घरमनोरंजनठाकरे’ सिक्वल येतच राहणार

ठाकरे’ सिक्वल येतच राहणार

Subscribe

मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयघोष ते असताना, ते नसताना आजही होताना दिसतो. त्यांनी व्यक्त केलेल्या मतांचे अनुकरण फक्त शिवसैनिकांकडूनच होताना दिसत नव्हते तर दिल्लीच्या राज्यकर्त्यांनाही त्याची नोंद घ्यावी लागत होती. वादळी, परखड, मराठी स्वाभिमानी व्यक्तीमत्त्व म्हणून भारतात त्यांचा दरारा होता. त्यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटाची घोषणा झाली आणि त्याचे ट्रेलर लॉन्च होईपर्यंत जनमाणसात त्याची चर्चा राहिली. राजकीय नेते, शिवसैनिक, चित्रपट शौकिन, भारतीय नागरिक यांच्या कुतूहलाचा विषय असलेला हा चित्रपट २५ जानेवारीला हिंदी, मराठी अशा दोन भाषांत प्रदर्शित होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्याचे ट्रेलर लाँचिंग झाले. निर्माते, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तीरेखा साकारणारा नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री अमृता राव, वायकॉम १८ स्टुडिओचे सीओओ अजित अंधारे, कार्निव्हल मोशन पिक्चरचे अध्यक्ष श्रीकांत भसी, कलर्स् मराठीचे बिझनेस हेड निखिल साने, दिग्दर्शक अभिजित पानसे यावेळी उपस्थित होते.

पत्रकार, व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकीर्दीला प्रारंभ झाला. पुढे संघटनात्मक कार्य करुन शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाच्या न्याय, हक्कासाठी मराठी माणसाने एकत्र यायला हवे हा पक्षाच्या कार्याचा मुख्य हेतु ठेवला. जे काही बोलायचे ते स्पष्ट, परखड या त्यांच्या समाजजागृतीला शिवसैनिक, महाराष्ट्रातला नागरिक जोडला गेला. त्यांच्या विधानाने भारतात अनेक स्थित्यंतरे झाली. आंदोलने, मोर्चे त्यातून उद्भवलेले परिणाम यातून शिवसेनेची ताकद वाढली आणि ठाकरे नावाचे स्वत:चे असे प्रस्त निर्माण झाले. हा कालखंड या चित्रपटात घेतलेला आहे. यापूर्वी चित्रपटाचे निर्माते राऊत यांनी ‘बाळकडू’ या चित्रपटाच्या माध्यमातून एका कार्यकर्त्याच्या विचारातून बाळासाहेब ठाकरे यांचे समग्र दर्शन घडवले होते. ‘ठाकरे’ या चित्रपटात साक्षात ठाकरे यांची व्यक्तीरेखा पहायला मिळणार आहे आणि ती नवाजुद्दीन सिद्दीकी याने साकार केलेली आहे.

- Advertisement -

चित्रपटासाठी दीडशेहुन अधिक संघर्षमय प्रसंगांची निवड केली होती. त्यातील साठच प्रसंगांवर हा चित्रपट आधारलेला आहे. त्यामुळे भविष्यात ठाकरे चित्रपटाचे आणखीन काही भाग येणार असल्याचे ट्रेलर लाँचिंगच्या सोहळ्यात जाहीर केले गेले. ठाकरे हे असे व्यक्तीमत्त्व आहे की त्यांनी जे लिहिले, चित्रातून व्यक्त केले, जाहीर भाषणातून आपली मते मांडली त्यात काटछाट करण्याची हिंमत कोणी दाखवली नाही. त्यामुळे प्रदर्शित होणार्या चित्रपटाच्या बाबतीत सेन्सॉरकडून काही आडकाठी होईल असे वाटत नाही. चित्रपटाच्या यशाविषयी शंका करण्याचे काहीच कारण नाही. ठाकरे चित्रपट प्रदर्शित होणार आहे त्याच तारखेला काही बहुचर्चित चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत. त्याचा आमच्या चित्रपटावर फारसा परिणाम होणार नाही. प्रेक्षक हा चित्रपट पाहतीलच परंतु शिवसैनिकसुद्धा हा चित्रपट यशस्वी करून दाखवतील असे मत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

 नवाजुद्दीन सिद्दीकी
बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तीमत्त्व साकार करायला मिळावे हे कुठल्याही कलाकाराचे स्वप्न असू शकते. ही संधी माझ्या वाट्याला आलेली आहे. चित्रपटाची घोषणा झाली त्यावेळी कलाकार म्हणून मीही यात सहभागी होतो. कलाकार हा भूमिकेशी प्रामाणिक असतो पण या चित्रपटाच्या सोहळ्याला शिवसैनिकांकडून ठाकरे यांच्या नावाने ज्या घोषणा होत होत्या, त्या घोषणांनी माझी जबाबदारी वाढवली. दिग्दर्शकावर अवलंबून न राहता ठाकरे हे काय आहेत हे मी पुस्तकातून, उपलब्ध असलेल्या व्हीडिओमधून जाणून घेतले. बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी यांच्या चित्रिकरणाच्या प्रसंगाला उद्धव ठाकरे कुटुंबासह आले होते. त्यांनी माझ्याकडे ज्या पद्धतीने पाहिले त्यात त्यांच्या वडिलांविषयीची त्यांची श्रद्धा दिसत होती. मोहवून टाकणारा तो क्षण होता.

- Advertisement -

अभिजित पानसे
मी ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शन करावे हे मला अनपेक्षीतपणे सांगण्यात आले. तो माझ्यासाठी सुखद धक्का होता. विद्यार्थीदशेपासून मी बाळासाहेब ठाकरे यांच्या सान्निध्यात होतो. त्यांच्याविषयी बरेच काही सांगू शकेल अशा अनेक गोष्टी माझ्या संग्रही आहेत. पण त्यांच्यावर चित्रपट करायचा आहे म्हंटल्यानंतर माझी जबाबदारी मी स्वत:हुन वाढवून घेतली होती. संदर्भ, त्यांची भाषणे पुन्हा मी नजरेखालून घातली. चित्रपट निर्मितीत बर्याच जणांचा सहभाग असला तरी दिग्दर्शक या नात्याने काय करायचे हे मी पूर्णपणे ठरवले होते. मराठी, हिंदी अशा दोन भाषांत हा चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होत आहे याचा मला आनंद होत आहे.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -