घरमनोरंजनआँखो में तेरी अजब सी अजब सी अदाये है !

आँखो में तेरी अजब सी अजब सी अदाये है !

Subscribe

परिकथेतील राजकुमारी प्रमाणे ती लोभसवाणी असली तरी तिच्या कारकिर्दीसोबतच वैयक्तिक जीवनाचा आलेख तेवढा सरळसोट नाही. तिला अनेक भावनिक- मानसिक संघर्षांतून जावे लागले आहे. वेगवेगळ्या कारणांवरून तिच्याबद्दल होणाऱ्या चर्चा तर तिच्या पाचवीला पुजलेल्या आहेत. सुरवातीच्या काळामध्ये सिद्धार्थ माल्यासोबत असलेली तिची मैत्री, रणबीर कपूरच्या प्रेमात तिने मानेवर गोंदवलेला ‘आर के’ चा टॅटू, ‘पद्मावत’ चित्रपटादरम्यान तिला मिळालेल्या धमक्या, क्लेव्हज कॉंट्रोव्हर्सी, तिने जे. एन. यु. ला दिलेली भेट, रणवीर सिंग सोबतच तिचं प्रेम प्रकरण व नंतर झालेला विवाह… आणि आता आगामी ‘पठाण’ चित्रपटामध्ये तिने परिधान केलेली भगव्या रंगाची बिकिनी !… पण तरीही आज तरी दीपिका पादुकोण भारतीय सिनेसृष्टीतील ध्रुवपदावर विराजमान आहे. दीपिका आज तिच्या वयाची ३७ वर्षे पूर्ण करत आहे. गेल्या सोळा वर्षांत तिच्या नावावर फक्त तीस चित्रपट आहेत. चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेणारी भारतीय सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण हे प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू होते हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आपणही वडिलांप्रमाणे बॅडमिंटन खेळाडू व्हावे असे दीपिकाला लहानपणापासून वाटले होते. परंतु नियतीची योजना तिच्यासाठी काहीतरी वेगळी होती. मागे एकदा दीपिकाने बॅडमिंटन बद्दलच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देताना माध्यमांना सांगितले होते की, सकाळी पाच वाजता उठून व्यायाम करणे, त्यानंतर शाळेत जाणे, शाळेनंत बॅडमिंटनची प्रॅक्टिस करणे आणि पुन्हा घरी येऊन झोपून जाणे. असे तिचे शाळा आणि बॅडमिंटन एवढेच जग होते. बॅडमिंटनमध्ये तिची नॅशनल लेव्हल चॅम्पियनशिपपर्यंत मजल गेलेली होती. अशातच कधीतरी वयाच्या आठव्या वर्षी जाहिरातींसाठी मॉडेलिंग करण्याची ऑफर आली. दहावीपर्यंत तिचा संपूर्ण फोकस बदलला आणि एक फॅशन मॉडेल होण्याचा निर्णय तिच्या डोक्यात घर करू लागला. केवळ घरात बॅडमिंटनचे संस्कार झाले होते म्हणून आपण खेळतोय, याची तिला तीव्र जाणीव झाली. तिने धाडस करून वडिलांना हे विचार बोलून दाखवले. त्यांनीही मोठ्या मनाने स्वीकारले आणि दीपिका ,फॅशन स्टायलिस्ट-प्रसाद बापदा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ मॉडेलिंग करियरकडे वळली.

- Advertisement -

दीपिकाच्या लिरील साबणाच्या जाहिरातीला चांगलाच प्रतिसाद मिळाला. क्लोजअप टूथपेस्ट, लिम्का, पेप्सी अशा एका मागोमाग एक जाहिराती तिला मिळत गेल्या. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ती ‘लॅक्मे फॅशन अवॉर्ड’मध्ये उतरली आणि त्याच वर्षी दीपिकाला ‘किंग फिशर फॅशन अवॉर्ड’ मध्ये ‘मोडेल ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला. लागलीच दीपिकाची ‘किंगफिशर कॅलेंडर’मध्ये वर्णी लागली.

याच काळात हिमेश रेशमियाचा ‘आपका सुरूर’ हा म्युझिक व्हिडिओ लोकप्रिय झाला होता. त्यातील ‘नाम है तेरा मेरा…’ या म्युझिक व्हिडिओमध्ये हिमेशच्या भोवती फिरणारी मुलगी दीपिका पादुकोण आहे हे कुणाच्या लक्षातही आले नाही. पण या गाण्यानंतर मात्र दीपिकाला चित्रपटांसाठी विचारले जाऊ लागले. परंतू अभिनयासाठी अजून आपण परिपक्व नाही याची तिला जाणीव होती. म्हणून आधी तिने अनुपम खेर यांच्या फिल्म अकॅडमीमध्ये अभिनयाचे धडे घेतले.

- Advertisement -

फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’ या हिंदी चित्रपटामध्ये दीपिका प्रथमच झळकली असली, तरी त्याआधी ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटातून ती पडद्यावर दिसली होती. आश्चर्य म्हणजे म्हणजे या चित्रपटाने पाच करोड रुपयांचा गल्ला जमवून व्यावसायिक यश संपादन केले. त्यादरम्यान फराह खान तिच्या ‘ओम शांती ओम’ या आगामी चित्रपटातील शाहरुख खानसोबत मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी मॉडेलचा चेहरा शोधत होती. तेव्हा फॅशन डिझाइनर वेंडेल रॉड्रिक्स यांनी दीपिकाचे नाव मलाइका अरोराच्या माध्यमातून फराहला सुचवले. फराहनेही तिला हिमेशच्या अल्बममध्ये पाहिले होतेच, त्यामुळे दिपीका तिच्या पसंतीस उतरली.

दीपिकाच्या जीवनातील नवा अध्याय ‘ओम शांती ओम’पासून सुरु झाला. दीपिकानेही आलेल्या संधीचे सोने केले. तिने ज्या पद्धतीने तिच्या वाट्याला आलेल्या दुहेरी भूमिका वठवल्या, त्या पाहता हा तिचा पहिलाच चित्रपट असावा असे कोणालाही वाटणार नाही. दीपिकाकडे अभिनयाचा अनुभव नसला तरी तिच्याकडे समज होती. तिला मिळालेल्या ‘ओम शांती ओम’ मधील दुहेरी भूमिकांसाठी तिने हेलन आणि हेमामालिनी यांचे अनेक चित्रपट पाहून, त्यांच्या देहबोलीचा अभ्यास केला. त्यानुसार सराव केला. परिणामी त्या वर्षीचा ‘फिल्मफेअर – सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री’ हा पुरस्कार दीपिकाला मिळाला. ३५ कोटींमध्ये बनवलेला हा सिनेमा १४९ कोटींचा गल्ला जमवून सुपरहिट झाला !

दीपिकाचा २००८ मध्ये रणबीर कपूरसोबतचा ‘बचना ऐ हसीनो’ हा चित्रपट २३ कोटींमध्ये बनला आणि ६१.५७ कोटींचा गल्ला जमवून सेमीहिट ठरला. २००९ चा अक्षय कुमारसोबतचा ‘चांदनी चौक टू चायना’ यात दीपिकाने डबल रोल केला होता. यातील तिची चायनीज आवृत्ती सुंदर होती. दीपिकाने यासाठी खास ‘जुजुत्सु’ तंत्राचे प्रशिक्षण घेतले. त्यातील स्टंटही स्वतःच केले होते. दुर्दैवाने हा चित्रपट आपटला. पुढे इम्तियाज अली दिग्दर्शित, सैफ अली खानसोबतचा ‘लव आज कल’ हा तिच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट चित्रपट ठरला. सारा अली खानने साकारलेला ‘लव आज कल’ आणि दीपिकाच्या ‘लव आज कल’ मधील भूमिका जर पाहिली तर आपल्या निश्चितच हे लक्षात येईल की, दीपिका आजच्या घडीला सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री का आहे?…

२०१०मध्ये दीपिकाचे एकामागोमाग एक पाच चित्रपट प्रदर्शित झाले. यातला ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’ हा सिनेमा फरहान अख्तरसोबतचा सायकॉलॉजिकल ड्रामा होता. तो जरी बॉक्स ऑफिसवर आपटला असला तरी एकदा पहावाच. काही वेळा चांगले सिनेमे काही कारणांमुळे दुर्लक्षित राहतात. नील नितीन मुकेश सोबतच्या ‘लफंगे परिंदे’ या चित्रपटामध्ये तिने साकारलेल्या आंधळ्या मुलीची भूमिका समीक्षकांनी उचलून धरली.

२०११मध्ये दीपिकाने केलेलं आइटम सॉन्ग ‘दम मारो दम’ तिचे वेगळेच रूप समोर घेऊन आले. ते जेवढे हिट ठरले तेवढेच विवादास्पद ठरले. प्रकाश झा च्या ‘आरक्षण’मध्ये हाताळलेला सामाजिक विषय पाहता त्या चित्रपटात काम करणाऱ्या सर्वच कलाकारांच्या कारकिर्दीतील तो एक उत्कृष्ट चित्रपट आहे. दीपिकानेही त्यात साकारलेल्या तिच्या भूमिकेसाठी श्रेय दिलेच पाहिजे.

२०१२ मध्ये इम्तियाज अलींचा ‘कॉकटेल’ हा चित्रपट आला. यातील मानसिक संतुलन ढळणाऱ्या ,आतताई ‘वेरोनिका’ची भूमिका दीपिकाने जाणीवपूर्वक स्वीकारली कारण तिला स्वतःच्याच अभिनयाच्या मर्यादा तोडायच्या होत्या. २०१३मध्ये दीपिकाने तब्बल चार सुपरहिट दिले. ‘रेस टू’ मधील तिचा बोल्ड आणि हॉट लूक, ‘ये जवानी है दिवानी’मधील तिचा लाजरा आणि सालस अभिनय, ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये तिने साकारलेली चुलबुली मीना लोचनी अश्या तिच्या विविधांगी अदा पाहायला मिळाल्या. ‘गोलियों की रासलीला रामलीला’ मधील तिच्या अवताराने तिला ‘फिल्मफेअर- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री‘ पुरस्कार प्रदान केला.

शाहरुख आणि दीपिका म्हणजे सुपरहिट या उक्तीला अनुसरून २०१४ मधला हॅप्पी न्यू इयर सुपरहिट ठरला. २०१५ मधील अमिताभ बच्चन व इरफान खानसोबतचा तिचा कॉमेडी ड्रामा ‘पिकू’ सुपरहिट तर ठरलाच पण आणखी एक ‘फिल्मफेअर- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ‘ पुरस्कार देऊन गेला.

संजय लीला भन्सालींचा ‘ बाजीराव मस्तानी’ दीपिकाच्या कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड ठरला. १४५ कोटी खर्चून बनलेला हा चित्रपट ३५६ कोटी रुपयांचे कलेक्शन करून सुपरहिट झाला. २०१७मध्ये तर दीपिका थेट हॉलिवूडला जाऊन पोहोचले. विन डिझेल सोबत तिने ‘XXX- Return Of Xander Cage’ या इंग्रजी चित्रपटात काम केले. तिथेही तिचे कौतुक झाले.

२०१८ला दीपिका पुन्हा संजय लीला भंसाली यांच्या ‘पद्मावत’मध्ये दिसली. तिने राणी पद्मावतीची भूमिका जीव ओतून केली. विनासंवाद फक्त हावभावांच्या माध्यमातून राणी पद्मावती जेव्हा स्क्रीनवर येते तेव्हा दीपिकाची अभिनयावरील पकड कळते. १९० कोटींचा हा चित्रपट ५०० कोटीपेक्षा जास्त गल्ला जमवून ब्लॉक बस्टर ठरला. याच वर्षी दीपिकाने ‘Ka’ या स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती केली. त्याच्या माध्यमातून तिने ‘छपाक’ आणि ’83’ या दोन चित्रपटांची निर्मिती केली. ‘छपाक’मधील ऍसिड हल्ला झालेल्या मुलीची भूमिका तिने स्वतः साकारली आहे. व्यावसायिकदृष्ट्या हा चित्रपट जरी अयशस्वी ठरला असला तरी त्यातील सामाजिक विषय आणि अंगावर काटे आणणारा दीपिकाचा अभिनय नाकारता येत नाही.

2022 मध्ये ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित करण्यात आलेला दीपिकाचा ‘गहराईंया’ हा चित्रपट त्यातील बोल्ड सीनसाठी वादग्रस्त ठरला. परंतू दीपिकाच्या अभिनयाची छाप ‘गहराईंया’वर आहेच. शाहरुखसोबतचा येण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘पठाण’ हा सिनेमा आता नक्की कोणता रंग दाखवणार हे आपल्याला लवकरच कळेल. मात्र आधीच म्हटल्याप्रमाणे वादग्रस्तता आणि दीपिका पादुकोणचे खूप जुने नाते आहे. तिने अभिनय कर्तृत्वाच्या जोरावर रसिकांची मने केव्हाच जिंकलेली आहेत !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -