घरताज्या घडामोडीदाऊद आणि ऋषी कपूर..दोन वेळा झाली होती भेट! नक्की काय आहे किस्सा?

दाऊद आणि ऋषी कपूर..दोन वेळा झाली होती भेट! नक्की काय आहे किस्सा?

Subscribe

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं आज सकाळी कर्करोगामुळे मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात निधन झालं. वयाच्या ६८व्या वर्षी त्यांना कर्करोगाने मात दिली. या काळात त्यांनी १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, ऋषी कपूर यांची कारकिर्द काही कारणांमुळे वादग्रस्त देखील ठरली होती. याच आपल्या कारकिर्दीवर अजिबात कोणताही आडपडता न ठेवता ऋषी कपूर यांनी आपली बायोग्राफी ‘खुल्लम खुल्ला’मध्ये खुलासे केले आहेत. त्यातलाच सगळ्यात चर्चेत आलेला खुलासा म्हणजे ऋषी कपूर आणि भारताचा मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची भेट. एकदा नाही, दोनदा!

पहिली भेट…!

ऋषी कपूर आणि दाऊद इब्राहिम यांची पहिली भेट १९८८ साली झाली होती. भारतात तो मोस्ट वाँटेड होण्याच्या खूप आधी. ऋषी कपूर तेव्हा दुबईमध्ये आपल्या एका मित्रासोबत आशा भोसले-आरडी बर्मन नाईट कॉन्सर्टसाठी गेले होते. पण त्यांना विमानतळावरच दाऊद गँग अर्थात डी गँगच्या एका माणसाने पाहिलं. अशी माणसं विमानतळावर व्हीआयपी मंडळींच्या हालचाली टिपण्यासाठी पेरलेली असायची. ऋषी कपूर विमानतळाच्या बाहेर येताच एक माणूस त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला दाऊद साब बात करेंगे! जेव्हा ऋषी कपूर यांनी काहीशी शंका आणि काहीशा भीतीमध्ये फोन घेतला… खुद्द दाऊद इब्राहिमने त्यांना त्याच्या घरी बोलावलं होतं. त्यांच्यापुढे पर्यायच नव्हता.

- Advertisement -

ऋषी कपूर आणि त्यांच्या मित्राला मग एका आलिशान अशा रोल्स रॉईसे कारमध्ये बसवून दुबईमध्ये रस्त्यांवर बराच वेळ गोल गोल फिरवलं गेलं. जेणेकरून त्यांना दाऊदच्या घरापर्यंतचा रस्ता सापडू नये. त्यानंतर जेव्हा ते दाऊदच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांचं स्वागत स्वत: दाऊदने केलं. तो दारू पीत नसल्यामुळे त्यांना चहा आणि बिस्किटं दिली गेली. यानंतर दाऊदने ऋषी कपूर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मुंबई कोर्टात दाऊदने करवलेल्या एका मर्डरचा किस्सा देखील त्याने ऋषी कपूर यांना सांगितला. ऋषी कपूर त्याच्या घरून निघण्यापूर्वी दाऊदने त्यांना सांगितलं, ‘तुम्हाला कधीही काहीही लागलं पैसे किंवा काहीही, बिनधास्त मला सांगा’. पण ऋषी कपूर यांनी त्याला नकार दिला.


हेही वाचा – ऋषी कपूर यांच्या प्रचंड गाजलेल्या व्यक्तीरेखा कोणत्या? वाचा!

दुसरी भेट…!

ऋषी कपूर यांची दाऊदशी दुसरी भेट देखील दुबईमध्येच झाली. पण यावेळी ती पहिल्यासारखी नियोजित नसून अचानक झाली होती. १९८९ साली ऋषी कपूर त्यांच्या पत्नी नितू यांच्यासोबत एका लेबेनीज शॉपमधून बुट खरेदी करत होते. थोड्या वेळाने समोर पाहून त्यांना धक्काच बसला. दाऊद स्वत: त्या दुकानात होता. त्याच्यासोबत त्याचे किमान १० बॉडीगार्ड होते. दाऊदच्या हातात मोबाईल देखील होता. ज्या काळात भारतात मोबाईल आला देखील नव्हता, तेव्हा दुबईत दाऊद मोबाईल वापरत होता!

- Advertisement -

यावेळी देखील दाऊदने ऋषी कपूर यांच्यासाठी त्या दुकानातून काहीतरी खरेदी करून देण्याची तयारी दाखवली. पण याही वेळी ऋषी कपूर यांनी त्याला नकार दिला. कदाचित दाऊदला नकार देणाऱ्या काही मोजक्या मंडळींपैकी ऋषी कपूर एक असावेत! त्या वेळी दाऊदने नंतर ऋषी कपूर यांना त्याचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक दिला. पण त्याबदल्यात ऋषी कपूर यांना मात्र त्यांचा वैयक्तिक क्रमांक देता आला नाही. कारण तेव्हा भारतात मोबाईलच नव्हते!


वाचा – ऋषी कपूर यांचे ‘हे’ ट्वीट ठरलं शेवटचं!

ऋषी कपूर या पुस्तकात म्हणतात, ‘दाऊद माझ्याशी नेहमीच चांगला वागला. पण आमच्या त्या बुटांच्या दुकानातल्या भेटीनंतर सगळंच बदललं. मला माहीत नाही की त्याने माझ्या देशाविरोधात असं सगळं का केलं. त्या भेटीनंतर माझी त्याच्याशी कधीही भेट झाली नाही’.

एक प्रतिक्रिया

  1. ही बातमी ह्या क्षणी आजच द्यायची काहीच गरज न्हवती. आशा मुर्ख बांतमीदाराला चपलीन मारला पाहिजे.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -