गाजलेलं ‘मुंगडा’ गाणं नव्या अंदाजात, पाहा झलक

'कॉमेडी', 'अॅक्शन' आणि दिग्गज कलाकारांचा अभिनय अशी पूरेपूर मेजवानी 'टोटल धमाल' चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे.

Sonakshi Sinha's Mungda from Total Dhamaal

एकेकाळी तुफान गाजलेलं ‘मुंगडा’ हे गाणं आता एका नव्या रुपात आणि नव्या ढंगात आपल्यासमोर आलं आहे. दिग्गज नृत्यांगना हेलन यांनी अजरामर केलेल्या या ‘मुंगडा’ गाण्यावर आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा थिरकताना दिसत आहे. अजय देवगणच्या ‘टोटल धमाल‘ या आगामी चित्रपटात ‘मुंगडा’ गाण्याचं रिक्रिएशन करण्यात आलं आहे. या गाण्यात सोनाक्षीने दिलखेचक ठुमके लगावले आहेत. मुंगडा गाण्याचं हे नवीन व्हर्जन सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यातील सोनाक्षीच्या लूकचं आणि तिच्या डान्सचं फॅन्सकडून भरभरुन कौतुक होत आहे. या गाण्यात सोनाक्षी सिन्हासोबत चित्रपटाचा मुख्य नायक अजय देवगणही डान्स करणार असल्याची चर्चा होती. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अजय देवगणची झलक दिसत नाही. दरम्यान, युट्यूबवर अपलोड झालेला व्हिडिओ ही गाण्याची केवळ एक झलक असून, संपूर्ण गाणं रिलीज झाल्यावर त्यामध्ये अजय देवगण दिसेल अशी चर्चा रंगते आहे.

सोनाक्षी सिन्हाच्या या नव्या ‘मुंगडा’ गाण्याचं दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केलं आहे. तर, गायिका ज्योती आणि गायक शान यांनी हे गाणं गायलं आहे. दरम्यान, ‘टोटल धमाल‘ हा चित्रपट येत्या २२ फेब्रुवारीला रिलीज होणार असून चित्रपटात अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दिक्षीत, जावेद जाफरी, रितेश देशमुख, अर्शद वारसी, महेश मांजरेकर, संजय मिश्रा आणि पीतोबाश या कलाकारांची टोटल धमाल पाहायला मिळणार आहे.

सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन याची एक छोटीशी झलक शेअर केली होती. त्यावेळी फॅन्सनी याला जबरदस्त पसंती दिली होती. अभिनेत्री हेलन यांनी डान्स केलेलं हे मूळ गाणं त्याकाळी खूपच गाजलं होतं. त्यामुळे सोनाक्षीच्या या नव्या ‘मुंगडा’ गाण्याकडून लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. दरम्यान, सोनाक्षी त्यांच्या अपेक्षेवर यशस्वीपणे खरी उतरल्याचं गाणं पाहिल्यावर जाणवत आहे.

‘कॉमेडी’, ‘अॅक्शन’ आणि दिग्गज कलाकारांचा अभिनय अशी पूरेपूर मेजवानी ‘टोटल धमाल’ चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. ‘चित्रपटातील पात्रांची ५० कोटी रुपयांसाठी चाललेली धडपड आणि त्यादरम्यान होणारी त्यांची फजिती’ अशी चित्रपटाची गमतीशीर गोष्ट आहे.