घरसंपादकीयओपेडदादा हे वागणं बरं नव्हं!

दादा हे वागणं बरं नव्हं!

Subscribe

अजितदादा वॉशरूमला गेले आहेत, ते परत येईपर्यंत आपण वाट पाहू, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात म्हणाले. पण, अजितदादा परत आले नाहीत. अखेर अजितदादांची वाट पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समारोपाचे भाषण केले. शरद पवार यांच्या उपस्थितीत अजित पवार भाषण न करता व्यासपीठावरून खाली उतरल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. त्यामुळे पक्षाच्या अधिवेशनात अजित पवारांच्या रुसव्या फुगव्याची माशी शिंकली आणि पक्षात सारे काही आलबेल नाही याची प्रचिती पुन्हा आली. त्यामुळेच सर्वगुणसंपन्न असलेल्या अजित पवारांना, दादा हे वागणं बरं नव्हं, अशी म्हणण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर आली आहे.

सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात कमिटमेंट पाळणारा, वक्तशीरपणा, पोटात तेच ओठात असणारा, स्पष्टवक्तेपणा, कुणाचीही भीड न ठेवता रोखठोक स्वभाव असलेला नेता म्हणजे अजित अनंतराव पवार. ६३ वर्षांचा हा गडी तेल लावलेल्या पैलवानासारखा सहसा कुणाच्या हाताला लागत नाही. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा ते लोकसभा याच्या कामकाजाची खडानखडा माहिती असलेले एकमेव नाव म्हणजे अजितदादा. ग्रामीण भागापासून शहरी ते मेट्रो सीटीतील समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय काढल्याशिवाय गप्प न बसणारा नेता अशी अजितदादांची ओळख राज्यातील जनतेला मागील ३५ वर्षांपासून आहे.

खासदार, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेटमंत्री, चार वेळा उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्षनेते अशी राज्य सरकारमधील महत्वाची सर्व पदे उपभोगलेला राजकारणी फार कमी आहेत. त्यात शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांचा क्रम वरचा आहे. पण यापैकी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर होते. केवळ मुख्यमंत्री हे एकमेव पद अजितदादांना वारंवार हुलकावणी देत आहे. त्यामुळेच राजकारणाच्या एका टप्प्यावर एरव्ही मीडियाच्या पुढे पुढे न करणारा हा नेता नकळत मीडियाच्या रडारवर येण्यामागे त्यांच्याकडूनच होणार्‍या शुल्लक गोष्टी असतात, ज्या त्यांनी त्या वेळी अथवा त्या दिवशी टाळल्या असत्या तर त्याची एवढी चर्चा करण्याची वेळ ना मीडियावर आली असती ना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजली असती ना विरोधकांना आयता मुद्दा मिळाला असता.

- Advertisement -

अजितदादांबद्दल एव्हढं लिहिण्यामागचे कारण म्हणजे रविवारी दिल्लीत दोन वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. पक्षातील महत्वाचे पदाधिकारी ते वरिष्ठ नेते हे या अधिवेशनाला झाडून उपस्थित होते. या अधिवेशनामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली आणि त्यांनी या राष्ट्रीय अधिवेशनातूनच विरोधी ऐक्याची हाक दिली. मात्र या अधिवेशनाची सांगता होताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाराजी नाट्य चर्चेत राहिले. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात झालेल्या भाषणाइतके अजित पवार यांचे न झालेलं भाषण आणि त्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत.

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर शरद पवारांच्या भाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. पवारांनी या अधिवेशनाची दिशा निश्चित केली. त्यानंतर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, पी. सी. चाको, फौजिया खान यांची भाषणे झाली. या नेत्यांच्या भाषणानंतर पवार समारोपाचे भाषण करतील असे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. पण, हे अधिवेशन राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आयोजित केल्यामुळे युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा यांनाही बोलण्याची संधी दिली गेली. त्यापूर्वी खासदार अमोल कोल्हे यांचे दमदार भाषण झाले. कोल्हेंच्या भाषणानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भाषणाची संधी दिली नसल्याचे लक्षात येताच, पटेल यांनी जयंत पाटील यांना भाषणाचा आग्रह केला. माझ्या आधी कोल्हे यांनी इतके जबरदस्त भाषण केले की मला आता बोलण्याजोगे काही उरलेले नाही’, असे म्हणत पाटील यांनी आटोपते भाषण केले.

- Advertisement -

या सगळ्या नेत्यांची भाषणे होईपर्यंत अजित पवार व्यासपीठावर बसून होते. सभागृहातून अजित पवार यांनी भाषण करण्याची मागणी होऊ लागली. तोपर्यंत जयंत पाटील यांचे भाषण सुरू झाले. कार्यकर्त्यांकडून भाषणाची विनंती होऊ लागल्यानंतर अजित पवार व्यासपीठावरून उठून निघून गेले. प्रफुल्ल पटेल यांनी, जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा करण्याआधी, ‘अजित पवारही खास आग्रहाखातर भाषण करतील’, असे कार्यकर्त्यांसमोर जाहीर केले. पण, अजित पवार निघून गेले. त्यावर, ‘अजितदादा आत्तापर्यंत इथे होते, तुम्ही आग्रह केल्यामुळे ते निघून गेले. ते वॉशरूमला गेले आहेत, ते परत येईपर्यंत आपण वाट पाहू’, असे पटेल म्हणाले. पण, अजित पवार परत आले नाहीत. अखेर अजित पवारांची वाट पाहून शरद पवार यांनी समारोपाचे भाषण केले.

शरद पवार यांच्या उपस्थितीत अजित पवार भाषण न करता व्यासपीठावरून खाली उतरल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. त्यामुळे पक्षाच्या अधिवेशनाची सांगता होत असताना अजित पवारांच्या रुसव्या फुगव्याची माशी शिंकली आणि त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल नाही याची प्रचिती पुन्हा आली. राष्ट्रवादीच्या दिल्लीमधील अधिवेशनात अजित पवार यांच्या कामगिरीसाठी सर्वात मोठा जल्लोष करण्यात आला. पण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी नाव पुकारण्यापूर्वी अजित पवार गायब होते. अधिवेशनाच्या समारोपापूर्वी अजित पवार यांनी अधिवेशनातून काढता पाय घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. कोविडच्या काळात अजित पवार यांनी केलेल्या अर्थ मंत्रालयाच्या हाताळणीचे कौतुक करण्यात आले. मात्र, समारोपापूर्वी अंतिम वक्ता म्हणून अजित पवार कार्यक्रमात नव्हते.

दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा मुख्य फोकस हा शरद पवार पुन्हा एकदा पक्षाचे ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ म्हणून निवडणं हा होता. पण अधिवेशन संपेपर्यंत तो फोकस अजित पवारांवर गेला आणि तेही त्यांनी न केलेल्या भाषणामुळे. अजित पवारांच्या या न झालेल्या भाषणावरुन उलटसुलट चर्चा एवढी आहे की ‘मी पक्षात नाराज नाही’ असं स्पष्टीकरण त्यांना द्यावे लागत आहे. ते देऊनही प्रश्न थांबले नाहीत तर ‘स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, की मी नाराज नाही?’ असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अजित पवार हे कायम या ना त्या कारणावरून सतत चर्चेत असतात. मीडियाला टाळणारे अजितदादा हे कायम मीडियात दिसण्यामागे त्यांचीच काही कृत्ये असतात असे अगोदरच्या अनुभवांवरून दिसते. यापूर्वीही अनेकदा जेव्हा जेव्हा पक्षाचा अथवा शरद पवार यांचा महत्वाचा दिवस असतो तेव्हा अजितदादांच्या वेगळ्याच कृतीने मीडियाचा फोकस हा शरद पवार यांच्यावरून अजित पवारांवर गेलेला असतो.

सत्तेमध्ये असोत वा नसोत अजितदादा कायम चर्चेत असतात. केवळ चर्चेतच नाही तर प्रसिद्धीतीतही असल्याने बर्‍याचदा वादही निर्माण होतात. शिवाय स्पष्टवक्ते, फटकून वागणारे अशी प्रतिमा असणार्‍या अजित पवारांच्या यापूर्वी झालेल्या बंडांनंतर कायम नाराजीच्या बातम्या त्यांच्याबाबतीत अधून मधून येत असतात. त्यामुळे अशा प्रकारांना अजित पवारही नवे नाहीत. राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांसोबत इतर नेत्यांची वर्चस्वाची स्पर्धा लपून राहिलेली नाही. बहुतांशी ती मुख्य वारसदार कोण म्हणून सुप्रिया सुळेंशी असते, तर इतर पदांसाठी अनुभवाने समकालीन असणार्‍या पक्षातल्या अन्य नेत्यांसमवेत असते. त्यामुळे या स्पर्धेतूनही नाराजीच्या बातम्या नवनव्या निमित्ताने येतात.

आता निमित्त होते पक्षाच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अजित पवारांचं भाषण न होण्याचं. ते पुन्हा काही नवीन भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत का असे सगळेच विचारु लागले. त्यामुळे लगेचच अजित पवार नाराज आहेत का यापसून ते त्यांना डावललं गेलं का, याच्या चर्चा तात्काळ सुरू झाल्या. विधानसभेतले विरोधी पक्षनेते असलेले आणि ‘राष्ट्रवादी’कडून कायम मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असलेले पक्षातले क्रमांक दोनचे नेते असलेले अजित पवार राष्ट्रीय अधिवेशनात बोलले नाहीत ही गोष्ट अनेकांना आश्चर्य वाटण्यासारखीच आहे.

महाविकास आघाडी सरकार गेल्यावर विरोधी पक्षनेतेपदासाठी जयंत पाटील आणि अजित पवार, दोघांचीही नावं चर्चेत होती. पण या तात्कालिक कारणापासून एकंदरीतच अजित पवार पक्षात नाराज आहेत का, अशा शंका उपस्थित केल्या गेल्या. पण अजित पवारांनी या सगळ्या चर्चा व्यर्थ आहेत, असे त्यांना मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यांनी आपण कुठल्याही प्रकारे नाराज नसल्याचं वारंवार सांगत आपण भाषण न केल्याची आणि मंचावरुन खाली गेल्याची अनेक कारणे सांगितली. आपल्या या कृतीचा विपर्यास केल्याचं सांगताना राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेत्यांनी बोलणं अपेक्षित असतं. १९९९ पासून मी या अधिवेशनात उपस्थित राहतो, पण बोलत नाही, असं अजित पवार म्हणाले. वास्तविक तिथं मला कोणी बोलू नका असंही सांगितलं नाही. मीच माझी भूमिका तिथं घेतली. आणि मी एकटाच बोललो नाही असं नाही. सुनील तटकरे, वंदना चव्हाण हेही वेळेअभावी बोलू शकले नाहीत, असा खुलासा अजित पवार यांनी केला असला तरी त्यावर विश्वास ठेवायला कुणीही तयार नाही.

अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि भावनिक पण आहेत असे त्यांचे निकटवर्तीय, पाठीराखे सांगत असतात. त्यांच्या नाराजीचा प्रत्यय यापूर्वीही अनेकदा आला आहे. त्यातूनच अशा भावनेतून त्यांनी टोकाचे निर्णय घेतले आहेत. जेव्हा काँग्रेसच्या सहकार्याने आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री होते तेव्हा त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. त्यानंतर व्यथित, नाराज होऊन त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यावेळेस राष्ट्रवादीतले सहकारी, नेतेही गोंधळात पडले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीअगोदर त्यांनी अचानक २७ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. हा निर्णय शरद पवार यांनाही माहीत नव्हता. त्यावेळेस अनेक अंतर्गत वाद सुरू होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा शिवसेनेसोबत महाविकास आघाडीचे सरकार प्रत्यक्षात येणे नक्की झाले तेव्हासुद्धा अचानक अजित पवारांनी बंड केले होते. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ८० तासांचे अयशस्वी सरकार स्थापन केले होते. असं म्हणतात की, आपण भाजपासोबत जावे या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काहींच्या मताचे ते होते आणि तसं होत नाही म्हटल्यावर अजितदादांनी नाराज होत बंडाचे निशाण फडकावले होते. गेल्या काही महिन्यापासून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे. त्याचीच परिणती म्हणजे दिल्लीतील पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनातील दादांच्या नाराजीकडे बघितले गेले पाहिजे.

तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीची नोटीस आली होती. त्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी मोठे पवार स्वत: ईडीच्या बेलार्ड पिअरच्या कार्यालयात जाणार होते. मुंबईसह राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार होते. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आयुक्त संजय बर्वे हे जातीने या प्रकरणावर लक्ष ठेवून होते. त्यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेत त्यांना ईडीच्या कार्यालयात न जाण्याची विनंतीही केली होती. मात्र चाणाक्ष आणि राजकारणात संधीचे सोने करण्यात हातखंडा असलेल्या पवारांनी त्यांना त्यावेळी काहीच सांगितले नाही. पण नंतर काही तासात ईडीने, शरद पवार यांना पाठवलेल्या नोटिसीसाठी त्यांना जबानी देण्यासाठी ईडी कार्यालयात येण्याची गरज नाही, असा खुलासा केल्याने दोन दिवसांपासून सुरू असलेला राजकीय गोंधळ थांबला होता. मात्र त्याच दिवशी २७ सप्टेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा देऊन ते नॉटरिचेबल झाले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेला शरद पवार यांच्यावरील मीडियाचा फोकस आपसूकच अजितदादांवर आला होता.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा देत कर्जत तालुक्यातील त्यांच्या अंबालीका साखर कारखान्यावर गेले होते. फोन नॉट रिचेबल, कोणालाच त्यांचे लोकेशन माहीत नसल्याने संध्याकाळपासून दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत अजित पवार नाराज अशा बातम्या सर्वत्र झळकत होत्या. अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर अजित पवार यांचा मोबाईलही बंद लागत होता. अजित पवार २६ सप्टेंबर रोजी दिवसभर बारामतीत होते. त्यांनी पूरग्रस्त भागातही दौरा केला. तर दुसरीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दिवसभर मुंबईत होते. त्यामुळे त्यांच्या या तडकाफडकी राजीनाम्याचे कारण कोणलाही माहिती नाही. त्यानंतर शरद पवार यांनीही अजित पवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी २७ सप्टेंबर २०१९ रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा राजीनामा तात्काळ मंजूरही केला होता.

अडचणीचे ढग दिसले की अजित पवार ‘मिस्टर इंडिया’ सारखे गायब होतात असा टोला काही दिवसांपूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी लगावला होता. राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर अजित पवार यांची प्रतिक्रिया काही काळ न आल्याने राणे बोलले होते. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल, असेही निलेश राणे म्हणाले होते. राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया ताई आणि अजितदादा असे गट आहेत हे कायम दिसण्यात येते. त्या स्पर्धेतूनही पक्षांतर्गत असे प्रसंग सध्या घडताना दिसतात. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही नेतृत्वाच्या स्पर्धेतले प्रमुख एक नाव आहे. या वर्चस्वाच्या भावनेतून नाराजी नाट्य तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात कायम असते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवारांचा वारसदार कोण हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ते अजित पवार आहेत की सुप्रिया सुळे की अनेकदा संधी हुकलेले जयंत पाटील हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

पण कालच्या या प्रसंगावरुन अजित पवारांचा पक्षातला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला. सगळे ज्याप्रमाणे त्यांना समजवायला गेले, कार्यकर्ते घोषणा देत होते वगैरे पाहून दादांचा अजूनही पक्षावर होल्ड असल्याचेच दिसले. अजित पवार नाराज आहेत हे काही आता लपून राहिलेले नाही. पक्षांतर्गत स्पर्धेपासून अनेक कारणे त्यामागे आहेत. एक तर त्यांना गेल्या वेळेस बंडासाठी अपेक्षित आमदारांचा आकडा जमवता आला नाही. तसेच त्यांचे बंड मोडून काढले तेही त्यांच्याच काकांनी, हे त्यांच्या मनात नक्कीच असेलच. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीचा अर्थ बंडाच्या चष्म्यातून लावला जाईल आणि त्यांची नाराजी त्या छोट्या छोट्या कृतींतून दिसत राहण्याची शक्यता जास्त आहे. तसेच जी व्यक्ती चारवेळा उपमुख्यमंत्री राहिली आहे आणि सध्या विरोधी पक्षनेता आहे, त्यांचे भाषण पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात नसणे ही गोष्ट कोणत्याही कार्यकर्त्याच्या पचनी पडणारी नाही. त्यामुळेच सर्वगुणसंपन्न असलेले अजित पवार… राजकारणात दादा हे वागणं बरं नव्हं, अशी म्हणण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर आली आहे.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -