घरमनोरंजन‘एक हसीना थी’ : राघवनची हसीना

‘एक हसीना थी’ : राघवनची हसीना

Subscribe

लेखक-दिग्दर्शक राघवनचे चित्रपट हे कमी अधिक फरकाने निओ-न्वार थ्रिलर या चित्रपट प्रकारात मोडतात. क्लासिक चित्रपट आणि साहित्याचा प्रभाव असलेली, तरीही स्वतःच्या वैशिष्ट्यांमुळे वेगळी ठरणारी शैली हा राघवनच्या चित्रपटांमधील समांतर धागा मानता येईल. अर्थात हे केवळ त्याचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या ‘एक हसीना थी’मुळे नव्हे, तर त्याच्या पुढे जाऊन प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा एकत्रितरित्या विचार करताही ठळकपणे जाणवतं. सदर चित्रपटावरही सिडनी शेल्डनच्या ‘इफ टुमॉरो कम्स’ या क्राईम-थ्रिलर जानमधील कादंबरीचा प्रभाव आहेच. अर्थात गोदार्द म्हणतो त्याप्रमाणे ‘प्रेरणा कुठून मिळाली यापेक्षा तुम्ही तिला (पक्षी : तिचा वापर करून तुमच्या कलाकृतीलाच) कुठवर नेऊन ठेवलं, याला अधिक महत्त्व आहे’. राघवनबाबत तरी तो चित्रपट आणि साहित्य जगताला एकप्रकारची मानवंदना देत, वेळोवेळी उत्तम कलाकृती समोर आणत असल्याने काही म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

सारिका वर्तक (उर्मिला मातोंडकर) ही मुंबईतील एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करते. ती सिंगल आहे, सुंदर आहे आणि मुंबईत एकटी राहते. ती हे सगळे गुणधर्म असलेल्या इतर कुणाही व्यक्तीसारखीच आहे. समोरच्या फ्लॅटमध्ये राहणार्‍या विवाहित व्यक्तीचे आपल्याशी जवळीक साधण्याचे विचित्र प्रयत्न सहन करणारी, आपल्या ‘एकटा जीव सदाशिव’वजा ब्रीद असलेल्या आयुष्यात सुखी असणारी. एके दिवशी तिच्या ऑफिसमध्ये कामानिमित्त आलेला करण राठोड (सैफ अली खान) तिच्याशी फ्लर्ट करतो. मात्र, ती काही सकारात्मक प्रतिसाद देत नाही. नंतरही पुन्हा एकदोन वेळा तिची करणशी भेट होते. पुढे त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. अशातच एके दिवशी तो त्याचा एक मित्र, अभिजीतच्या मुंबईवरून हाँगकाँगला रवाना होण्यापूर्वी काही वेळ तिच्या घरी थांबता येण्याबाबत विचारतो. साहजिकच तिने होकार दिल्यावर घरी आलेला अभिजीत काही कारणाने थोड्या वेळात पुन्हा परत येतो असं सांगून बाहेर जातो. दरम्यान तो परत येण्यापूर्वीच त्याच्या गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधांची आणि पोलिसांच्या कारवाईदरम्यान त्याच्या झालेल्या मृत्यूची बातमी टीव्हीवर झळकते. करण सारिकाला अभिजीतने तिच्या घरी ठेवलेल्या बॅगची विल्हेवाट लावण्याबाबत सांगतो. ती हे करत असतानाच पोलीस तिला पकडतात आणि तिच्या आयुष्याला निराळंच वळण प्राप्त होतं.

सारिकाच्या अटकेनंतरच्या त्याच्या कृती, त्याचा अलिप्तपणा हळूहळू खटकत जातो. अगदी जेलमध्ये तिला मदत करणारी एका गँगची सर्वेसर्वा प्रमिलादेखील (प्रतिमा काझमी) तिला सतर्क असण्याबाबत बजावते. मात्र त्याचा वकील कमलेश माथूर (आदित्य श्रीवास्तव) आणि तो आपल्याला काही होऊ देणार नाहीत यावर तिचा भरवसा असतो. एव्हाना प्रेमाच्या आणाभाका घेणार्‍या करणबाबत तिने किंवा प्रेक्षक म्हणून आपणही संशय घेण्याचं विशेष कारण येत नाही. पण लगेचच काही काळात प्रमिलाचं भाकीत खरं ठरतं आणि गुन्हेगारी जगताशी संबंध असलेला करण सारिकाकडून गुन्हा कबूल करवून घेत तिची फसवणूक करतो. परिणामी सात वर्षांची शिक्षा झालेल्या, आपल्या छोटेखानी ‘सारे काही छान छान’ असणार्‍या विश्वात वावरण्याची सवय असलेल्या सारिकाचा यापुढील प्रवास सोपा नसतो.

- Advertisement -

थरार हा केवळ कार चेसच्या किंवा बंदुकांचा समावेश असलेल्या दृश्यांतून निर्माण अशातला भाग नाही. पुन्हा राघवनच्या चित्रपटांतील थरार हा न्यूनतम पातळीवर घडणार्‍या रहस्यमय किंवा नाट्यमय घटनांतून अधिक येतो. अशावेळी राघवन आपल्याला हव्या त्यावेळी हवी तितकीच माहिती पुरवत जातो, जेणेकरून पुढे जाऊन घडणार्‍या संभाव्य नाट्याचा परिणाम अधिक खोलवर जाणवतो. उदाहरणार्थ, ‘एक हसीना थी’मध्ये चित्रपटाचा सुरुवातीचा एक तृतीयांश भाग साधारण सारिकाच्या दृष्टिकोनातून दिसतो. तिने करणवर विश्वास ठेवणं जितकं स्वाभाविक असतं, तितकंच आपणही काही काळापुरतं का होईना; पण या पात्रांसोबत काहीतरी चांगलं घडतं आहे, हे मानून संभाव्य धोक्याकडे कानाडोळा करणं स्वाभाविक ठरतं. परिणामी पूर्वार्धाच्या शेवटाकडे, सदर पात्राच्या भोवतालात आणि स्वतः त्या पात्रात बदल घडत असतानाचे आणि त्यानंतरचे उत्तरार्धातील क्षण खरे थरारक ठरतात. सारिकाच्या बदल्याचा (आणि तिच्या व्यक्तिमत्त्वातील बदलांचा) संदर्भ देत ‘एक हसीना थी’ म्हणत प्रसिद्ध गीताचे बोल उसने घेत त्यांचं स्वरूप पालटून टाकणं, हाही चित्रपटकर्त्यांच्या चतुराईचा एक उत्तम नमुना मानता येईल.

राघवनच्या चित्रपटांत मग तो हा असो, यानंतरचा ‘जॉनी गद्दार’ (२००७) असो वा अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘अंधाधुन’ (२०१८) असो, त्याच्या चित्रपटांत पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांत एक मूलभूत फरक जाणवतो. तो म्हणजे पात्रांसोबत घडणार्‍या विश्वासार्ह आणि वास्तववादी छटा असलेल्या घटनांचं स्वरूप उत्तरार्धाकडे जाताना बदलत जातं. मग चित्रपटातील वास्तववाद काहीसा बाजूला पडून केऑस सुरू होतो. अर्थात ही काही त्याच्या लेखन-दिग्दर्शनातील उणीव म्हणता येणार नाही. कारण बहुतांशी वेळा हा गोंधळ तो हेतूपुरस्सररित्या घालतो आणि असं करताना त्याचं स्वरूप कायम नियंत्रित प्रकारचं राहील हे पाहतो. जे खरंतर इथल्यापेक्षा ‘अंधाधुन’मध्ये अधिक होतं. इथेही उत्तरार्धात बरीच पात्रं, घटना यांच्यामुळे सुरुवातीचा न्यूनतम दृष्टिकोन बाजूला पडतो. ज्यामुळे सदर घटनाक्रम सुरुवातीला ठरावीक पात्रांवर लक्ष केंद्रित केलेलं असताना होते तितके विश्वासार्ह ठरत राहत नाहीत. असं असलं तरी हा सगळा प्रकार रंजक मात्र नक्कीच असतो. त्यामुळे एकूण चित्राचा विचार करता हमखास रंजक आणि महत्त्वाचं म्हणजे सातत्याने उत्तम ठरणार्‍या त्याच्या चित्रपटांबाबत तक्रार करण्यास जागा उरत नाहीच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -