घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तें वांचूनि आन न निपजे । कां पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें ॥
जसे जमिनीत जे धान्य पेरावे तेच उत्पन्न होत नाही किंवा आरशात जे पहावे तेच दृष्टीस पडते;
नातरी कडेयातळवटीं । जैसा आपुलाचि बोलू किरीटी । पडिसादु होऊनि उठी । निमित्तयोगें ॥
किंवा अर्जुना, डोंगराच्या कड्याखाली ज्याप्रमाणे आपलाच शब्द प्रतिध्वनीच्या रूपाने उमटतो,
तैसा समस्तां यां भजनां । मी साक्षिभूतु पैं अर्जुना । एथ प्रतिफळे भावना । आपुलाली ॥
त्याचप्रमाणे अर्जुना या सर्व उपासनांचा मीच, साक्षीभूत आहे. या उपासनेत ज्याची त्याची भावना फलद्रूप होते.
आतां याचिपरी जाण । चार्‍ही हे वर्ण । सृजिले म्यां गुण । कर्मविभागें ॥
आता ह्याचप्रमाणे हे जे चार वर्ण आहेत, तेही गुण व कर्म यांच्या विभागाने मीच उत्पन्न केले आहेत, असे तू समज.
जे प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें। कर्में तदनुसारें । विवंचिलीं ॥
आणि त्या चारही वर्णाच्या कर्माची आपापल्या प्रकृतिधर्माने आणि गुणाच्या तारतम्याने व्यवस्था केली आहे.
एथ एकचि हे धनुष्यपाणी । परी जाहले गा चहूं वर्णीं । ऐसी गुणकर्मकडसणी । केली सहजें ॥
अर्जुना, हे सर्व लोक एकच असून चतुर्वर्णात्मक झाले. गुण व कर्म यांच्या योगाने त्यांच्या चार वर्णाची व्यवस्था सहज झाली.
म्हणौनि आइकें पार्था । हे वर्णभेदसंस्था । मी कर्ता नव्हें सर्वथा । याचिलागीं ॥
गुणकर्मानुरूपच वर्णभेदाची व्यवस्था झाली आहे. म्हणून पार्था, या वर्णभेदाच्या स्थापनेचा मी मुळीच कर्ता नाही.
हें मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाहीं केलें । ऐसें जेणें जाणितलें । तो सुटला गा ॥
हा वर्णभेद जरी माझ्यापासून झाला आहे म्हणजे माझ्या सत्तेने झाला आहे, तरी तो मी केला नाही असे जो जाणतो तोच कर्मातीत झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -