घरफिचर्सडिजिटल पत्रकारिता ‘संधी की आव्हान’?

डिजिटल पत्रकारिता ‘संधी की आव्हान’?

Subscribe

बदलत्या जगानुसार विविध क्षेत्रांतील कामाच्या पद्धतीदेखील बदलत चालल्या आहेत. बातमीचा स्त्रोत आणि माध्यम समजल्या जाणार्‍या पत्रकारिता क्षेत्रातही आमूलाग्र बदल झाले आहेत. पूर्वीची प्रिंट पत्रकारिता आता डिजिटल बनली आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असणार्‍या पिढीला ही डिजिटल पत्रकारिता मोठ्या प्रमाणात आकर्षित करते आहे. याच नव्या माध्यमासंबंधी ‘पत्रकारितेचे बदलते विश्व... डिजिटल मीडिया!’ या विषयावर ‘माय महानगर’च्या फेसबुक लाईव्हमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली. डिजिटल पत्रकारितेत सक्रिय सहभाग असणार्‍या ज्येष्ठ पत्रकार, माध्यमतज्ज्ञ स्मिता देशमुख आणि पराग पाटील यांनी या चर्चा सत्रात प्रिंट पत्रकारिता आणि डिजिटल पत्रकारिता यांमधील नेमका फरक, फायदे-तोटे आणि त्याचा नेमका अर्थ मांडला. त्या मुलाखतीचा हा गोषवारा.

नव्या तंत्रज्ञानात मजकूर कमी आणि व्हीडिओ, फोटोचा वापर जास्त होतो. डिजिटल माध्यमात यासाठी याचे महत्त्व वाढले आहे. वाचक हा तुमचा कन्टेंड वाचूकच तुम्हाला फिडबॅक करेल, लाईक-रिट्विट करेल, अशाच स्वरुपात तुम्हाला कन्टेंड द्यायचा आहे. त्यामुळे डिजिटल पत्रकारितेत असणार्‍यांवर प्रचंड ताण आहे. बातमी लिहिणे हे 50 टक्के काम असले तरी नंतर ती ट्विट करून लोकांना टॅग करणे, फेसबुक लाईव्ह करणे, सर्वाधिक वाचकांपर्यंत ती पोहोचवले हे आव्हान या पत्रकारितेत आहे. तो या तंत्रज्ञानाचा कसा वापर करेल हे ज्याचे त्याचे कसब आहे. परंतु, जो तंत्रज्ञान स्वखुशीने आत्मसात करणार नाही, तो पुढे जाऊ शकणार नाही, हेही तितकेच खरे.

टाईप रायटर टू मोबाईल फोन्स

पूर्वीची पत्रकारिता ही फक्त प्रिंट माध्यमाशी संबंधीत होती. सुरुवातीला प्रिंटकरता बातमी देण्यासाठी पत्रकारांना टाईप रायटरचा वापर करावा लागत होता. नंतर इलेक्ट्रॉनिक टाईप रायटरचा वापर होऊ लागला. पुढे कालांतराने कम्प्युटर्स आणि आता तर मोबाईलमध्येही बातमी टाईप करून पाठवली जाते. आता वाचकही आधुनिकतेकडे वळला आहे. मोठ्या प्रमाणात डिजिटल माध्यमातून बातम्या वाचल्या जात आहेत. आताची पिढी प्रिंट माध्यमातून बातम्या वाचत नाही. तर फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट राहत आहे. त्यांना सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात काय सुरू आहे, याची माहिती आहे. पण ते प्रिंट मीडियातून नव्हे तर डिजिटल मीडियाद्वारे माहिती घेत आहेत. हा बदल इतक्या वर्षांतील पत्रकारितेत झाला आहे. साधारण 25 ते 35 या वयोगटातील लोक डिजिटल मीडियाचा सर्वात जास्त वापर करताना दिसून येतात. फक्त बातम्या वाचणे नव्हे तर आपली मते, आपले विचार सोशल मीडियातून व्यक्त करणारी ही पिढी आहे.

- Advertisement -

ब्लॉग, ब्लॉगर आणि मुक्तलेखन

पत्रकारितेत साधारण दोन प्रकारचे बातमीदार पाहायला मिळतात. एक ज्यांच्याकडे राजकीय, सामाजिक, क्राईम इ. सारखे महत्त्वाची बिट असतात. तर दुसरे जे फिचर रायटर्स असतात. ज्यांचा कल फिचर रायटींगकडे सर्वाधीक असतो. ते पत्रकार ब्लॉगकडे वळताना दिसत आहेत. शिवाय ज्यांना लिखाणाची आवड आहे, पण योग्य माध्यम मिळत नाही, ते ब्लॉगच्या माध्यमातून आपले विचार सोशल मीडियावर आणतात. आताची पिढी थेट ब्लॉगवर लिहू लागली आहे. परंतु त्यासाठीचा त्यांचा अभ्यास कमी पडत आहे. ठराविक एका विषयावर लिहिताना त्याचा संपूर्णपणे अभ्यास होणे आवश्यक आहे. आताच्या मुलांना ब्लॉगच्या माध्यमातून स्वतःच्या नावाने लेख लिहिण्याची संधी मिळते. मात्र अपूर्ण अभ्यासाअभावी ते अनेकदा टीकेला पात्र ठरतात.

‘जनरेशन झी’ नवी संकल्पना

नेक्स्ट जनरेशनपेक्षा आताची पिढी ही जनरेशन झी आहे, असेच म्हणावे लागेल. कारण आताची पिढी ही आधुनिकपेक्षाही कित्येक पाऊल पुढे आहे. सध्या जन्मताच दोन-तीन वर्षातच मुलांच्या हातात मोबाईल येतो. युट्यूबवर गाणी ऐकल्याशिवाय, व्हिडिओ पाहिल्याशिवाय मुले जेवत नाहीत का झोपतही नाहीत. युवकच नव्हे तर विद्यार्थी देखील ब्लॉग लिहू लागले आहेत. ते फक्त लिहितच नाहीत तर आपल म्हणणे संबंधीत व्यक्तीपर्यंत पोहोचवतातही. त्यासाठी टॅगिंगचा वापर करतात. बातमी संदर्भातील विषय असल्यास ते ब्लॉग संपादकांना टॅग करतात. त्यांना आपल्या वेबसाईटकडे आकर्षित करण्यासाठी बातमी ही गोष्टीसारखी लिहायला हवी. ही बातमी संवादपर असावी. त्यामुळे विद्यार्थी त्याच्याशी समरस होऊ त्यात स्वारस्य घेऊ लागतो.

- Advertisement -

योग्य प्रकारचे टॅगिंग

बातमीमध्ये मजकूराचा दर्जा या सोबतच तंत्रज्ञानही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी आधुनिक तंत्र शिकून घेणे आवश्यक आहे. कोणते नवीन फिचर्स आले आहेत. त्यानुसार कन्टेन्ट बदलावा लागतो. वेबसाईटमध्येही व्हीडिओचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. ही व्हीडिओंवर आधारलेली कथा जास्त लोकप्रिय होत आहेत. फक्त पत्रकारच नव्हे तर प्रत्येक माणूस हा सध्या बातमीदार झाला आहे. त्याला मनातील काही तरी व्यक्त करायचे असते, त्यासाठी तो या सोशल मीडियाचा वापर करतो. त्यासाठी खूप मोठा अभ्यास करावा लागतो असेही नाही. आपली माहिती किंवा बातमी ही योग्य व्यक्तीला टॅग केली की ती झपाट्याने व्हायरल होते. त्यामुळे अपेक्षित रिजल्ट मिळतो. टॅगिंग हा योग्य व्यक्तीकडे वेगाने पोहोचण्याचा मार्ग आहे. टॅग कोणाला करावे. किती वेळाने करावे. कशा पद्धतीने करावे याचेही प्रमाण आहे. चुकीच्या पद्धतीने टॅग केले तर बातमीतील अ‍ॅगेंजमेंटवर परिणाम होतो.

वेबसाईटच्या गर्दीत टिकून राहताना

डिजिटलमध्ये तुमच्या हातून चूक झाली तर काही सेकंदात तुम्हाला लोक सांगतात. ट्रोल केले जाते. मात्र प्रिंटमध्ये एखादी बातमी लिहिल्यानंतर किमान 2 ते 3 जणांच्या नजरेखालून ती जाते. त्यामुळ छोट्या छोट्या चुका सुधारल्या जातात. पण डिजिटलमध्ये आजकाल लोकांना इतकी घाई असते की, बातमी देताना चुकीची नावे, चुकीचा फोटो, चुकीचा उल्लेख केला जातो. त्यामुळे लेखक अडचणीत येऊ शकतो. यामध्ये त्याचे पदही जाऊ शकते. शिवाय वेबसाईटची प्रतिमा ढासळते ती वेगळीच. यासाठी जर तुमच्या बातमीत चूक झाली तर लगेच माफी मागा आणि बातमी मागे घ्या. डिजिटलमध्ये ब्रेकिंगच्या मागे धावता. पण तसे न करता बातमी देण्यापूर्वी थोडा वेळ घ्या, पूर्ण माहिती घ्या आणि मगच बातमी द्या. तुमच्या बातमीतील खरेपणाच विश्वासार्हता टिकवून देऊ शकते आणि त्यामुळेच वेबसाईटच्या गर्दीत तुमची वेबसाईट टिकून राहण्यास मदत होऊ शकते.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -