घरसंपादकीयओपेडभाजपचे राष्ट्रीय नेते गडकरी की फडणवीस?

भाजपचे राष्ट्रीय नेते गडकरी की फडणवीस?

Subscribe

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजकारणावर भाजपचे जेष्ठ नेते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यशैलीचा प्रचंड प्रभाव आहे. मात्र २०१४ मध्ये भाजपामध्ये मोदी युगाचा प्रारंभ झाल्यापासून अडवाणी आणि वाजपेयी यांची विचारधारा मागे पडली आणि मोदी विचार हा भाजपाच्या राजकीय विचारधारेचा तसेच सत्ताप्राप्तीचे एकमेव प्रमुख साधन बनला. पण हा विचार गडकरींच्या फारसा पचनी पडणारा नव्हता. त्यामुळेच राष्ट्रीय राजकारणातून गडकरींना बाजूला करण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत. नुकतेच नितीन गडकरी यांना भाजपच्या संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीतून वगळण्यात आले. या ठिकाणी मोदी आणि शहांच्या राजकीय कार्यपद्धतीला अनुकूल असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना स्थान देण्यात आले.

महाराष्ट्रातील भाजपचे राजकारण गेल्या काही दशकांपासून केंद्रीय मंत्री व भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नावाभोवती व पर्यायाने त्यांच्या वलयाभोवती फिरत आहे, मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या तरुण उमद्या नेतृत्वाकडे आली आणि त्यानंतर देशात मोदी युग अवतरले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे देशाच्या राजकारणात झंझावात निर्माण केला. या झंझावातामध्ये भाजपतील अंतर्गत सत्ता तसेच केंद्रातदेखील उलथापालथ झाली.

याच उलथापालथीमधून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रातील प्रस्थापित भाजप नेत्यांना खड्यासारखे बाजूला सारत तुलनेने नवे नेतृत्व असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळी मुख्यमंत्री करण्यामागे दिल्लीतील पक्ष नेतृत्वाची जी रणनीती होती ती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अन्य भाजप नेत्यांच्या तुलनेने नवे होते आणि त्याचबरोबर त्यांची राजकीय पाटी कोरी होती. त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या नागपूर शहरातून देवेंद्र फडणवीस हे विधानसभेवर सातत्याने निवडून येत होते ते नागपूर आणि भाजपची थिंक टँक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयदेखील या नागपूर शहरातच होते.

- Advertisement -

तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी हेदेखील नागपूरकरच होते. त्यामुळे नितीन गडकरी यांना नागपूरमधूनच पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी उभे करण्यातचे काम भाजपच्या पक्ष नेतृत्वाकडून त्यावेळी करण्यात आले. अर्थात देवेंद्र फडणवीस हे जरी महाराष्ट्र भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष असले आणि २०१४ ते २०१९ अशी सलग पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरीदेखील महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकीय आणि राष्ट्रीय राजकारणावर नितीन गडकरी यांचा असलेला प्रभाव कायम होता, मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजपाच्या संसदीय पक्ष समितीतून नितीन गडकरी यांच्याऐवजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केंद्रीय नेतृत्वाने केली आणि महाराष्ट्राचे भाजपचे राष्ट्रीय नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत फडणवीस हेच महाराष्ट्रातील भाजपचा राष्ट्रीय चेहरा असतील असे संकेत केंद्रीय नेतृत्वाने ही नियुक्ती करून दिले आहेत.

नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांची बलस्थाने जर लक्षात घेतली तर दोन्ही नेते अत्यंत अभ्यासू, उत्कृष्ट आणि परखड वक्ते आणि त्याचबरोबर विकासकामांमध्ये कमालीचा असलेला झपाटा ही या दोन्ही नेत्यांची ठळक वैशिष्ठ्ये म्हणता येतील. तर दोन्ही नेत्यांच्या राजकारणाची पद्धत मात्र परस्पर विरोधी म्हणावी लागेल. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वावर सहाजिकच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा फार मोठा प्रभाव आहे तर देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कार्यकाळात उभे राहिलेले आणि विकसित झालेले आहे, त्यामुळे फडणवीस यांच्या राजकारणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यशैलीचा प्रचंड प्रभाव आहे.

- Advertisement -

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नितीन गडकरी हे आधी महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते आणि त्यानंतर १९९५ मध्ये जेव्हा महाराष्ट्रात प्रथम सत्तांतर झाले आणि शिवसेना-भाजप युतीचे राज्य आले, या शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. गडकरी हे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले आणि त्यांनी सरकारच्या माध्यमातून होणार्‍या रस्त्यांची परिभाषाच पूर्णपणे बदलून टाकली. गडकरी यांना टोलचे जनक म्हटले जाते. कोणत्याही शहराचा, राज्याचा अथवा देशाचा जर विकास करायचा असेल तर त्यासाठी पायाभूत सोयीसुविधांचे जाळे आणि विशेषतः दळणवळणाच्या सुविधा या अत्यंत दर्जेदार असण्यावर नितीन गडकरी यांचा प्रारंभीपासून भर होता. त्यामुळेच गडकरींनी महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री झाल्यावर सर्वात प्रथम मुंबईत ५५ उड्डाणपूल कमालीच्या वेगाने उभे केले.

१९९५ साली महाराष्ट्रात जे शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. त्या सरकारचा रिमोट कंट्रोल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होता आणि मुंबई-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस हायवे हा त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. नितीन गडकरी यांची विशेषत: ही की त्यांनी बाळासाहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट अत्यंत कमी वेळात यशस्वीपणे पूर्ण करून दाखवला. त्यामुळे अर्थातच गडकरी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विशेष मर्जीतील भाजप नेते होते. गडकरींचे नेतृत्व महाराष्ट्रातील भाजपमध्ये जेव्हा उभे राहत होते त्यावेळी भाजपच्या महाराष्ट्रातील आणि देशातील राजकारणावर गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांचे पूर्णपणे वर्चस्व होते. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठबळावर गडकरी यांनी महाराष्ट्रामध्ये तसेच राष्ट्रीय राजकारणात आपले नेतृत्व स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर उभे केले.

२०१४ मध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजपचे सरकार येणार हे स्पष्ट झाले, त्यावेळी नितीन गडकरी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. वास्तविक गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यामुळे गडकरी जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते तर मोदी आणि शहा यांना भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात त्यांच्या रूपाने प्रतिस्पर्धीदेखील राहिला नसता, मात्र त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नितीन गडकरी यांच्या हातात महाराष्ट्राची सूत्रे सोपवण्याऐवजी ती तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवणे अधिक इष्ट समजले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्र आपल्याकडे द्यायचा नाही हे जेव्हा गडकरी यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी हळूहळू महाराष्ट्रातील त्यांचे लक्ष कमी केले आणि राष्ट्रीय राजकारणावर लक्ष केंद्रित केले.

२०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभी नितीन गडकरी यांच्याकडे अत्यंत वजनदार खाती दिली होती, तथापि हळूहळू या खात्यांमध्येही केंद्रीय नेतृत्वाकडून फेरबदल करण्यात आले. ते करत असताना गडकरी यांचे वर्चस्व राष्ट्रीय राजकारणात कसे वाढणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर नितीन गडकरी हे त्यांच्यातील खिलाडूपणाच्या वृत्तीमुळे आणि पक्षीय अभिनिवेश न बाळगता सर्व पक्षांची विकास कामे करण्याच्या पद्धतीमुळे राष्ट्रीय राजकारणात अत्यंत लोकप्रिय राहिले. राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महत्वाच्या खात्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नितीन गडकरी यांनी देशभरात मोठमोठ्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा अक्षरश: सपाटा लावला.

अत्यंत कमी कालावधीत दर्जेदार राष्ट्रीय महामार्ग उभारण्यात नितीन गडकरींचा हात कोणीही धरू शकणार नाही एवढे ते रस्ते निर्मितीच्या कामात आता पारंगत झाले आहेत. गडकरी हे जसे भाजपामध्ये लोकप्रिय आहेत तसेच किंबहुना त्याहीपेक्षा ते भाजपेतर अन्य पक्षांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय केंद्रीय मंत्री आहेत. तथापि, गडकरी यांच्या राजकारणावर भाजपचे जेष्ठ नेते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यशैलीचा प्रचंड प्रभाव आहे. देशातील राजकीय व्यवस्थेमध्ये लोकशाही पद्धतीने लोकांची मने जिंकून सत्ता प्राप्त करण्यावर गडकरी यांच्या आजवरच्या राजकारणाचा भर राहिलेला आहे. मात्र २०१४ मध्ये भाजपामध्ये मोदी युगाचा प्रारंभ झाल्यापासून अडवाणी आणि वाजपेयी यांची विचारधारा हळूहळू मागे पडली आणि मोदी विचार हा भाजपाच्या राजकीय विचारधारेचा तसेच सत्ताप्राप्तीचे एकमेव प्रमुख केंद्र बनला.

आणि या विचारधारेमुळे गडकरी हे प्रारंभी महाराष्ट्राच्या राजकारणातून काहीसे बाहेर फेकले गेले तसेच आता भाजपच्या राष्ट्रीय राजकारणातूनदेखील गडकरी यांना कात्रजचा घाट दाखवण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत. नितीन गडकरी हे लोकांमध्ये लोकप्रिय होण्यामागे जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे त्यांचे परखड, स्पष्ट आणि तितकेच सर्वसामान्य जनतेप्रति असलेले अत्यंत प्रामाणिक आणि मोकळे राजकीय विचार हे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचा धसका जसा त्यांचे राजकीय विरोधक घेत असतात तसाच धसका भाजप नेत्यांमध्ये पक्षांतर्गतदेखील मोदी यांच्या नावाचा आहे. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या अतिविशाल नेतृत्वासमोरदेखील भाजपातील चुका, दोष बोलण्याचे धाडस दाखवणारे एकमेव नेते म्हणून गडकरी यांच्याकडे पाहिले जाते.

गडकरींच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व भाजपमध्ये आणि राष्ट्रीय राजकारणात जरी नवखे असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्कम पाठबळ आहे. आणि हीच त्यांच्या राजकारणाची सर्वात मोठी अशी जमेची बाजू आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे अत्यंत मुसद्दी , समय सूचक आणि त्याचबरोबर विकासकामांचा प्रचंड वेग असलेले तरुण आणि उमदे नेतृत्व आहे. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील राजकारणात गोपीनाथ मुंडे यांनी सर्वप्रथम लिफ्ट दिली. मात्र २०१४ मध्ये भाजपच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये जेव्हा नरेंद्र मोदी या पंचाक्षरी जादुई आणि करिष्माकारी पर्वाचा प्रारंभ सुरू झाला त्यावेळी भाजपच्या बदलत्या राजनीतीची गणिते सर्वात आधी ज्यांनी आत्मसात केली ते एकमेव देवेंद्र फडणवीस हे आहेत. फडणवीस आज जे काही यशाच्या शिखरावर आहेत त्याला त्यांनी स्वतःच्या अंगात भिनवलेला मोदी विचार प्रमुख्याने कारणीभूत आहे.

भाजपचे आता बदललेले तंत्र फडणवीस यांनी आत्मसात केले आहे. मोदी आणि शहांच्या भाजपला लोकशाही मार्गाने जर सत्ता प्राप्त होत नसेल तर काहीसा वेगळा मार्ग पत्करूनदेखील अथवा भाजपच्या राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत करीत देशभरातील राज्यांमध्ये भाजपची सत्ता स्थापन करायची आहे. त्यामुळेच जे उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांचे काही काळापूर्वी उत्तम मित्र होते. मात्र तेच उद्धव ठाकरे जेव्हा भाजपची साथ सोडून मुख्यमंत्री पदासाठी अथवा राज्यातील सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या वळचळणीला गेले त्यानंतर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडताना ठाकरेंशी असलेल्या पूर्वीच्या स्नेहसंबंधांनाही पूर्णपणे फाटा देत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेतच बंड उभे केले. शिवसेनेच्या आमदारांनाच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उभे करत महाराष्ट्राची सत्ता तर खेचून घेतली, मात्र त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेतृत्वावरही भले मोठे प्रश्नचिन्ह उभे करण्याचे धाडस फडणवीस यांनी दाखवले.

त्यामुळेच भाजप कार्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेची सहानुभूती जरी राष्ट्रीय नेते म्हणून नितीन गडकरी यांच्या पाठीशी असली तरी भाजपात मोदी आणि शहा यांचे हे युग आहे. मोदी आणि शहा यांचे राजकारण शरद पवार यांच्यासारख्या धुरंधर राजकीय नेत्याला कळू शकले ना, ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या नितीन गडकरी यांच्यासारख्या अत्यंत परिपक्व राजकीय नेत्याला कळू शकले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तर सुरुवातीपासूनच नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भूमिका घेत होते, त्यामुळे त्यांना मोदी विचार हा सदैव अस्पृश्यच वाटला. त्यामुळे या तीनही नेत्यांना त्यांच्या राजकीय वाटचालीत याचे फटके बसले आणि ते यापुढेदेखील बसत राहतील. देवेंद्र फडणवीस यांनी मोदी विचार हा पूर्णपणे त्यांच्या रक्तात भिनवला असल्यामुळे जोपर्यंत देशांमध्ये मोदी आणि शहा यांचे राज्य आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस हेच यापुढे महाराष्ट्राचे भाजपातील राष्ट्रीय नेतृत्व असेल असे समजायला हरकत नाही.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -