घरसंपादकीयओपेडनरेंद्र मोदींच्या जागतिक लोकप्रियतेचा भारताला उपयोग किती?

नरेंद्र मोदींच्या जागतिक लोकप्रियतेचा भारताला उपयोग किती?

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जागतिक नेते म्हणून अव्वल ठरले आहेत. त्यांनी अनेक विकसित देशातील नेत्यांना मागे टाकले आहे. विकसित देशातील नेत्यांच्या स्पर्धेत पहिले स्थान मिळवणे ही काही साधीसोपी गोष्ट नाही. कारण काही वर्षांपूर्वी विकसित देशातील नेते भारताला गरजू देश म्हणून गणत होते. त्यामुळे भारतीय नेत्यांची आपल्याशी तुलना होऊच शकत नाही, अशी त्यांची भावना होती, पण मोदींच्या आगमनानंंतर काळ बदलला आहे. आता त्यांच्या लोकप्रियतेचा भारताच्या विकासासाठी उपयोग होणे अपेक्षित आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा ग्लोबल लीडर्सच्या यादीत अव्वल ठरले आहेत. अमेरिकेतील बिझनेस इंटेलिजन्स कंपनी, मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणात जगातील सर्वाधिक लोकप्रिय ग्लोबल लीडर्सच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित देशांच्या राष्ट्राध्यक्षांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे. या सर्वेक्षणात त्यांनी अनेक विकसित देशांच्या राष्ट्राध्यक्षांना मागे टाकले आहे. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्रप्रमुख इमॅन्युअल मेक्रॉन, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक अशा विकसित देशांच्या नेत्यांना मागे टाकले आहे. आताच्या जगभर वावरणार्‍या भारतीय तरुणाईला यात फारसे काही मोठे वाटत नसेलही, पण काही वर्षे मागे गेले तर याचे महत्त्व काय आहे ते समजून येईल. युरोपमधील देश, अमेरिका आणि रशिया हे विकसित देश गरीब देशांना थर्ड वर्ल्ड कन्ट्रीज म्हणजे तिसर्‍या जगातील देश असे संबोधत असत.

यात प्रामुख्याने गरजू देशांचा समावेश असे, पण मोदींच्या काळात भारताची ती प्रतिमा पुसली गेली. भारताच्या पंतप्रधानांची जागतिक नेत्यांशी तुलना होऊ लागली. भारतीय पंतप्रधानांचे जागतिक पातळीवर मोठ्या जल्लोषात स्वागत होऊ लागले. याचा अर्थ यापूर्वी विदेशात गेल्यावर भारतीय नेत्यांचे स्वागत होत नव्हते असे नाही, पण भारताचा दबदबा निर्माण करण्यात मोदी मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसत आहे. त्याला मोदींचा स्वभावही कारणीभूत आहे. कारण जे तुमच्याकडे आहे, ते तुम्ही जोरदारपणे लोकांना सांगितले नाही तर लोक तुमची दखल घेत नाहीत. म्हणूनच बोलणार्‍याचे चणे विकले जातात, पण गप्प राहणार्‍याचे सोनेही कुणी विकत घेत नाही, अशी म्हण प्रचलित आहे. मोदींनी जागतिक पातळीवर आक्रमकपणे भारताच्या आणि भारतीयांच्या शक्तीचे प्रदर्शन केले.

- Advertisement -

आपल्याकडे कितीही शक्ती असली तरी त्याचे प्रदर्शन करायचे नाही, ही वर्षानुवर्षे भारतीयांच्या स्वभावात मुरलेली वृत्ती मोदींनी बदलली. ती खर्‍या अर्थाने मोदींनी घडवलेली मोठी मानसिक क्रांती होती. मोदींनी जगाच्या व्यासपीठावरून अगदी गर्जना करून भारताच्या शक्तीचा जगाला प्रत्यय आणून दिला. आम्ही केवळ लोकसंख्येने मोठे नाही, तर क्षमतेनेही मोठे आहोत हे त्यांनी जगाला गर्जून सांगितले. यात मेक इन इंडिया ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी विविध देशांच्या नेत्यांना राजी केले. हे काम वाटते तितके सोपे नव्हते, पण ते मोदींनी केले आणि त्यात चांगल्यापैकी यश येताना दिसत आहे. भारत हा केवळ व्यापारी देश नाही, तसेच केवळ कच्च्या मालाचा पुरवठा करणारा देश नाही, तर अनेक आधुनिक गोष्टींचे उत्पादन करणारा देश आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिले.

गुजरातचे विकास पुरुष म्हणून नावारूपाला आलेल्या नरेंद्र मोदी यांनी विविध प्रकारचे अडथळे पार करत भारताच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य गाठले. इतकेच नव्हे तर तिथपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी जागतिक पातळीवर भारतीयांच्या शक्तीविषयी जगभरात नवा विश्वास निर्माण केला. त्यामुळे मोदींच्या पूर्वीचा भारत आणि मोदींच्या नंतरचा भारत असा दोन टप्प्यात विचार करणे जगभरातील राजकीय आणि आर्थिक विश्लेषकांना भाग पडले. एकेकाळी मोदींना व्हिसा नाकारणारी अमेरिका मोदींसाठी पायघड्या घालू लागली. ओबामा असो, ट्रम्प असो किंवा जो बायडेन असो, सगळ्यांनाच मोदी प्रिय झाले.

- Advertisement -

पूर्वी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा भारतीय पंतप्रधानाला भेटल्यावर त्याच्या पाठीवर थोपटत असे, ती प्रथा मोदींनी बंद करायला लावली. मोदींच्या या काही गोष्टी अहंभावाच्या वाटू शकतात, पण त्यामुळे मानसिक फरक पडत असतो. मोदींच्या पूर्वी भारतीय नेत्यांची भूमिका ही बचावात्मक होती. म्हणजे आपण गरजू आहोत, त्यामुळे आपण जगातील आर्थिकदृष्ठ्या बलवान देशांना दबून राहिले पाहिजे, अशी भावना असायची, पण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर यामध्ये बदल झाला. अर्थात त्याला बदलणारी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीही कारणीभूत आहे. त्यात मोदींच्या पूर्वी झालेल्या देशाच्या पंतप्रधानांचेही योगदान आहे. हे मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर लालकिल्ल्यावरून केलेल्या पहिल्या भाषणात मान्य केले होते.

मोदींना लोकांनी देशाच्या पंतप्रधानपदी निवडून देण्यामागे ते गुजरातप्रमाणे देशाचाही विकास घडवून आणतील, अशी भावना होती. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या नेत्यांनी सेक्युलॅरिझमच्या नावाखाली आणि देशातील मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांसाठी अतिरेक्यांविषयी घेतलेले मवाळ धोरणही कारणीभूत होते. या देशातील लोकमानस हे मुस्लिमांच्या विरोधात नाही, पण त्यांच्या आडून जी मंडळी पाकिस्तानात बसलेल्या सूत्रधारांच्या इशार्‍यावरून देशविघातक कारवाया करत आहेत, त्यांना कठोरपणे रोखायला हवे, असे येथील लोकांचे मत आहे. काश्मीरमधील ३७० कलम हा तर नाजूक मामला होऊन बसला होता. काश्मीरमधील प्रस्थापित राजकीय घराणी त्याचा त्यांच्या सोयीनुसार फायदा उठवून एक प्रकारे भारत सरकारची लूट करत होते. त्याला चाप बसण्याची गरज होती. ते धाडस मोदींनी दाखवलं.

तिहेरी तलाक मुस्लीम महिलांसाठी अतिशय त्रासदायक ठरणारा मुद्दा होता. धर्माची बाब आहे म्हणून मुस्लीम महिला त्यामुळे होणारा छळ सोसत होत्या. ज्या देशात ८० टक्के लोक हिंदू आहेत, तिथे त्यांचे आराध्य दैवत श्रीरामांचे मंदिर होऊ शकत नव्हते. अयोध्येतील राम मंदिराला विरोध करणारे काँग्रेसमधील अनेक जण श्रीरामांना पूजतात, पण मुस्लीम दुखावले जातील म्हणून राम मंदिराचा विषयच काढायचा नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतलेली होती. भारताच्या संसदेवर हल्ला करण्याच्या कटाचा सूत्रधार अफजल गुरू याला फाशीची शिक्षा होऊनही १० वर्षे तुरुंगात पोसण्यात आले होते. सगळे पुरावे समोर असताना मुंबईवर हल्ला करून पोलिसांसह अनेक मुंबईकरांचे बळी घेणार्‍या पाकिस्तानातून आलेल्या टोळीचा म्होरक्या अजमल कसाब याला फाशीची शिक्षा होऊनही तुरुंगात पोसले जात होते. देशातील मुस्लिमांच्या भावना दुखावू नयेत हेच त्यामागील कारण होते. लोकांच्या मनात हीच खदखद होती. त्यातूनच मोदींचा राष्ट्रीय पातळीवर उदय झाला.

भारताचा शेजारी असलेल्या चीनची महत्त्वाकांक्षा दिवसेंदिवस फोफावत चाललेली आहे. त्याला आळा घालण्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. अरुणाचल प्रदेशवर चीनची वक्रदृष्टी आहेच. आता या भागातील काही ठिकाणांना आणि नद्यांना चीनने त्यांच्या भाषेतील नावे दिली आहेत. जेव्हा चिनी सैन्य भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करते तेव्हा भारतीय सैन्य त्यांना सडेतोड उत्तर देऊन पिटाळून लावते. कारण त्यांना नेतृत्व आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे याची कल्पना आहे. चीनच्या नादी लागून पाकिस्तानने आपलेच नुकसान करून घेतले आहे. सध्या तेथील जनसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. देश दिवाळखोरीच्या दारात आहेे. त्यामुळे यासाठीच का वेगळा पाकिस्तान बनवला होता, असे म्हणून कपाळावर हात मारण्याची वेळ तेथील लोकांवर आलेली आहे. जाये तो जाये कहाँ, अशी स्थिती सध्या पाकिस्तानची झालेली आहे.

आज अनेक भारतीय वंशाचे लोक विविध देशांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे आहेत. आयर्लंडचे दुसर्‍यांदा पंतप्रधान झालेले लिओ वराडकर हे मराठी आहेत. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने ‘मून टू मार्स’ प्रोग्रामसाठी एक वेगळा विभाग तयार केला असून यासाठी भारतीय वंशाच्या अमित क्षत्रिय यांची प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. इतकेच नव्हे तर इंदिरा नुई (पेप्सिको), सुंदर पिचाई (गुगल), सत्या नडेला (मायक्रोसॉफ्ट), नील मोहन (यू ट्यूब), पराग अग्रवाल (ट्विटर), शांतनू नारायण (अ‍ॅडोब इंक), लक्ष्मण नरसिम्हन (स्टारबक्स), अरविंद कृष्णा (आयबीएम)… अशी खूप मोठी भारतीय वंशाच्या कर्तबगार व्यक्तींची यादी आहे. पुण्यात जन्मलेले आणि मास्टरकार्डचे माजी सीईओ अजयपाल सिंह बंगा हे जागतिक बँकेचे अध्यक्ष होतील असे जवळजवळ निश्चित झाले आहे.

इतकेच नव्हे तर अमेरिकेसारख्या सुपर पॉवर असलेल्या देशाच्या उपाध्यक्षपदी कमला हॅरिस यांची निवड झाली. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अंतराळवीरांगणांनी नासामध्ये मौलिक संशोधन केले आहे. जगातील विविध देशांमध्ये भारतीय लोक शिक्षण तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त गेलेले आहेत. काही तिथे वसलेले आहेत. त्या देशांच्या विकासात अतिशय महत्त्वाचे योगदान देत आहेत. हे सर्व पाहिल्यावर शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘स्वदेश’ चित्रपट आठवतो. या चित्रपटाने देशविदेशातील भारतीय भारावून गेले होते. आपण इतर देशांच्या विकासात योगदान देत आहोत, पण आपल्या देशासाठी आपण काही करू शकत नाही, अशी खंत त्यांना वाटत होती. आज जगभरात नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अव्वल दर्जाची आहे, पण जगभरात पसरलेल्या या भारतीय लोकांच्या क्षमतेचा भारताच्या विकासात कसा उपयोग होणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नाहीतर त्याच चित्रपटात शाहरुख खान म्हणालाच होता, अपना दिया और रोशनी दुसरे के आंगन में.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -