घरमनोरंजनतुला शिकवीन चांगलाच धडा

तुला शिकवीन चांगलाच धडा

Subscribe

भारत हा एकमेव देश आहे ज्याला संतांची, साहित्यिकांची फार मोठी परंपरा आहे. अनेक जाती-धर्माचे पंथांचे लोक इथे वास्तव्य करत असल्यामुळे वेगवेगळ्या भाषेत विपुल साहित्य लिहिले गेलेले आहे. या साहित्याचा, कथांचा चित्रपटसृष्टीवर परिणाम झाला आहे असे म्हणण्यापेक्षा त्यावर बरेचसे चित्रपट बेतलेले आहेत. अर्थात शंभर वर्षांपूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे. तरीपण एकीकडे चित्रपट बदलतो आहे याचा आनंद होत आहे तर दुसरीकडे तितकीच खंतही व्यक्त करावीशी वाटत आहे. त्याला कारण म्हणजे एकदा का एखादा चित्रपट प्रेक्षकाला आवडला की बर्‍याचशा निर्मात्यांनी थोडाफार बदल करून तशीच काहीशी कथा सादर करण्याला महत्त्व दिलेले आहे. हा योगायोग म्हणायचा की जुळवून आणलेला प्रयत्न म्हणायचा हे सांगता येणे कठीण आहे. मोठ्या पडद्यावर ‘अहिल्या’, ‘तांडव’ आणि छोट्या पडद्यावर ‘एक होती राजकन्या’ या कलाकृतींच्या निमित्ताने पोलीस सेवेत असलेल्या महिलांच्या कर्तृत्त्वाचा, त्यागाचा, त्यांच्या जिद्दीचा प्रवास उलगडला जाणार आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा असेही त्यांचे यानिमित्ताने सांगणे असणार आहे.

छोट्या पडद्यावर येणार्‍या मालिका लक्षात घेतल्या तर कोठारे कुटुंबीयांनी जवळजवळ सर्वच वाहिन्यांवर निर्माते म्हणून आपली हुकूमत दाखवलेली आहे. शिवाय परीक्षक या नात्याने ते याच पडद्यावर सतत झळकत असतात. मोठ्या पडद्यावर अनमोल कामगिरी केल्यानंतर आता छोटा पडदाही पूर्णपणे व्यापलेला आहे. इतकेच काय तर स्वत:चा असा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यात कोठारे कुटुंबीयांना यश आलेले आहे. जय मल्हार, विठू माऊली या त्यांच्या मालिका महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून अधिक पाहिल्या गेलेल्या आहेत. आदीनाथ कोठारे हा त्यांचा चिरंजीव हे आता महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेगळे सांगायला हवे असे नाही. वडिलांप्रमाणे त्याने बालपणापासून बालकलाकार ते नायकापर्यंत अनेक चित्रपटात काम केलेले आहे आणि आता निर्माता, दिग्दर्शक या नात्यानेही तो प्रेक्षकांच्या समोर आलेला आहे. त्याच्या पाणी या चित्रपटाची नोंद झी गौरवच्या नामांकनात घेतली गेलेली आहे. कोठारे व्हीजनच्यावतीने एक होती राजकन्या ही मालिका आजपासून सोनी या मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. अवनी तशी सामान्य कुटुंबातली. कुटुंबासाठी ती एक राजकन्या आहे. तिच्याविषयीच्या अपेक्षा कुटुंब सदस्यांकडून वाढलेल्या आहेत. अशा स्थितीत वेगळा मार्ग स्वीकारून पोलीस सेवेला नोकरी म्हणून स्वीकारते तेव्हा भविष्याचे काय असाही प्रश्न निर्माण होतो. कारण इथे कर्तव्य महत्त्वाचे असते. स्त्री-पुरुष अशा गोष्टी वेगळ्या न ठेवता वेळीअवेळी कार्यतत्परता दाखवावी लागते. खाकी वर्दीत दिसणारी अवनी कुटुंबासाठी राजकन्या असल्यामुळे आपुलकी, हळवेपणा, दिलासा देणे यातून अवनीचा कठोर प्रवास उलगडताना दिसणार आहे. ही व्यक्तीरेखा किरण ढाणे या युवतीने साकार केली असून, किशोर कदम यांनी तिच्या वडिलांची भूमिका साकार केलेली आहे.

महिलांना समान हक्क दिला पाहिजे, तिच्या कर्तृत्त्वाचा, त्यागाचा गौरव झाला पाहिजे. तिच्यावर होणार्‍या अन्यायाला वाचा दिली गेली पाहिजे असे बोलले जाते, पण भारतातले पुरुषी वर्चस्व आजही कायम आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अन्यायकारक असतानाही दुबळ्या स्त्रीला त्या निमूटपणे कराव्या लागतात. निर्माते, दिग्दर्शक यांनी बर्‍याचवेळा याचेच दर्शन कथेच्या माध्यमातून पडद्यावर घडवलेले आहे. महिला सक्षम आहे, सामर्थ्यशील आहे याचे दर्शन फारसे घडवले गेलेले नाही. सुभाष काकडे या निर्मात्याने संतोष जाधव याला दिग्दर्शक म्हणून हाताशी घेऊन तांडव नावाच्या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. स्त्री ही महत्त्वाकांक्षी, जिद्दी आहे हे दाखवण्यासाठी निर्मात्याला पुन्हा पोलीस कार्यपद्धतीचा आधार घ्यावा लागलेला आहे. चित्रपटाची कथा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्‍यावर आधारलेली आहे. ही पोलीस अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रभावीत झालेली आहे. महाराजांचे शासन प्रजेसाठी होतेच परंतु प्रजेतल्या महिलांना दिलासा देणारे होते. आपली कार्यपद्धत समाजासाठी असली तरी महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे सांगणारी ही पोलीस अधिकारी असणार आहे. पूजा रायबागी ही अभिनेत्री ही मुख्य भूमिका निभावणार आहे. याशिवाय अरुण नलावडे, नील राजुरीकर, आशिष वारंग, स्मीता डोंगरे, प्रिया गावकर, सयाजी शिंदे यांचाही यात कलाकार म्हणून सहभाग आहे. निर्मात्याने थोड्या अनोख्या पद्धतीने या चित्रपटाचे प्रमोशन केलेले आहे. चित्रपटातील पोलीस अधिकारी पूजाला प्रत्यक्ष जीवनातल्या महिला पोलीस अधिकार्‍यांचा सन्मान करण्यासाठी पोलीस स्टेशनला नेले होते.

- Advertisement -

एक होती राजकन्या या मालिकेच्या निमित्ताने किरण ढाणे ही अभिनेत्री महारास्ट्रातेल घराघरात पोहोचणार आहे पूजा रायबागी हिला तांडवच्या निमित्ताने प्रत्यक्षातील महिला पोलीस अधिकार्‍याशी सुसंवाद साधता आला तर तिसरी अहिल्या चित्रपटाच्या निमिताने पोलीस अधिकारी झालेली प्रितमकागणे हिला जर्मनीमध्ये झालेल्या जागतिक चित्रपट महोत्सवात झळकण्याची संधी प्राप्त झालेली आहे. अहिल्या या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन राजू पार्सेकर याने केलेले आहे. यापूर्वी त्याने पुरुष पोलीस आणि त्यांचे अधिकारी यांच्या समस्या, कर्तव्याबरोबर उद्भवणारे ताण-तणाव, राजकीय नेत्यांचा दबाव याचे दर्शन घडवले होते. अहिल्यामध्ये हवालदार ते पोलीस कमिशनर असा महिला पोलीस अधिकार्‍याचा जो प्रवास दाखवलेला आहे तो साकार करण्याची जबाबदारी प्रितम कागणे या अभिनेत्रीवर सोपवलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट काही दिवसात प्रदर्शित करायचा होता. याचा प्रेक्षकवर्ग हा पोलीस आणि त्यांचे कुटुंबियच आहेत म्हंटल्यानंतर येणार्‍या निवडणुकांमुळे आणि पुढे आचारसंहिता लागणार असल्यामुळे हा चित्रपट लांबणीवर टाकलेला आहे. मुलीने स्वप्न बाळगले तर ती यशस्वी होऊ शकते हे सांगणारा हा चित्रपट आहे.

अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे यांच्यावर सर्वाधिक कोणत्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असेल तर तो आहे पोलीस अधिकारी याचा. त्यांच्या बर्‍याचशा चित्रपटांमध्ये ते हमखास पोलीस अधिकारी राहिलेले आहेत. ही भूमिका प्रभावी होण्याच्या दृष्टीनेही पोलीस कार्यपद्धतीचा त्यांनी अभ्यासही केलेला आहे. स्टार प्रवाहने जेव्हा स्पेशल फाईव्ह या मालिकेची निर्मिती केली तेव्हा प्रमोशनासाठी महेश कोठारेंनाच वेगळ्या पद्धतीने आणले होते. योगायोग म्हणजे सोनी मराठी वाहिनीवर अशाच कर्तव्यदक्ष युवतीची संघर्षमय कहाणी एक होती राजकन्याच्या निमित्ताने साकार झालेली आहे. त्याच्या निर्मिती प्रक्रियेत त्यांचाही मोठा वाटा आहे. या मालिकेच्याही प्रमोशनाला ते आवर्जून उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -