घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

परी कर्माचिये मूर्ति । यज्ञीं अधिवासु श्रुति । ऐकें सुभद्रापति । अखंड गा ॥
पण हे सुभद्रापते, ऐक; कर्माची मूर्ति जो यज्ञ, त्यांत वेदरूपी ब्रह्म निरंतर वास करिते.
ऐशी हे आदि परंपरा । संक्षेपें तुज धनुर्धरा । सांगितली या अध्वरा । लागूनियां ॥
याप्रमाणे धनुर्धरा, या स्वधर्मरूप यज्ञाची मूळ पीठिका तुला संक्षेपाने सांगितली.
म्हणौनि समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु । नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥
म्हणून जो उन्मत्त पुरुष सर्वप्रकारे उचित अशा या स्वधर्मरूप यज्ञाचे या लोकी आचरण करीत नाही,
तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी। जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥
तसेच जो दुराचरणाने इंद्रियांना विषय पुरविण्यात काळ घालवितो, तो पापराशी, भूमीला केवळ भारभूत आहे, असे समज.
तें जन्मकर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ । जैसें कां अभ्रपटळ । अकाळींचें ॥
ज्याप्रमाणे अकाली आकाशात आलेले ढग निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे, अर्जुना, त्या उन्मत्त मनुष्याची सर्व जन्मातील कर्मे निष्फल होत.
कां गळां स्तन अजेचे । तैसें जियालें देखैं तयाचें । जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना ॥
ज्याला स्वधर्माचे अनुष्ठान घडत नाही, त्याचे जिणे शेळीच्या गळ्यातील स्तनाप्रमाणे व्यर्थ होय.
म्हणौनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणें न संडावा । सर्वभावें भजावा । हाचि एकु ॥
म्हणून पांडवा, ऐक :- हा स्वधर्म कोणी सोडू नये, तर सर्व भावाने याचेच आचरण करावे.
हां गा शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य वोघें आलें । मग उचित कां आपुलें । वोसंडावें? ॥
पहा की, शरीर जरी प्राप्त झाले आहे, तरी पूर्वकर्तव्यकर्म हे ओघाने आलेच. असे जर आहे तर आपले उचित कर्म का सोडावे?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -