घरताज्या घडामोडीट्रॅफिकमध्ये सुचली ‘मन फकीरा’ची कहानी

ट्रॅफिकमध्ये सुचली ‘मन फकीरा’ची कहानी

Subscribe

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने स्वत:ला अभिनेत्री म्हणून सिद्ध केल्यानंतर आता ती ‘मन फकीरा’ चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे वळली आहे.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने यापूर्वी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये अभिनय केला आहे. तिच्या अग्निहोत्र, कुंकू या दोन्ही मालिका बऱ्याच गाजल्या, तर नटसम्राट आणि फत्तेशिकस्त अशा चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या. अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध केल्यानंतर आता ती ‘मन फकीरा’ चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे वळली आहे.

- Advertisement -
  • ‘मन फकीरा’ चित्रपटाची कथा तुला कशी सुचली आणि अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध केल्यानंतर तुला दिग्दर्शनात का यावसे वाटले?

मला नेहमीच दिग्दर्शक व्हायचे होते. गेली दहा वर्षे माझ्या मनात ही गोष्ट घोळत होती. कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला असताना मी एक नाटक दिग्दर्शित केले होते. त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे बक्षीस मिळाले होते. तेव्हापासून माझ्या डोक्यात दिग्दर्शनाचे वेड घोळत होते, पण योग्य वेळेची वाट पाहत होते. दिग्दर्शनासाठी एक ठरावीक प्रगल्भता लागते. तुम्ही तुमच्या प्रवासात शिकत जाता. एकेक प्रसंग हाताळताना त्यातून ही प्रगल्भता येते आणि त्यातून तुम्ही दिग्दर्शनासाठी सज्ज होता. मला त्याबाबत आत्मविश्वास आला आणि दिग्दर्शनाचे हे पाऊल टाकले. मन फकीरा या चित्रपटाची कथा मला प्रवास करत असताना सहज अगदी ट्रॅफिकमध्ये सुचली.

- Advertisement -
  • या सिनेमाचा विषय अत्यंत वेगळा आहे याचं विषयावर तुला सिनेमा का करावासा वाटला?

मला नातेसंबंध हा विषय आणि त्यातील गुंता खूपच भावतो. मला माणसे त्यांच्या नजरेतून, त्यांच्या देहबोलीतून पारखता येतात. मानवी नातेसंबंध हे खूप खोलात जाऊन अभ्यास करण्याचा विषय आहे. हे नातेसंबंध नीट आणि सहजपणे मांडता आले तर अधिक रंजक बनतात. हे नातेसंबंध व्यक्त करण्याची संधी या कथेतून साधली आहे. हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असल्याने माझ्यासाठी खूपच जवळचा आहे. बदलत्या मराठी प्रेक्षकवर्गाला आणि त्यातही युवा पिढीला तो खूप भावेल, याची मला पूर्ण खात्री आहे.

  • सिनेमा दिग्दर्शित करणे तुझ्यासाठी किती आव्हानात्मक होते?

अभिनयापेक्षा दिग्दर्शन करणे खूपच आव्हानात्मक आहे. कारण अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातून मार्ग काढावा लागतो. पण मला कठीण गोष्टी करायला आवडतात, त्यामुळे दिग्दर्शन करायला मला आवडते. आपण दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटात मला अभिनय करायचा नव्हता. पण आगामी चित्रपटांमध्ये मी भूमिका नक्की करेन.

  • या चित्रपटासाठी तू कलाकार कसे निवडलेस?

सुव्रत आणि अंकितसोबत मी आधी काम केले आहे. पण सायलीला पहिल्याच रीडिंगमध्ये मी चित्रपटात घ्यायचे ठरवले आणि माहीच्या भूमिकेसाठी अंजली पाटील योग्य होती. अशाप्रकारे कलाकारांची निवड केली. लंडनमध्येही या चित्रपटाचे शुटींग झाले आहे. या सर्व कलाकारांनी या चित्रपटात खूपच चांगले काम केले आहे, हे प्रेक्षकांना चित्रपट बघितल्यावर कळेल.

  • ‘मन फकीरा’ या सिनेमामधून प्रेक्षकांना नेमक काय पाहायला मिळणार आहे?

ही अशा एका जोडीची कथा आहे की त्या जोडीला आपल्या पहिल्याच रात्री आपले पहिले प्रेम मागे सुटले असल्याची जाणीव होते. एका प्रगल्भतेने हे दोघे आपापल्या पहिल्या ‘अफेअर’मधील मागे पडलेल्या जोडीदाराचा शोध घ्यायचे ठरवतात. चार पावले मागे जात ते जुळून न आलेले नाते पुन्हा शिवता येते का, याचा अंदाज घेतात. मात्र तशी शिवण शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर सारासार आणि व्यावहारिक विचार करत आपले वैवाहिक बंध अधिक दृढ करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -