घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तरी दोन्ही पालववेरी । जैसा एक तंतू अंबरीं । तैसा मीवांचूनी चराचरीं । जाणती ना ॥
वस्त्राच्या दोन्ही पदरापर्यंत जसा आडवा व उभा भरलेला तंतूच असतो, त्याप्रमाणे चराचर विश्वामध्ये माझ्याशिवाय ते दुसरे काही ओळखत नाहीत.
आदि ब्रह्मा करूनी । शेवटीं मशक धरूनी । माजी समस्त हें जाणोनी । स्वरूप माझें ॥
सर्वामध्ये श्रेष्ठ असलेल्या ब्रह्मदेवापासून अतिशय क्षुद्र असलेल्या चिलटापर्यंत सर्व भूतामध्ये माझे स्वरूप आहे, असे ते समजतात.
मग वाड धाकुटें न म्हणती । सजीव निर्जीव नेणती । देखिलिये वस्तू उजू लुंटिती । मीचि म्हणोनि ॥
मग लहान मोठे, सजीव व निर्जीव असा भेद न धरता, जी जी वस्तु दृष्टीस पडेल ती मद्रूपच आहे, अशा सरळ भावाने ते जीवमात्राला साष्टांग नमस्कार करतात.
आपुलें उत्तमत्त्व नाठवे । पुढील योग्यायोग्य नेणवे । एकसरें व्यक्तिमात्राचेनि नांवें । नमूंचि आवडे ॥
आपला मोठेपणा विसरून पुढे येणारी वस्तू योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे न जाणता सरसकट सर्व वस्तूंच्या नावाने मला नमस्कार करणे हेच त्यांना आवडते.
जैसें उंचीं उदक पडिलें । तें तळवटवरी ये उगेलें । तैसें नमिजे भूतजात देखिलें । ऐसा स्वभावोचि तयांचा ॥
ज्याप्रमाणे पुष्कळ उंचीवरून पडणारे पाणी एकदम सहज तळाशी येते, त्याप्रमाणे जो प्राणी भेटेल त्यास नमस्कार करणे असा त्यांचा स्वभावच बनतो.
कां फळलिया तरूची शाखा । सहजें भूमीसी उतरे देखा । तैसें जीवमात्रां अशेखां । खालावती ते ॥
किंवा फळाने भरलेल्या झाडाची फांदी जशी आपोआप भुईला लवलेली असते, त्याचप्रमाणे प्राणिमात्रापुढे ते नमस्कार घालतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -