मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत रंगला विद्यार्थ्यांचा ‘व्हर्च्युअल तमाशा’ फड

Virtual Tamasha fad at Mumbai University Folk Art Academy
Virtual Tamasha fad at Mumbai University Folk Art Academy

करोनाच्या पार्श्वभूमीवर सारं काही ठप्प झालं आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा निर्बंधांच्या चौकटीत अडकले. पण यातूनही मार्ग काढत व्हर्च्युअल माध्यमातून शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं यशस्वी आयोजन झालं. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या विद्यार्थ्यांचा ‘व्हर्च्युअल तमाशा’चा फड रंगलाय.

महाराष्ट्राला कलेचा खूप मोठा वारसा लाभला असून ‘तमाशा’ हा लोककलाप्रकार त्यापैकीच एक. अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा लोककला प्रकार म्हणजे तमाशा. लॉकडाउनच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आल्यामुळे गावोगावी जंत्रांमधून रंगणारे तमाशाचे फड सुद्धा रंगले नाहीत. परंतु, व्हर्च्युअल माध्यमांची निवड करत अनेकांनी लोककला जोपासण्याचा प्रयत्न केला.

विविध लोककलांचं जिथं शास्त्रशुद्ध पद्धतीनं शिक्षण दिलं जातं, त्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या शैक्षणिक वर्ष २०२० – २१च्या विद्यार्थ्यांनी व्हर्च्युअल पद्धतीनं ‘तमाशा’सारखा समूह पध्दतीचा लोकनाट्याविष्कार व्हर्च्युअल माध्यमातून यशस्वीपणे सादर केलाय. पारंपारिकतेची किनार सांभाळत त्याला धक्का न लागता त्यांनी हा व्हर्च्युअल तमाशाचा खेळ रंगवलाय. सध्याच्या पिढीचा कल हा काही अंशी पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळत असताना पारंपारिकता जपत उत्तम अभिनय, नृत्य आणि पूर्वीच्याच पारंपारिक चाली असलेल्या गीतांचा समावेश करून जगदीश कन्नम, आशुतोष रामटेके, तेजश्री गवळी, सोनाली म्हरसाळे, पंकज पाडाळे, सुरज खरटमल, डॉ. दादाराव म्हस्के या विद्यार्थ्यांनी हा व्हर्च्युअल तमाशा उभा केल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय.

के सुरज कलाविष्कारचा सर्वेसर्वा व या विभागाचा विद्यार्थी सुरज खरटमल याची मूळ संकल्पना असून त्यानेच दिग्दर्शन, संकलन, संगीत संयोजन व मिश्रण करण्याची जबाबदारी पार पाडलीय. ‘या नाचत रंगानी गणूबा हो’ हा पठ्ठेबापूरावांचा गण तर ‘पाण्याचा ग माठ बाई ह्यानं छेडीला’ हि तक्रारीची गौळण तर ‘सोड जाऊदे मला मथुरेला’ हि विनवनीची गौळण तसंच कृष्णाची ओळख करून देणारा ‘तिन्ही ताळांचा गं कैवारी’ हा कटाव आणि शेवटी ‘आई म्हणते पोरं पणा तुझा गेला नाही बाई अजून’ या पारंपारिक लावणीचा समावेश व्हर्च्युअल तमाशात केला आहे.

विशेष म्हणजे तमाशात असलेलं नाट्य स्वरूप आणि त्यातील कृष्ण-पेंद्या, मावशी, गौळणी आणि बाबुराव-बारीकराव ह्या पात्रांचे संवाद देखील या काळात सहसा ऐकायला, पाहायला मिळणार नाहीत इतके जुने आहेत. लॉकडाउनच्या काळात मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे अशा महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये राहणाऱ्या या विद्यार्थ्यांनी घरबसल्या मोबाईलवर संपूर्ण चित्रीकरण आणि ध्वनीमुद्रण केलंय. बहारदार असा हा व्हर्च्युअल तमाशा तुम्हाला ‘Lokkala Academy’ या यूट्यूब चॅनलवर पाहता येईल.

थोरामोठ्यांकडून म्हंटलं जातं कि आजची पिढी पाश्चात्य कलेकडे वळतेय. परंतु मला आपल्या लोककलांनी आकर्षित केलं. मग मी लोककलेचा सखोल अभ्यास करू लागलो. महाराष्ट्राच्या लोककलांच जतन, संवर्धन व्हावं असा निश्चय केला आणि ‘व्हर्च्युअल तमाशाच्या’ रूपाने मी माझं पहिलं पाऊल टाकलं. यापुढे लोककलेप्रति भरपूर काम करायची इच्छा आहे.


हेही वाचा – ‘ही’ अभिनेत्री आहे ह्रता दुर्गुळेची होणारी सासू