Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स आपलेच पाय चालतात... एका अज्ञात संकटाची वाट...

आपलेच पाय चालतात… एका अज्ञात संकटाची वाट…

करोनाच्या भीतीमुळे सारी दिव्य पार पाडून वेगवेगळ्या शहरांमधील काहीजण गावी पोहोचलेत, पण तिथं त्यांच्यापुढं वेगळंच काहीतरी वाढून ठेवलं होतं. ज्यांच्यासाठी त्यांनी अनेक हालअपेष्टा सहन करून पैसे पाठवले होते, त्यांना बहुधा या महामारीमुळं त्या सार्‍याचाच विसर पडला होता. त्यांना जिवाची भीतीही वाटत असेल कदाचित किंवा गावातील लोकांचा दबावही असेल, काय कोण जाणे, पण त्यांना यायलाच मज्जाव केला. हेच काय फळ मम तपाला, असा विचार त्यांच्या मनात आला असणार, पण करणार काय. याचं उत्तरच नव्हतं. कानावर फक्त येत होतं, तुम्ही येऊ नका. आता त्यांनी जायचं कुठं?

Related Story

- Advertisement -

पूर्वी सहज म्हणत ः तसं सारं चांगलं आहे इथं, तरीही मातीची ओढ लागलीय. ही माती म्हणजे काळी (किंवा पांढरी, वा तांबडी) माती. काळी आय, असं सहज लोक बोलून जात. ही अंतरीचीच ओढ. कारण तसं पाहिलं तर सारं काही ठीकठाक असताना यांना असं का वाटतं, असा प्रश्न पडायचा. अन् एकदम कुणीतरी म्हणायचं, इथं सारं चांगलं आहे खरं, पण एकच इच्छा आहे, हाडं पडावीत ती मात्र गावाकडं. कदाचित जिथं जीवन सुरू झालं तिथंच त्याची सांगता व्हावी, असंही त्यांना वाटत असावं. हे आठवलं रोजच्या रोज येणार्‍या, गावाकडं निघालेल्या वेगवेगळ्या राज्यांतील श्रमिकांच्या बातम्यांनी. पूर्वी लोक तृप्तीनं गावाकडं जात, तसं हे जाणं नाही. हे जात नाहीयेत. त्यांना जावं लागतंय! जगण्यासाठी. पोटाच्या काळजीबरोबरच गावच्या ओढीनं. परक्या प्रदेशात कुणाचा आधार नसताना, सारं परमेश्वरावर सोपवून राहण्यापेक्षा, निदान आपल्या माणसांत जाऊन पडावं, या तीव्र इच्छेनं.

सर्व जगालाच आपल्या सावटानं ग्रासून टाकणार्‍या करोनानं त्यांच्यावर ही वेळ आलीय, नव्हे आणली आणली गेलीय!
सुरुवातीला सवार्र्प्रमाणेच त्यांनाही वाटत होतं की, ठीक आहे, राहू आठ पंधरा दिवस. तशी भूक मारून जगायची सवय आहेच की. शिवाय बरोबर गाववालेही आहेत. काहींची तर कुटुंबंही होती. इवल्याशा जागेत. त्यांनीही काही काळ कळ काढली. जमावबंदीचा, इतरांपासून शक्यतोवर दूर राहण्याचा, मास्क लावण्याचे बंधन घालणारा पहिला पंधरवडा संंपला. नंतर दुसरा पार पडला आणि आता तिसरा पंधरवडाही कसाबसा सरला… मग मात्र त्यांचा धीर सुटला…
तसं पाहिलं, तर त्यांच्यासाठी म्हणून, त्यांना धीर यावा, जगणं सोपं व्हावं म्हणून, सरकारकडून जाहीर तर बरंच काही होत होतं. पण फक्त जाहीरच होत होतं. पण प्रत्यक्षात पदरात मात्र काहीच पडत नव्हतं. कारण सरकारनं तुम्हाला मिळेल म्हटलं खरं … पण ते मिळवण्यासाठी अनेक अटी, नियम काय अन काय! अन् त्या नोकरशाहीच्या चक्रव्यूहामध्येच ते अडकून पडत होते. (की त्यासाठीच हा व्यूह होता?) बाहेर पडण्याची वाटच नव्हती दिसत. तरीदेखील अंधूकशी आशा होती. कारण कधी कुणी, काही मदत देत होते. कधी अन्न, कधी निवारा, कधी शिधा, क्वचित थोडेफार पैसेही! … पण त्यानंच त्यांना जगायला आधार मिळत होता, पण कितीही म्हटंलं तरी देणारे दयाळू लोक, स्वंयसेवी संस्था म्हणजे काही सर्वशक्तिमान सरकार नाही. त्यांनाही मर्यादा होत्या. इच्छा असली तरी आता देता येत राहाणं शक्य नव्हतं. म्हणायचं देणार्‍याचे हात हजार. पण इथं मात्र उलट परिस्थिती होती. इथं घेणार्‍यांच्याच हजारो झोळ्या होत्या आणि देणार्‍यांचे हातच रिक्त झाले होते. कुणाचाच त्याला इलाज नव्हता. तरी हे सारं आपल्याच वाट्याला का यावं, असं त्यांना वाटायला लागलं होतं.

- Advertisement -

तसं पाहिलं तर कशी का असेनात, वर्षानुवर्ष इथं या वेगळ्या मुलुखात, काढल्यावर आता हे सारं काही सोडून जायचं त्यांच्याही जिवावर आलं होतं. कारण त्यांना जगायला आधार देत देतच आणि त्यांचे श्रम घेत घेतच शहर वाढत गेलं होतं. त्यांच्यामुळंच. त्यांना शहराचा राग नव्हता. तिथं जे मिळत होतं, त्यात सुख होतं किंवा मिळत होतं तेच सुख, असं ते मानत होते. कारण घरच्यांना पैसे पाठवले की त्यांचे दुवे मिळत आणि जबाबदारी पार पाडल्याचं यांना समाधान. कधीमधी गेलं तर गावात मानही मिळत होता. यापेक्षा सुख म्हणजे तरी काय, अशी त्यांची वृत्ती होती.

पण आता वेळ अशी आली की, आता शहरामध्ये काहीच न राहिल्यानं, पैसे पाठवणाराच गावात परत आला तर प्रथम महामारीची भीती आणि मग समजा तो इथंच राहिला तर तिथल्यांचं (आणि परतलेल्यांचंही) कसं व्हायचं… कारण या आलेल्यांसाठी तिथं करायला काही नाही, म्हणजे ज्या कामांत ते वाकबगार होते, ती कामं त्यांच्या छोट्याशा गावामध्ये त्यांना कशी मिळणार. तिथं ना कारखाने ना छोटे उद्योग आणि सुतार म्हणून, इस्त्रीवाला म्हणून काम करायचं, तर इथं तसलं काम होतंच कुठं? शेतजमीन किती जणांना पुरी पडणार? म्हणून तर त्यांनी शहरांची वाट धरली नव्हती का आणि तीच परिस्थिती एवढ्या वर्षांनंतरही कायम असल्याचं ते दरवेळी तिकडे गेल्यावर बघत नव्हते का? पण असा विचार करण्याएवढंही कुणी थार्‍यावर नव्हतं. केवळ आपल्या लोकांची ओढ, आपल्या मातीची ओढ त्यांना इथं राहू देत नव्हती. आता काही मिळवण्यासाठी पर्याय म्हटलं तर रोजगार हमी योजनेचा, पण आता तसे श्रम मुळात करवतील का आणि केले तर झेपतील का? शिवाय तिथंही दलालांना तोंड द्यावे लागणार का? मग हाती काय पडणार? असे अनेक प्रश्नत्यांना सतावत होते.

- Advertisement -

तिकडं शहरातही आता परिस्थितीनं अशी गत केली म्हणून किती काळ रडत बसायचं, काहीतरी करायलाच हवं. अशी प्रवृत्ती वाढत होती. सरकारलाही त्याची दखल घ्यावी लागली होती. हळूहळू उद्योगधंदे सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले, पण नवीच अडचण निर्माण झाली. आता दारं उघडली, पण काम करायला आहेच कोण? एवढे अपार कष्ट सोसून ते कसलीही वाट न बघता निघून गेले, नव्हे, त्यांना जावंच लागलं. आता परत यायला त्यांच्यातले किती तयार होतील, हा प्रश्नच होता, शिवाय यायचं म्हटलं तरी पुन्हा जातानाचे हाल आठवून ते गडबडूनच जात असणार. अशी अजब अवस्था. काम नाही म्हणून करणारे परत गेले, आणि आता काम आहे, तर करणार कोण?

काहीजण म्हणतात ही स्थानिकांना संधी आहे, वरवर पाहता हे बरोबरच आहे, पण ते विचार करत नाहीत की याआधी त्यांच्यातल्या किती जणांनी अशी कौशल्य आत्मसात केली होती. आहेत? ते केवळ यांच्या नावानं बोटं मांडत होते, जमेल तितकं आंदोलनाच्या नावाखाली नासधुशीचंच काम करत होते. काही निर्माण करण्याऐवजी खळ्ऽऽ खटॅकला गौरवणारे त्यांचे नायकही त्यातलेच. जसे नेते तसे त्यांचे हे चेले. काम करून श्रम करून पैसे मिळावा असं त्यांना सांगितलं होतं कधी कुणी? परप्रांतीयांचा द्वेष करायलाच त्यांना शिकवत होते, (पण स्वतःची कामं तेच स्वस्तात करतात म्हणून त्यांनाच काम देत होते.) नाही म्हणायला कधीतरी त्यांना वडापावच्या गाड्यांसाठी परवाने मिळाले होते म्हणे, पण त्यांच्यापैकी कितीजण गाडीवर दिसले वा दिसतात? त्या भाड्यावर देऊन वसुलीचे काम मात्र चोख करतात.

त्यामुळंच असेल, विविध उत्सवांची, महोत्सवांची इ. वर्गणी या गोंडस नावानं सक्त वसुली करणंच त्यांना माहीत. वर्गणी ही ऐच्छिक असते हे त्यांच्या कानावरूनही कधी गेलेलं नसतं. उलट कुणी नाही म्हटलं तर बघून घेऊ, याचे परिणाम चांगले होणार नाहीत, इथं राहायचंय ना, तुमची वाहनं नीट राहायला हवीत ना, असे अगदी ‘प्रेमळ’ प्रश्न विचारले जातात आणि छोटे उद्योग व्यवसाय करणारे (हे बहुसंख्येनं परप्रांतीयच!) तर त्यांची हुकमी गिर्‍हाइकंच!

मोठमोठ्या कामांची कंत्राटं देऊन काम करून घेणारे, भले चांगले असतीलही, पण ती कामं करून घेणारे कंत्राटदार वेगळे होते. जळवांसारखे, श्रमिकांचं रक्त शोषणारे, जळवांप्रमाणे ऊत्यांना दूर करणंही मुश्कील कारण त्यांचे लागेबांधे वरपर्यंत. अर्थात त्यांना फक्त स्वतःचंच भलं दिसत असायचं. श्रम करणार्‍यांना फक्त या जळवांच्या तालावर, अटींवरच सारं काही करायला लागायचं. सांगितलेला पैसा कधीच पुरता हाती पडला नव्हता, पण सांगणार कुणाला. समजा सांगितलं तर काम जाण्याची भीती. मन मारून काम करत राहायचं एवढंच ते करत होते. (डोळ्यापुढं फक्त गावाला पैसे पाठवायचे हेच. घरच्यांचा आधार कमी व्हायला नको म्हणून.) आणि आता ही दैन्यावस्था त्यांच्यावर आणणार्‍यांनी आता हातच झटकून टाकले होते. आपली काही जबाबदारी आहे, हे त्यांनी सपशेल नाकारलंच होतं. त्यांना कुणीच काही बोलत नव्हतं. मदत वगैरे तर फार दूरची गोष्ट!

म्हणूनच मूकपणं त्यांनी जणू काही एकमताने निर्णय घेतला होता.
आता इथं राहायचंच नाही.
चला निघा… गावाकडं.

निघायचं खरं, पण जायला साधनं कुठं होती? ती तर सारी बंदच. जी काही होती ती सामानाची ने आण करणारी. (तसा त्या वाहनांमधून लपून छपून जाण्याचा प्रयतनही होत होताच.) सार्वजनिक वाहतूक तर पूर्णपणे बंद. पर्याय एकच होता. तोच त्यांनी पत्करला. चालतच जायचं! हा खरं तर अखेरचाच पर्याय होता त्यांच्यासाठी. अनेकांची अखेर या प्रवासातच होणार याचीही जाण त्यांना नव्हती असं म्हणता येत नाही, पण तरीही त्यांनी हा निर्णय घेतला, नुसता घेतला नाही, तर सरळ सारं चंबुगबाळं आवरून, कुटुंबकबिला घेऊन ते निघाले, पण तरीही कुणालाच त्याचं काही वाटलं नाही. त्यांच्या या जाण्याची दखलच ज्यांनी घ्यायला पाहिजे होती, त्यांनी कुणी घेतलीच नाही. निदान त्यांच्या हालांच्या मृत्यूंच्या काही दिवस तरी…
ते मात्र जात होते. आपापले. स्वतंत्रपणे. आता कुणी कुणाचे नाही, हे त्यांना उमगलं होतं म्हणून? की रस्त्यात होणारी अडवणूक टाळण्यासाठी? कुणी आडवाटेचा तर काहींनी रेल्वेमार्गच धरला. नाहीतरी गाड्या बंदच आहेत, मग कसली भीती. मालगाड्या सुरू आहेत, हे त्यांच्या कानावर गेलंच नसणार किंवा आल्या तर बाजूला कळेलच, असंही त्यांना वाटलं असेल, पण माणसाच्या सहनशक्तीलाही मर्यादा असतात. ते चालू लागले. एका अज्ञात संकटाची वाट. चालून चालून माणूस केव्हातरी थकतो. मग पोटात असो नसो. झोप येतेच. तशी रुळांवरून जाणार्‍या एका जथ्याला आली आणि तिथंच त्यांनी डोकं टेकलं. त्यांना काय स्वप्न पडत असतील, कोण जाणे. कारण ती सांगण्याआधीच त्यांच्या झोपेचं चिरनिद्रेत रूपांतर झालं होतं. त्यांना काहीही कळू न देता त्या सोळा जणांवर मृत्यूनं घाला घातला होता.

नंतर मात्र एकदम सर्वांनीच त्यांची दखल घेतली. मोठा हादराच बसल्यागत झालं. त्या अभागी जीवांप्रमाणं इतर हजारोही अशाच अडचणींना तोंड देत जात आहेत, हे सर्वत्र पसरलं. सारे खडबडून जागे झाले. ताबडतोब व्यवस्था झाली नाही, तरी निदान त्या दृष्टीनं थोडीफार हालचाल सुरू झाली. जबाबदारी कोणाची यावरून वादविवाद होऊ लागले, पण यांच्या मदतीलाही काही धावून आले, त्यांच्या पोटाची व्यवस्था केली गेली आणि मग हळूहळू अनेक गोष्टी उजेडात आल्या. कित्येकांनी भलतीच वाट पकडून ते भलतीकडेच जात होते हे कळलं. एरवी रेल्वे, बसनंच आल्यागेल्यानं त्यांना वाटा कुठं माहीत होत्या? त्यातून अनेकांना वाचताही येत नसणार. अनेकांचा अतिश्रमांमुळे मृत्यू झाला. कित्येकजण वेगवेगळ्या अपघातांत सापडून गारद झालेे. तर अनेकांचा उपासमारीनेच अंत झाला.

अशी सारी दिव्यं पार पाडून काही जण गावी पोहोचलेही. पण तिथं त्यांच्यापुढं वेगळंच काहीतरी वाढून ठेवलं होतं. ज्यांच्यासाठी त्यांनी अनेक हालअपेष्टा सहन करून पैसे पाठवले होते, त्यांना बहुधा या महामारीमुळं त्या सार्‍याचाच विसर पडला होता. त्यांना जिवाची भीतीही वाटत असेल कदाचित किंवा गावातील लोकांचा दबावही असेल, काय कोण जाणे, पण त्यांना यायलाच मज्जाव केला. हेच काय फळ मम तपाला, असा विचार त्यांच्या मनात आला असणार, पण करणार काय. याचं उत्तरच नव्हतं. कानावर फक्त येत होतं, तुम्ही येऊ नका. आता त्यांनी जायचं कुठं? पुन्हा आले तिथं? त्यातले किती पुन्हा तिथं पोहोचतील? किती जणांना आधीसारखं काम मिळेल? कारण कित्येक उद्योग बंद पडत असल्याचं बोललं जातंय, कित्येकजण कामगार कमी करताहेत. मग यांचे काय होणार …

एकच प्रश्न आहे …
या सार्‍याला, जे असंख्य जीव गेले, अगणितांचे हाल झाले, उपासमार झाली त्याला जबाबदार कोण?

जे मरण पावले ते काही त्यांच्या इच्छेनं नाही, तर ते त्यांच्यावर लादलं गेलं होतं. कुणी? या प्रश्नाचं उत्तर अवघड आहे. त्यांच्या जिवावर जे गडगंज झाले ते, त्यांनी निर्माण केलेल्या व सेवांचा फायदा जे घेत आहेत ते? लाखो रुपयांची स्वप्नं दाखवल्यामुळे, देशप्रेमाला आवाहन केल्यानं पहिल्यांदा आणि नोटाबंदीनंतरच्या हालअपेष्टा, मृत्यू, बंद झालेले व्यवसाय, उद्योग, त्यामुळे निर्माण झालेली बेकारी विसरून (हुरळलेली शेळी लांडग्यामागे गेल्याप्रमाणे ज्यांच्यामागून जाऊन) त्यांनी दाखवलेल्या नव्या स्वप्नांना पुन्हा फशी पडून ज्यांनी त्यांनी सत्ता दिली आणि जे त्यानंतर यांना विसरले ते? केवळ आत्मगौरवाकरता कोट्यवधी लोकांच्या भवितव्याचा विचार न करता केवळ चार तासांची मुदत देऊन सारं काही थिजवून टाकणारे,
की, आपण केलं ते किती चांगलं होतं हे लोकांवर बिंबवण्यासाठी टाळ्या, थाळ्या, (आधी अंधार करून) दिवे ओवाळण्यास सांगणारे?
की, लोकप्रियतेसाठी आणि कोट्यवधी रुपये खर्च करून हॉस्पिटलांवर पुष्यवृष्टी करणारे, (हॉस्पिटलांच्या आसपास सायलेन्स झोन असतो याची पत्रास न ठेवता) हॉस्पिटलांच्याच दारात खास सेनादलाचंच बँड वादन आयोजित करणारे, आणि वर स्वतःला देशभक्त म्हणवून घेणारे?
की, प्रत्यक्ष काहीच विधायक कृती न करता केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे? की डोळे झाकल्यासारखं हे सारं केवळ बघत राहून साक्षीदाराचीच भूमिका बजावणारे आपण सर्वच?… हे सारं पाहिल्यावर दुरितांचे तिमिर जावो, या नाटकतातलं, बाळ कोल्हटकर यांचं नाट्यगीत आठवतं
हवास तोवर तुला जवळतिल,
गरज संपता दूर लोटतिल,
ओळखून ही रीत जगाची,
रहा जवळ लांबून जरा…
… करोनाला हटवण्यासाठी दूर रहा हाच तर संदेश नाहीय का?

- Advertisement -