घरमनोरंजनचित्रपट झाला आता नाटक

चित्रपट झाला आता नाटक

Subscribe

महाराष्ट्रात होणार्‍या एकांकिका किंवा राज्य नाट्यस्पर्धा लक्षात घेतल्या तर सर्जनशील लेखकांची काही कमतरता नाही असेच दिसते. पण तरीही प्रेक्षकांना काय आवडते याकडे नाट्य निर्मात्याचा अधिक कल असतो. जुनी नाटके प्रेक्षकांना आजही आवडतात हे सुनिल बर्वेने आपल्या ‘सुबक’ या संस्थेच्या निमित्ताने पटवून दिलेले आहे. त्याने पुननिर्मिती केलेल्या सर्वच जुन्या नाटकांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. रंग़मंचावर जसा हा बदल जाणवतो तसेच चित्रपटातसृष्टीतही त्याचे थोडेफार अनुकरण झाल्याचे दिसते. कितीतरी गाजलेल्या नाटकांचे चित्रपटात रुपांतर झालेले आहे. ‘नटसम्राट’, ‘खो खो’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘गलगले निघाले’ अशा अनेक नाटकांनी चित्रपटरुप धारण केलेले आहे. पण प्रथम चित्रपट आणि नंतर नाटक असा योग क्वचितच काही चित्रपटांच्या बाबतीत आलेला आहे. ‘निशाणी डावा अंगठा’ ही रमेश इंगळे-उत्रादकर यांची कादंबरी. सरकारी पातळीवर ज्या अनुदान योजना ग्रामीण भागात राबविल्या जातात त्यातील गलथानपणा शिक्षण कार्यपद्धतीला कसा मारक ठरतो, ‘जर-तर’च्या उत्तरांनी शाळांच्या व्यवस्थापनात अडथळा येतोच; पण विद्यार्थी-पालकांना त्याला सामोरे जावे लागते याचे दर्शन घडवणारी ही कादंबरी आहे. त्यावर प्रथम ‘निशाणी डावा अंगठा’ या नावाने चित्रपट आला आणि आता मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टसच्या वतीने विद्यार्थी याच शिर्षकात नाटक करणार आहेत. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी हे या नाटकाचे सादरकर्ते आहेत.

पुरुषोत्तम बेर्डे यांना ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी अधिक भावली. ‘अष्टविनायक’ या नाट्य संस्थेचे निर्माते दिलीप जाधव यांना ती ऐकवली आणि यातून चित्रपट निर्मितीची कल्पना पुढे आली. वेगळी कथा म्हणून या चित्रपटाचे प्रेक्षकांकडून स्वागत झालेच, परंतु अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, विनय आपटे, मोहन आगाशे, निर्मिती सावंत या कलाकारांचा या चित्रपटामध्ये सहभाग असल्यामुळे चित्रपट प्रभावी होण्याला हे कलाकारही कारणीभूत होते. डॉ. मंगेश बनसोड हे या निर्मिती प्रक्रियेत होते. याच विषयावर उत्तम नाटक होऊ शकते याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी दिग्दर्शनाबरोबर लेखन, गीते, प्रकाश योजना, रंगावृत्ती अशीही जबाबदारी स्वीकारली. मध्यंतरी व्यावसायिक रंगमंचावर या नाटकाचे प्रयोग झाले होते. मुंबई विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना धीरगंभीर, प्रबोधन करणारे तेवढेच विनोदी चिमटे घेणारे हे नाटक कलाकार म्हणून अनुभवता यावे यासाठी याच महिन्यात सलग चार प्रयोग करण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे. २० फेब्रुवारीला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे. सांताक्रूझच्या मुक्ताकाश रंगमंचावर सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना या नाटकाचा आनंद विनामूल्य घेता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -