वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु । म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥
म्हणून मोह हाच कोणी सर्प त्याने पार्थाला ग्रासले आहे हा हेतु मनात धरून मी इथे हे रूपक केले.
मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु । जैसा घनपटळीं भानु । आच्छादिजे ॥
ज्याप्रमाणे मेघपटलांनी सूर्य झाकोळावा, त्याप्रमाणे अर्जुन यावेळी भ्रमाने झाकोळला आहे.
तयापरी तो धनुर्धरु । जालासे दु:खें जर्जरु। जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥
जसा उन्हाळ्यात डोंगराला वणवा लागतो तसा तो अर्जुन दु:खाने अगदी जर्जर होऊन गेला.
म्हणोनि सहजें सुनीळु । कृपामृतें सजळु । तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥
म्हणून, वणवा लागलेल्या डोंगरावर जसे पाण्याने भरलेले नीलवर्ण मेघ कोसळून तो शांत करितात, तसा आधीच नीलवर्ण व कृपामृतरूप जलाने भरलेला तो महामेघरूप गोपाळ अर्जुनाकडे वळला.
तेथ सुदर्शनांची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती । गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥
त्याठिकाणी (श्रीकृष्णरूपी मेघाच्या ठिकाणी) शुभ्र दातांची कांती हीच जणू काही चमकणारी वीज होती आणि त्याचे गंभीर बोलणे हाच मेघ गर्जनेचा (गडगडाटाचा) थाट होता.
आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळु निवेल । मग नवी विरूढी फुटेल । उन्मेषाची ॥
असा तो श्रीभगवानरूप उदार मेघ आता कशी वृष्टी करील व त्या वृष्टीने अर्जुनरूप पर्वत कसा शांत होईल आणि त्याला ज्ञानाचा कसा नवा अंकुर फुटेल,
ते कथा आइका । मनाचिया आराणुका ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥
ती कथा सावधान चित्ताने ऐका, असे निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणाले.
ऐसें संजयो असे सांगतु । म्हणे राया तो पार्थु । पुनरपि शोकाकुळितु । काय बोले ॥
याप्रमाणे धृतराष्ट्रास सांगून संजय आणखी म्हणतो:- राजा, पुन: तो अर्जुन शोकयुक्त अंतःकरणाने काय बोलू लागला.