घरसंपादकीयओपेड‘पत्थर की हवेली’पासून ‘तिनको के नशेमन तक’

‘पत्थर की हवेली’पासून ‘तिनको के नशेमन तक’

Subscribe

यार.... ये नशेमन कौनसा शहर है? आरडी बर्मननं ‘आँधी’साठी रेकॉर्डिंग स्टुडिओत गुलजारांना विचारलं होतं. लताबाई आणि किशोर कुमार स्वरचर्चेत मग्न होते. ‘इस मोड से जाते है...कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें...पत्थर कि हवेली को, शिशों के घरौंदे में तिनको के नशेमन तक...इस मोड से जाते है,’ यातल्या काचेच्या बिलोरी प्रेमाच्या घरट्याआधी येणार्‍या एका वळणावरून गुलजारांनी कातळी हवेलीकडे नशेमन नगरीतून जाणारा रस्ता सांगितला होता. जिंदगी कभी ऐसी खत्म हो...जैसे के लिखते लिखते कलम की स्याही कागजपर खत्म हो...आयुष्यालाही समजू नये की ते कधी संपलं आणि कधी जीवनाची अक्षरं काळाच्या पांढर्‍या शुभ्र कागदावरून उमटेनाशी झाली. इतक्या सहज आणि स्वाभाविक भाषेत त्यांनी ‘मौत’ला शब्दबद्ध केले आहे. गुलजारांना जाहीर झालेला ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे त्यांच्या प्रतिभेच्या मस्तकी चढवलेला मानाचा मुकुटच म्हणावा लागेल.

गुलजारांना घरौंदा किंवा घरट्याचं विशेष अप्रूप आहे. याच नावाचा अमोल पालेकर, जरीना वहाब जोडीचा सुंदर सिनेमाची पटकथा गुलजारांनी लिहिली. ‘दो दिवाने शहरमें’ पासून ‘एक अकेला इस शहरमें’पर्यंत ही दोन्ही गाणी सुखापासून एकाकीपणाच्या दु:खापर्यंतची दोन्ही गाणी गुलजारांचीच, त्यांचं पहिलं पडद्यावरचं गाणं बिमल रॉय यांच्या बंदिनीतलं, मोरा गोरा अंग लईले…हे गाणं बंदिनी असलेल्या नायिका नूतनवर बंदिस्त खोलीच्या एकाकीपणातच चित्रित व्हायला हवं.

असा आग्रह दिग्दर्शक बिमल रॉय यांचा होता तर गुलजारांनी नूतनला गाण्याच्या आशयानुसार मोकळ्या ठिकाणी गाणं चित्रित व्हायला हवं असं सांगितलं. बिमल रॉय आणि गुलजार यांच्यात बरीच चर्चा झाल्यानंतर हे गाणं घराच्या छतावर चित्रित होण्याचा मध्यम मार्ग काढण्यात आला. चित्रपटाच्या कथानुरुप यात घराच्या उंबरठ्याची मर्यादाही होती आणि गाण्यातील शब्दातलं मोकळं आकाशही छतावरच्या चित्रिकरणात उपलब्ध झालं होतं.

- Advertisement -

एन चंद्रांचा ‘अंकुश’ खूप नंतरचा. ऐंशीच्या दशकातला त्याआधीच हा विषय गुलजारांनी ‘मेरे अपने’तून १९७१ मध्ये पडद्यावर आणला होता. मूळ सिनेमा तपन सिन्हांचा बंगालीतला ‘अपनजन’ होता. बेरोजगारीमुळे नाईलाजाने गुन्हेगारीकडे वळणार्‍या तरुणांचं कथानक होतं, ‘मेरे अपने’ मध्ये वाट चुकलेल्या तरुणांना भानावर आणणारी मीना कुमारी होती, तर अंकुशमध्ये हे काम आशालता वाबगावकरांनी केलं होतं. मेरे अपने हा पहिला तरुणांचा बेरोजगारपट होता.

गुलजारांच्या दिग्दर्शनापेक्षा त्यांची कविता कायमच पडद्यावर उजवी ठरली. ‘माचिस’ किंवा ‘हुतूतू’ हे दोन्ही सामाजिक राजकीय सिनेपटांचं गुलजारांनी दिग्दर्शन केलं. माचिसचं कथानक पंजाब किंवा सीमावर्ती भागातले बेरोजगार तरुण व्यवस्थेच्या धक्क्यामुळे दहशतवादाच्या आगीत कसे खेचले जातात याचं कथानक होतं, या संपूर्ण सिनेमाचं सार गुलजारांच्या छोड आए हम वो गलियाँ…या गाण्यातून समोर येतात. दिल दर्द का टुकडा है, पत्थर कि ढली सी है..कोई अंधा कुआं है या, कोई बंद गली सी है…ही व्यवस्थेनं लादलेली हतबलता गुलजारांनी पडद्यावर ‘माचिस’ने पेटवली होती.

- Advertisement -

हुतूतूचं कथानक निव्वळ राजकीयच होतं. यात नाना, तब्बू, सुनील शेट्टी, सुहासिनी मुळे, डॉ. मोहन आगाशे असली दिग्गज मंडळी होती. मानवी नातेसंबंधांना मागे ओढून पुढे जाणारं राजकारण या ‘हुतूतू’चा उद्देश होता, याच माणसाची होणारी फरपट गुलजारांनी पडद्यावर आणली. गुलजारांनी दिग्दर्शन केलेल्या कुठल्याही कलाकृतीमध्ये नाईलाज किंवा हतबलता स्थायी आहे. मेरे अपने, परिचय, कोशिश, आँधी, इजाजत, घरौंदा, माचिस…कित्येक नावं आहेत. या सर्व चित्रपटातलं मध्यवर्ती सूत्र हतबलता आहे. माणसांवर परिस्थितीनं ओढवलेला नाईलाजच आहे. त्या नाईलाजाला गुलजारांनी शब्दरुप दिले.

दक्षिणेचे लेखक दिग्दर्शक बालू महेंद्रूकडून कमल हासन, श्रीदेवी असलेला ‘सदमा’ लिहिला जात होता. गुलजारांचं एक अंगाईवजा गाणं त्यात असायला हवं असं महेंद्रू यांनी सांगितल्यावर सुरमई अखियोंमे नन्हा मुन्ना इक सपना दे जा रे…हे गाणं ईल्लयराजांनी सांगीतबद्ध केलं. गुलजारांनी ए.आर. रेहमानपर्यंत सगळ्यांच्या संगीताला शब्द दिले, मात्र आरडी आणि एसडी बर्मन या बापलेकांशी त्यांचं विशेष नातं होतंच.

आरडी बर्मनांना गुलजारांचे शब्द म्हणजे मौनातली भाषा वाटत असे, नशेमन, तिनके, गिला मन, खाली कमरा, रौशनदान…असलं काही गुलजार लिहिताना आरडीला या शब्दांना संगीतरुप देणं कठीण वाटायचं. स्वर बरेचदा आशा, लता किंवा किशोरचा होता. आशासाठी इजाजत, लतासाठी खामोशी आणि किशोरसाठी परिचय आणि इतर गाणी महत्वाची ठरली. जगजित सिंग यांच्यासोबत अल्बम ‘मरासिम’ रेकॉर्ड झाला. ज़िंदगी पर भी कोई ज़ोर नहीं, दिल ने हर चीज़ पराई दी है…ही हतबलतावजा तक्रार गुलजारांनी केलीच, त्याला जगजीतच्या आवाजानं आणखीच गाहिरं केलं, हे गहिरेपण त्यांच्या खर्जातल्या आवाजातही होतं, कुसूमाग्रजांच्या कवितांचा हिंदी-उर्दू अनुवाद त्यांनी केला.

कवी किशोर कदम (सौमित्र) यांनी हे अनुवाद विशेष कार्यक्रमात सादर केले होते. ग्रेसना, तुम अपनी नज्म लेकर आना…मै अपनी लाऊंगा, असं ते खर्जात ऐकवायचे, वेदनेवर हळुवार, तरल, गहिरं मोरपीस फिरवणारे गुलजार ‘गोली मार भेजे में’ लिहिणारेही होते. गुन्हेगारीपट ‘सत्या’साठी रामगोपाल वर्मा आणि अनुराग कश्यप यांनी गुलजारांना विचारल्यावर अंधारलेल्या मुंबईतल्या गल्लीबोळातला पाऊस आणि पाण्यासारखंच गँगवॉरमधून रस्त्यावर सांडणारं रक्तं असा आशयविषय होता.

गुलजारांनी व्यवस्थेविरोधात थेट राजकीय भूमिका घेतली नसल्यानं त्यांच्यावर टीकाही झाली, मात्र त्यांनी कधीही त्याविषयी भाष्य केलं नाही. भवतालाविषयी थेट राजकीय भूमिका घेण्यात जावेद अख्तर आणि गुलजार या समकालीनांमध्ये तुलना होत होती, जावेद टोकदार तर गुलजार हळूवार होते. ढसाळ गेल्यावर स्मशानभूमीत ‘चिता अभी गर्म है…समय लगेगा इसे ठंडा होने में’ असं गुलजार म्हणाले होते. नामदेव, ग्रेस यांच्या कवितेनं माझ्यावर कमालीचा परिणाम केलाय असंही त्यांनी सांगितलं होतं. गुलजारांनी भवतालाविषयी राजकीय भूमिका थेटपणे मांडल्याचं आठवत नाही, अगदी एखाद्या खासगी कार्यक्रमातही गुलजारांनी राजकीय भाष्य, टीका टिपण्णी करणं टाळलंच.

त्यांनी मानवी वेदना आणि जाणिवांवर शब्दांचं मोरपिस फिरवलं, मात्र वेदनेची थेट भाषा स्वत:च्या कवितेतून मांडणं त्यांना तेवढं रुचलं नसावं. पांढरा शुभ्र सदरा, पायजमा आणि शॉल असा पेहराव असलेले गुलजार बदलले नाहीत. त्यांची मांडणी संयत होती, त्यांच्या शब्दांनी निश्चित असा आब राखलेला आहे. ही मर्यादा त्यांनी स्वत:ला घालून दिली, म्हणूनच समाज किंवा समूहवेदनेच्या तुलनेत व्यक्तीवेदनाच त्यांच्या कवितेतून प्रकर्षाने पुढे जाणवली. परंतु त्यांना या मर्यादा माहीत असाव्यात म्हणूनच त्यांनी ग्रेस आणि कुसूमाग्रजांचं कौतुक केलं असतानाच ढसाळांनाही समजून घेतलं. तर प्रेमचंद आणि मंटोही गुलजारांचा साहित्यमित्र होता.

विशाल भारद्वाजनं शेक्सपियरच्या अथ्थल्लोतून ओमकारा बनवायला घेतला, त्यावेळी राजाच्या मनातील राणीविषयीची संशयी वेदना गाण्यातून लिहिताना ‘नैणो कि माणियो रे…नैना ठग लेंगे…’ असं गुलजारांनी लिहिलं. दिग्दर्शनातले आणि कवी म्हणून गुलजार हे वेगळे नसल्याचं लक्षात यावं. इजाजत हा सिनेमा पडद्यावरची एक संपूर्ण कविताच व्हावी. गुलजारांची आयुष्याविषयीची तक्रार त्यांच्या केवळ कवितेत असावी, ऐ जिंदगी गले लगाले आणि तुझसे नाराज नही जिंदगी, ही दोन गाणी त्यांचा जगण्याविषयीचा दृष्टीकोन स्पष्ट करतात. कुसूमाग्रजांच्या ‘वरच्या मजल्यावर आता कोणी राहात नाही’ या कवितेचं उपरी मंजिलपर अब कोई रहता नही…असा त्यांनी केलेला अनुवाद हा केवळ भाषेचा असतो.

अनुवाद कशाला म्हणावं असं त्यांना कोणीतरी विचारल्यावर त्यांनी सांगितलं होतं. एक शीशिसे निकला हुवा इत्र दुसरी शीशिमें भरना…खुशबू वही है…हाँ थोडी उड सकती है, लेकीन कोशिश यही हो की वह कायम रहे…हाच गुलजारांचा जीवनाविषयीचा दृष्टीकोन आहे, त्यांच्या लेखन आणि कवितेत जगण्याचीच चर्चा प्रकर्षाने होते. ‘परिचय’मधल्या किशोरनं गायलेल्या गाण्यात हे स्पष्ट व्हावं, एक राह मूड गयी तो और जुड गयी…मै मुडा तो साथ साथ राह भी मूड गयी…किंवा आनेवाला पल जानेवाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो…ही गाणी हिंदी पडद्यावरचा अनमोल असा ठेवा आहे.

जीवनाविषयी भरभरून लिहणारे गुलजार ‘मौत’ विषयीही अत्यंत सकारात्मक आहेत. जाने क्या सोचकर नही गुजरा…एक पल रात भर नही गुजरा, या गाण्याआधी ते म्हणतात, जिंदगी कुछ पलों में गुजर जाती है कभी एक पल जिंदगीभर नही गुजरता, जीवनानं मृत्यूलाही आनंदाचा सुखद धक्का द्यावा, असं गुलजारांना वाटतं, ते म्हणतात, जिंदगी कभी ऐसी खत्म हो…जैसे के लिखते लिखते कलम की स्याही कागजपर खत्म हो…आयुष्यालाही समजू नये की, ते कधी संपलं आणि कधी जीवनाची अक्षरं काळाच्या पांढर्‍या शुभ्र कागदावरून उमटेनाशी झाली. इतक्या सहज आणि स्वाभाविक भाषेत त्यांनी ‘मौत’ला शब्दबद्ध केले आहे. गुलजारांना जाहीर झालेला ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे त्यांच्या प्रतिभेच्या मस्तकी चढवलेला मानाचा मुकुटच म्हणावा लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -