली आहे. एक दिवसाच्या पर्यटनासाठी येणार्‍यांचा अर्धा दिवस प्रवासातच जाणार असेल तर त्याला काही अर्थ नाही. कोकणातील पर्यटनस्थळांकडे येणारे अनेक रस्ते आजही खड्डेमय आहेत. पर्यटन वृद्धी किंवा विकास यात दर्जेदार रस्त्यांची मूलभूत सुविधा द्यायलाच पाहिजे. रायगडशेजारी पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात सुट्टीच्या दिवसामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक जात असतात. तेथे जाण्यासाठी ऐसपैस द्रुतगती मार्गाची व्यवस्था असली तरी हा मार्ग काही वेळेला ५ ते ६ किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या गर्दीने तुंबून राहतो. यावरही काही इलाज सापडलेला नाही.

आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या गिरिस्थान माथेरानकडे जाणारा घाट रस्ता आजही धोकादायक आहे. अनेक अपघात तेथे घडले आहेत. देशात डोंगरमाथ्यावर असलेल्या पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी छानपैकी घाट रस्ते उभारण्यात आले आहेत, पण माथेरानच्या रस्त्याची रड आजही कायम आहे. उद्या त्यासाठी निधी आला तर तेथे नावाची पाटी लावण्यासाठी अनेक जण उत्सुकता दाखवतील, पण घाट रस्ता सुसह्य व्हावा यासाठी कुणी प्रयत्न करत नाही. कोकणातील पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते येत्या एक-दोन दिवसांपासून वाहनांच्या गर्दीने फुलून जाणार आहेत, मात्र वाहतूक सुरळीत होण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत ते अजून तरी अस्पष्ट आहे.

पर्यटनासाठी येणार्‍यांना आवश्यक त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत हा एक भाग झाला तसा दुसरा भाग म्हणजे पर्यटकांची गर्दी होते म्हणून त्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे प्रकारही थांबले पाहिजेत. हॉटेल, लॉजिंगचे दर गर्दीच्या दिवसांत मनमानी वाढविले जात असल्याच्या तक्रारी पर्यटकांकडून अनेकदा होत असतात. या दरवाढीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने पर्यटकांची अवस्था केविलवाणी होते. पर्यटनाला चालना द्यायची असेल तर पर्यटकांच्या राहण्याची, नाश्ता-भोजनाची सोयही दर्जेदार असायला पाहिजे. यासाठी पर्यटन विभागाने स्थानिक व्यावसायिकांना विश्वासात घेऊन त्यांनाही आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. पर्यटनाला गेलो आणि अंगलट आले, असे वाक्य पर्यटकांच्या तोंडून येता कामा नये.

‘क’ कोकणातला… ‘प’ पर्यटनातला… ‘ग’ गैरसोयीतला
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -