उषा नाडकर्णी आणि विलास उजवणे यांना कलागौरव पुरस्कार जाहीर

'सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा'ने दरवर्षी कलाक्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांना गौरवण्यात येते.

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) आणि डॉ. विलास उजवणे (Dr.Vilas Ujawane) यांना सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार (Kalagaurav award) जाहीर झाला आहे. तर, नाट्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोट्या सावंत यांना ‘कर्मयोगी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा’ने दरवर्षी कलाक्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांना गौरवण्यात येते. याअंतर्गत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत यंदाचा ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कार सोहळा २०२२’ येत्या ७ जून रोजी मुंबईत होणार आहे. या सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh), सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर (Rajendra Yadravakar), अन्न नागरिक पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह राजकारणातील, कलासृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आजवर अनेक दिग्गजांना या संस्थेच्या वतीने गौरवण्यात आले आहे. या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण २६ जून रोजी ‘फक्त मराठी’ वाहिनीवर पाहता येणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी सांगितले.