घरसंपादकीयओपेडराजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला!

राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला!

Subscribe

ईशान्य मुंबईतून उमेदवारी मिळेल, अशी माजी खासदार किरीट सोमय्या यांना वाटत होते. महाविकास आघाडीतील अनेक बड्या नेत्यांचे सोमय्या यांनी घोटाळे उजेडात आणून सत्तांतरात महत्वाची भूमिका बजावली होती. सोमय्यांच्या आरोपामुळे अडचणीत आलेले अनेक नेते भाजपच्या गळाला लागले होते. त्यातूनच महाराष्ट्रात भाजप भक्कम बनली होती. त्यामुळेच पक्ष या कामाची दखल घेऊन पुन्हा एकदा ईशान्य मुंबईतून संधी देईल, अशी आशा असलेल्या सोमय्या यांच्या पदरी निराशा पडली आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातच रस होता, मात्र पक्षाने त्यांना चंद्रपूरमधून उमेदवारी देऊन संकटात टाकले आहे. पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांच्या बहिणीचा पत्ता कापला आहे. गडकरी यांना उमेदवारी दिली, पण ती देताना नेतृत्वाने आपली जरब दाखवली आहे.

लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून महाराष्ट्रातील महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्यानेच भाजपच्या नेतृत्वाने उमेदवारांची नावे जाहीर करण्यासाठी वेळ घेतला. शिंदे गटाने आपल्यासोबत तेरा खासदार आल्याने भाजपकडे पंधरा जागांची मागणी केली आहे, तर एकही खासदार सोबत नसतानाही अजित पवार गटाने दहा जागांची मागणी केली आहे.

त्यामुळेच महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. गेल्या आठवड्यात मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. दिल्लीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली, पण जागावाटपावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

- Advertisement -

लोकसभेच्या महाराष्ट्रातील काही जागांवर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात मतैक्य होत नसल्याने भाजपने महाराष्ट्र वगळून उमेदवारांची यादी जाहीर केली. महाराष्ट्राची यादी जाहीर करतानाही भाजपने तिढा सुटू न शकलेल्या जागा वगळण्याची खबरदारी घेतली आहे, मात्र शिंदे आणि पवार गटाने पंचवीस जागांची मागणी केली असतानाही भाजपने वीस जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित २८ जागांचे वाटप करतानाही भाजप मोठा वाटा मागणार हे निश्चित मानले जाते. त्यामुळे दोन्ही गटात आतापासूनच नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

जागावाटपानंतर भाजपमधील असंतोषही आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. उत्तर मुंबईतील विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शेट्टी समर्थकांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर फेकल्या गेलेल्या विनोद तावडे यांनी केंद्रीय पातळीवर चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे त्यांनाही उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती, पण पक्षाने त्यांची निराशाच केली आहे.

- Advertisement -

ईशान्य मुंबईतून आमदार मिहीर कोटेचा यांना लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपने विद्यमान खासदार मनोज कोटक यांचे तिकीट कापले आहे. ईशान्य मुंबईतून उमेदवारी मिळेल, अशी माजी खासदार किरीट सोमय्या यांना वाटत होते. महाविकास आघाडीतील अनेक बड्या नेत्यांचे सोमय्या यांनी घोटाळे उजेडात आणून सत्तांतरात महत्वाची भूमिका बजावली होती. सोमय्यांच्या आरोपामुळे अडचणीत आलेले अनेक नेते भाजपच्या गळाला लागले होते. त्यातूनच महाराष्ट्रात भाजप भक्कम बनली होती.

त्यामुळेच पक्ष या कामाची दखल घेऊन पुन्हा एकदा ईशान्य मुंबईतून संधी देईल, अशी आशा असलेल्या सोमय्या यांच्या पदरी निराशा पडली आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातच रस होता, मात्र पक्षाने त्यांना चंद्रपूरमधून उमेदवारी देऊन संकटात टाकले आहे. त्यामुळे भाजपचे माजी खासदार हंसराज अहिर यांच्या गटातही नाराजीचा सूर आहे.

पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ब्राम्हण उमेदवार न दिल्याने भाजपला पराभव पत्करावा लागला होता. पुण्यात ब्राम्हणांना डावलणे महागात पडते, याची जाणीव झालेल्या पक्षनेतृत्वाने मागील राज्यसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना खासदारकी देऊन चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. रावेरमधून भाजपने राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देऊन खडसेंची कोंडी करत पराभव होणार नाही याची दक्षता घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या खडसे यांनी भाजपच्या यादीत सुनेचे नाव आल्यानंतर प्रकृत्तीचे कारण देत निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले आहे. भाजपच्या खेळीने शरद पवार गटात अस्वस्थता असून रक्षा खडसे यांच्याविरोधात रोहिणी खडसेंना मैदानात उतरवण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. ही कोंडी एकनाथ खडसे कसे फोडतात, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, रक्षा खडसे यांना तिसर्‍यांदा उमेदवारी देऊन भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना डावलल्याने नाराजी समोर आली आहे.

खडसेंप्रमाणेच भाजपने बीडमधून उमेदवारी देऊन पंकजा मुंडे यांना कात्रीत पकडले आहे. विधानसभेत आपल्याच पक्षातील लोकांनी पराभव करून महाराष्ट्राच्या राजकारणातूनही बाद केल्याची सल मुंडे यांच्या मनात होती. मुंडेंनी आपल्या वेदना अनेकदा बोलूनही दाखवल्या आहेत. लोकसभेची उमेदवारी देऊन मुंडेंची नाराजी दूर केल्याचे भाजपकडून दाखवले जात असले तरी ही उमेदवारी देताना पंकजा मुंडे यांची बहीण प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापण्यात आले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपमध्ये मोहिते-पाटील गट प्रचंड अस्वस्थ झाला आहे. ही नाराजी थेट एकनाथ शिंदे गटातही पोहोचली आहे. माढा विभाग शिवसेना संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी पक्षाचा राजीनामा देत रणजितसिंह निंबाळकर यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्यावर सत्ताधारी भाजप मराठा आणि धनगर समाजात भांडण लावून आपली पोळी भाजून घेतल्याचा आरोपही कोकाटे यांनी केला आहे.

विजय साखर कारखान्याच्या विक्री प्रकरणात खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी आमदार शिंदे यांचे हित पाहिले आणि शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे देणे आणि शेअर्सच्या रकमांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली. याच नेत्यांनी मला आणि नागनाथ कदम यांना आमदार बबनराव शिंदे व त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्याविरोधात ईडी तक्रार करायला लावले होते, असाही आरोप करत कोकाटे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवरच आसूड ओढले आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्याकडे झुकले आहेत. शरद पवार व विखे कुटुंबीयात राजकीय पूर्ववैमनस्य आहे. त्यातूनच विखे यांच्याविरोधात सक्षम उमेदवार उभा करण्यासाठी पवार यांनी आमदार निलेश लंकेंना पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा इशारा दिल्याने पवार-शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पक्षीय आणि संसदीय कामकाजापासून दूर ठेवण्यात आल्याने नितीन गडकरी यांची नाराजी दिसून येत होती. त्यामुळे गडकरी यांना उमेदवारी मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत होता. गडकरी भाजपचे वरिष्ठ नेते असल्याने पहिल्या यादीत त्यांचे नाव न आल्याने या शंकेला दुजोरा मिळू लागला होता, पण उद्धव ठाकरेंसह महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांनी याबद्दल टीका करून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील यादीत गडकरी यांचे नाव पहिले असेल, असे सांगत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला होता. गडकरी यांचे तिकीट कापले तर महाराष्ट्रात फटका बसेल याची जाणीव झाल्याने पक्षनेतृत्वाला नाईलाजाने उमेदवारी जाहीर करावी लागली, पण उमेदवारांच्या यादीत गडकरी यांचे नाव सातव्या क्रमांकावर टाकून त्यांचे पक्षात महत्व नसल्याचा संदेश देण्याचे काम केले गेले.

भाजपने वीस उमेदवार जाहीर केल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील तेरा खासदार आहेत. भाजपने पहिल्या यादीत या खासदारांच्या मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेले नाहीत, मात्र उर्वरित अठ्ठावीस जागांचा तिढा सोडवताना शिंदे गटातील काही खासदारांची गच्छंती पक्की मानली जाते. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपने आपला दावा अद्यापही कायम ठेवल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही कोंडी अद्याप सोडवू शकलेले नाहीत.

त्यात आता आपल्यासोबत आलेल्या खासदारांची उमेदवारी टिकवण्याचे मोठे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. कारण, उमेदवारी कापली गेली तर सोबत आलेल्या खासदारांच्या रोषाला शिंदे यांनाच सामोरे जावे लागणार आहे. त्यातून पक्ष फुटीची टांगती तलवार असून आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसण्याचाही धोका आहे. पक्ष टिकवण्यासोबतच तो वाढवून स्वत:सह सहकार्‍यांचे राजकीय भवितव्य धोक्यात न येण्याची काळजी शिंदे यांना घ्यावी लागणार आहे.

राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला!
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -