घरसंपादकीयओपेडकुणी तरी यावर आवाज उठवण्याची गरज!

कुणी तरी यावर आवाज उठवण्याची गरज!

Subscribe

रेल्वे, बेस्ट अडखळते तेव्हा नोकरदारांना लेटमार्कला सामोरे जावे लागते. आपल्याकडे वेळेला महत्त्व दिले जात नसल्याने प्रवाशांच्या किंवा नोकरदारांच्या वेळेला महत्त्व दिले जाईल असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. कामावर जायला उशीर होतो म्हणून नोकरी सोडावी लागल्याची शेकड्यांनी उदाहरणे जागोजागी आढळून येतील. अशा अनेक समस्या सर्वसामान्यांच्या पाचवीला पुजलेल्या आहेत. याबाबत कुणी आवाज उठवतोय असे होत नाही. तो उठवायला हवा.

सध्या मराठा समाजाच्या आंदोलनाची धग सर्वत्र लागत आहे. आरक्षणाच्या मुद्यावर हा समाज एकवटला आहे. परिणामी त्यातून निर्माण झालेल्या धगीमुळे आज ना उद्या सरकारला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे, तर दुसरीकडे मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील टोल प्रश्नावर सरकारला जेरीस आणून काही निर्णय घेणे भाग पाडले. यातूनही काहीतरी चांगले निष्पन्न होईल असे आपण मानूयात! हक्क मिळविण्यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला असताना आंदोलनाचे नेतेही आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, असे उच्चरवात सांगत आहेत. हे सर्व चालू असताना प्रदूषण, गर्दी, खोळंबा यामुळे सर्वसामान्यांचे जे काही हाल, नव्हे मेगाहाल सुरू आहेत त्यावर कुणी बोलणार आहे की नाही, असा (म्हटलं तर भोळाभाबडा) सवाल उपस्थित होत आहे. की या समस्या महत्त्वाच्या नाहीत, असे न बोलणार्‍यांना वाटते काय, असा सवालही उपस्थित होत आहे.

काही महिन्यांपूर्वी याच स्तंभात मुंबई आणि इतर शहरात बांधकामे, शिवाय तथाकथित विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांमुळे धूळ, धुरके यांनी जनता हैराण असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर या कामांमुळे निर्माण होणार्‍या ठिकठिकाणच्या विशेषतः मुंबईतील प्रदूषणावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे, असेही सूतोवाच सरकारी यंत्रणांकडून झाले. प्रत्यक्षात काहीच घडलेले नाही हे सध्या मुंबईत निर्माण झालेल्या प्रदूषणावरून लक्षात येते. या प्रदूषणात सर्वच गुदमरले आहेत. प्रदूषणात ‘बाप’ असलेल्या नवी दिल्लीलाही मुंबई मागे टाकते की काय, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता काय म्हणे तर मुंबईला धुतले जात आहे.

- Advertisement -

यातून नेमके काय घडणार याचा निकाल हाती येण्यासाठी काही दिवस थांबावे लागेल. एखादे शहर प्रदूषणमुक्तीसाठी पाण्याने धुवून काढण्याचा हा फंडा अजबच म्हणावा लागेल. परदेशात काही शहरांतून पाण्याने रस्ते धुवून काढले जातात असे आपण ऐकतो, पण तेथे प्रदूषण होणार नाही याची काळजीही घेतली जाते. आपल्याकडे मुंबईला धुवून झाल्यानंतर धूळ, धुरके यामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे का, असा सवाल कुणी उपस्थित केला तर तो चुकीचा म्हणता येणार नाही. बांधकाम व्यावसायिक त्यांची कामे करताना शिस्त पाळतील याची कुणालाही खात्री वाटत नाही.

मुंबई-गोवा महामार्गाचे ज्या ज्या ठिकाणी काम चाललेय त्या त्या ठिकाणी सध्या धुळीचा कहर झाला आहे. वाहनचालक, प्रवासी हा त्रास मुकाट्याने सहन करत आहेत. या महामार्गाच्या टापूतील आसमंत धुळीने भरून जात असताना त्यावर कुणीही काहीही बोलत नाही. कुणी महत्त्वाचा नेता या मार्गावरून जाणार असेल तर तेथे पाण्याचे फवारे मारले जातात. आताचे नेते चाणाक्ष! या धुळीचा त्रास नको म्हणून ते पर्यायी मार्ग वापरून निघून जातात. मुंबई-गोवा महामार्गावरून दुचाकीसारखे वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. धुळीमुळे सर्दी, खोकला, घशाची खवखव, आवाज बसणे यांसारख्या तक्रारींत मोठी वाढ झाली आहे.

- Advertisement -

या ठिकाणी दररोज पाण्याचा शिडकावा करून धूळ आटोक्यात आणली जाणार नाही. कारण त्यासाठी कुणी आवाजच उठवत नाही. सरकारची संबंधित यंत्रणा आणि मंत्र्यांना महामार्गाची आठवण येते ती फक्त गणेशोत्सवात आणि मग थेट शिमग्याच्या काळात! एरव्ही तेथून प्रवास करणारी माणसे नसतात, असा संबंधितांनी समज करून घेतलाय की काय हेच समजेनासे झाले आहे. गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या स्वागतासाठी फलकबाजी करणारे या मार्गाच्या दुरवस्थेबद्दल काहीच बोलत नाहीत. मार्गाचे चौपदरीकरण होत असाताना तयार झालेले सर्व्हिस रोड किंवा बाह्यवळण रस्ता याची हालत कशी आहे हेही कुणाला बघावेसे वाटत नाही.

काही दिवसांपूर्वी पनवेलजवळ रेल्वेने मार्गिका वाढविण्यासाठी १५ दिवसांचा ब्लॉक घेतला. रोज हे काम अमूक-तमूक वेळेत पूर्ण होणार याचे वायदे केले जात होते. शेवटी रेल्वेच्या सोयीनेच काम होत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रवाशांना कुणी त्राता नसल्याने ते बिचारे सारा त्रास निमूटपणे सहन करताना दिसत होते. पनवेलचे मध्य रेल्वेचे काम होत नाही तोच दिवाळी तोंडावर असताना पश्चिम रेल्वेने गोरेगाव ते वांद्रेदरम्यान एक मार्गिका वाढविण्यासाठी जम्बो ब्लॉक घेतला. ज्या मार्गावर डहाणूपासून चर्चगेट, सीएसएमटीपर्यंत दररोज लाखो प्रवाशांची जा-ये असते तेथेच वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे मेगाहाल स्वाभाविक होते.

प्रवाशांची ओरड सुरू झाली तेव्हा थोड्याफार गाड्या वाढविण्यात आल्या, परंतु जेथे आहेत त्या गाड्या कमी पडतात तेथे बंद केलेल्या दोन-चार गाड्या वाढवून फरक पडेल असे शक्यच नाही. यावर रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले, आम्ही मुंबई, विरार महापालिकेशी चर्चा करूनच ब्लॉक घेतला आहे. महापालिकांशी चर्चा वगैरे ठीक, पण एसटी, बेस्ट यांची योग्य अशी व्यवस्था करणे गरजेचे होते. रेल्वे कोलमडली की सारी प्रवासी वाहतूक व्यवस्था कोलमडते हा अनुभव असणार्‍या लबाड प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवाशांना उजळ माथ्याने लुटण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू होतो.

प्रवाशांना लुटण्याचा धंदा सुरू असतो तेव्हा आरटीओ यंत्रणाही हतबल झाल्यासारखी असते. वाहनांची संख्या वाढत असताना आरटीआेंची संख्या तेवढीच आहे. रेल्वे किंवा बेस्ट, एसटी वाहतुकीला ब्रेक लागतो तेव्हा रिक्षा, टॅक्सीचालकांकडून होणारी लूट कधी थांबणार आहे की नाही, असा सवाल सर्वांच्याच मनात येत असतो. मनाला येईल ते भाडे सांगून प्रवाशांना वेठीला धरले जाते. रात्रीच्या वेळी प्रवाशांकडून दुप्पट, तिप्पट भाडे घेतले जाते. जास्त भाडे घेणार्‍या महाभागांवर कोणतीच कारवाई होत नाही. महिला प्रवाशांचे होणारे हाल शब्दांपलीकडील असतात. यावर कुणी राजकीय नेता बोलतोय असे कधीच दिसले नाही. कुठली राजकीय संघटना याविरोधात रस्त्यावर आलीय असेही होत नाही.

प्रवासी मात्र तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करीत आहेत. कुठे आवाज उठलाच तर आमचे मंत्री कारवाई केली जाईल, असे आश्वासन ठोकून देतात किंवा अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश देऊन जबाबदारीतून मोकळे होतात. रेल्वे, बेस्ट अडखळते तेव्हा नोकरदारांना लेटमार्कला सामोरे जावे लागते. आपल्याकडे वेळेला महत्त्व दिले जात नसल्याने प्रवाशांच्या किंवा नोकरदारांच्या वेळेला महत्त्व दिले जाईल असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. कामावर जायला उशीर होतो म्हणून नोकरी सोडावी लागल्याची शेकड्यांनी उदाहरणे जागोजागी आढळून येतील. याबाबत कुणी आवाज उठवतोय असे होत नाही.

ठराविक मुद्यांवरच आवाज उठवायचा असतो असा राजकीय संघटनांनी समज करून घेतला असल्याने सामान्यांच्या हालाकडे कुणाचेही लक्ष नाही. काय हाल होताहेत ते तुमचे तुम्ही सहन करा, अशी बहुधा मानसिकता झालेली असावी. काही लाखांची वाहने घेताय तर टोल भरता येत नाही का, असे कधीतरी विचारले जाते, पण टोलचा मुद्दा कळीचा आहे. रोड टॅक्स असतानाही टोल कशासाठी, हा जसा कळीचा मुद्दा, तसा टोल घेऊन सुविधा काय देता हाही मुद्दा आहे. त्यामुळे टोलविरोधात आंदोलन योग्य आहे, पण असे आंदोलन होताना दुसरीकडे वेगवेगळ्या कारणांनी जनतेला एकप्रकारे वेठीस धरून त्यांचे केले जाणारे हाल दुर्लक्षिता येणार नाहीत.

यावरही टोल विरोधकांनी, इतर आंदोलने करणार्‍यांनी बोलावे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. यातून मतांचे राजकारण बाजूला ठेवून जनतेचे हाल करणार्‍यांचे कान पिळावे लागणार आहेत. काम, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणारा माणूस घरी पुन्हा सुखरूप येईल याची खात्री नसते. यामागचे कारण एकच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत न आलेली शिस्त! रेल्वे क्षणात लाखो प्रवाशांना एका फटक्यात गैरसोयींना सामोरे जायला लावते, तर प्रवाशांना काहीतरी पर्यायी व्यवस्था करून द्या, हेसुद्धा रेल्वेला कुणीतरी ठणकावून सांगितले पाहिजे. रेल्वेची कामे कधीच थांबणारी नसल्याने मेगाहाल कायमच राहणार आहेत.

वाढते प्रदूषण, बेहाल गर्दी, परिणामी होणारा खोळंबा यावर प्रभावी आवाज उठला पाहिजे. आवाज उठविल्यानंतर पदरात किती मते पडतील, असा स्वार्थी विचार त्यात होता कामा नये. आपल्याकडे प्रदूषण, गर्दी, प्रवासी वाहतूक कोलमडणे याविरोधात प्रभावी आंदोलन उभे राहिलेय असे कधीच घडलेले नाही. सर्वसामान्यांना गृहित धरून त्यांचे हाल केले जात आहेत. मुंबईत होणारे प्रदूषण हा विषय शेलक्या शब्दांत टीका करून संपणारा नाही. इतरत्रचे प्रदूषण आणि अन्य समस्या याबाबतीतही हेच म्हणता येईल. कुणीतरी याविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे. सामान्य माणूस दुवा दिल्यावाचून राहणार नाही इतके नक्की!

कुणी तरी यावर आवाज उठवण्याची गरज!
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -