घरमनोरंजनसच झुठ हम क्यों सबको बताये ...

सच झुठ हम क्यों सबको बताये …

Subscribe

अमिताभ बच्चन आणि रेखा… भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज आयकॉन! हे दोघे आजही त्यांच्या अभिनय प्रतिभेसाठीच नव्हे तर त्यांच्यातील ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्रीसाठी ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच त्यांच्या कथित प्रेमकहाणीचे किस्से आजही तेवढेच ताजेतवाने आहेत. त्यामुळे चाहत्यांसाठी ते वर्षानुवर्षे चर्चेचा विषय ठरले आहेत.

१९७६ साली रिलिज झालेल्या ‘दो अंजाने’ या चित्रपटानिमित्त रेखा आणि बच्चनसाहेब एकत्र आले. तेंव्हापासून ते अनेक अविस्मरणीय चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर दिसले. त्यांचा रुपेरी पडद्यावरचा एकत्रित वावर रसिकांना एवढा भावला की, दोघांचीही जोडी बॉलिवूडमधली लोकप्रिय जोडी म्हणून प्रसिद्ध झाली.

- Advertisement -

दो अंजाने मधील अमिताभ रेखाच्या उपस्थितीने कथानकात अशी काही खोली निर्माण केली की, ज्याचा कायम लक्षात राहील असा प्रभाव दर्शकांवर पडला. त्यानंतर या दोघांचा ‘गंगा की सौगंध’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’ रिलीज झाला. ‘मुकद्दर का सिकंदर’ मधील अमिताभ- रेखाचं अनामिक नातं, त्यातला भावनिक संघर्ष आणि दोघांच्या अभिनयातली जुगलबंदी मनमोहक होती ! १९७९ मध्ये रिलीज झालेल्या ‘सुहाग’ मध्ये दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमध्ये मैत्री आणि प्रेमाचं मिश्रण होतं. ज्याचा चित्रपटाच्या यशात मोलाचा वाटा होता. याच वर्षी रिलीज झालेल्या ‘मि. नटवरलाल’मध्ये रेखा एका गाण्यात बच्चन साहेबांना कबुली देते…. “परदेसीया ये सच है पिया, सब कहते है तुने मेरा दिल ले लिया … ” आणि उत्तरादाखल बच्चन साहेबही म्हणताहेत… “लोगों को कहने दो, कहतेही रहने दो…सच झूठ हम क्यों सबको बतायें … ” त्यावेळी त्यांच्या रिल लाईफ मधील ही केमिस्ट्री रियल लाईफ प्रेम कहाणीची सुरुवात असेल का?… असो पण त्या वेळचा हलकाफुलका आणि खेळकरपणाचा स्पर्श असलेला मि. नटवरलाल सिनेरसिकांना खूप आवडला. दोघांचा पुढचा ‘राम बलराम’ हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत रेखा -अमिताभ जोडगोळी हमखास यशाचा फॉर्म्युला बनली होती !

पुढे जाऊन विजय, इन्कलाब ,सदा सुहागन ,लाल कप्तान अशा अनेक चित्रपटांतून ही जोडगोळी चमकली. परंतू १९८१ चा त्यांचा “सिलसिला” सर्वात उल्लेखनीय ठरला. ज्यात त्यांच्या वास्तविक जीवनातल्या परिस्थितीचं प्रतिबिंब असलेला एक प्रेमाचा त्रिकोण चित्रित केला होता. हे चित्रण वास्तवाशी एवढं मिळतंजुळतं होतं की, रेखा अमिताभच्या ऑफस्क्रीन रोमान्सबद्दलच्या अफवांना बळ मिळालं. चित्रपटातली ही केमिस्ट्री वास्तविक जीवनात उतरली. त्यांच्या गुपचूप भेटी, चोरलेल्या नजरा आणि अबोल भावनांचे गॉसिप्स दुथडी भरून वाहू लागले. पण हेही तेवढंच खरंय की, माध्यमांना कुठलीच खात्रीशीर माहीती मिळाली नाही. त्यांच्या नात्यातली गूढता कायम राहीली. जसजशी वर्षं उलटली, तसतसे अमिताभ आणि रेखाने त्यांच्या कथित नात्याबाबत मौन बाळगलं. माध्यमांना कायम कुतूहलाच्या अवस्थेत सोडलं.

- Advertisement -

बाॅलिवूचा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन आणि सौंदर्यमूर्ती रेखा पडद्यावर असो किंवा पडद्याबाहेर ते दोघेही, त्यांच्यातील अफाट प्रतिभेमुळे नेहमीच लार्जर दॅन लाईफ होते आणि राहतील. दोघांच्याही एकत्र येण्यामुळे निर्माण झालेली जादू आजही मंत्रमुग्ध करणारी आहे. बच्चन साहेब आणि रेखाजी दोघांनाही आपलं महानगर -My Mahanagr कडून वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !


हेही वाचा :

Amitabh Bachchan Birthday : ‘ही’ आहेत अमिताभ बच्चन यांनी गायलेली सुपरहिट गाणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -