घरफिचर्सलालफितीचे बळी

लालफितीचे बळी

Subscribe

वर्तमानात ‘शेतकरी आत्महत्या’ हा नित्याचाच शब्द. ‘रोज मरे त्याला कोण रडे’, अगदी हे ओठावर येणारे वाक्य, हेच ना! म्हणून निर्विकारपणे अशी बातमी दाखवली, ऐकली, पाहिली, छापली जाते. यात आता काही विशेष ब्रेकिंग बातमीची ‘व्हॅल्यू’ उरली नाही, असा समूह मनाचा सूर. एकूणच दिवसेंदिवस ‘कुरुप’ होत जाणार्‍या या सामाजिक वास्तवाकडे पाहण्याची समाजाचीच संवेदना जिथे ‘मेली’ तिथे शासन, प्रशासनातील माणसं वेगळी कशी असतील!

साधारणतः चार दशकांहून अधिकचा काळ लोटला. काठोकाठ भरून दुरून वाहणारा ‘पाट’ आणि सागरासारखं विशाल ‘धरण’ उशाशी घेऊन आमची पिढी मोठी झाली, तर एक मातीत खपली. शेताच्या माथ्यावर उभे राहून पायाच्या टाचा उचलून जरासे पाहिले तर अनेक हंगामात फेसाळणारे सुख डोळ्यांना स्पष्ट दिसते. कधी तर ते बांधापर्यंत येईल या अतीव ओढीने वाट पाहत भूईचे तारुण्य करपले पण ‘भोग’ संपले नाहीत. पुन्हा या तीन दशकाने पडझडीचा, निसर्गाने अवकृपेचा ‘काळ’ दाखवला म्हणून असंख्य माणसांनी या दुष्काळी भूभागात ‘दोरखंड’ आपलेसे केले. भेगाड पडले जमिनीला की ‘पाय’ आपोआप भेगडात जातात. तशी माणसं एका मागोमाग एक भेगाडात चालती झाली. परंतु पांढर्‍या गिधाडांच्या टोळ्यांना अन् सुटबुटधारी बकासुरांच्या बुडाला लागली नाही ‘आग’. त्यांच्यासाठी तो केवळ असतो एक ‘सामान्य’ प्रश्न लालफितीतला..!

- Advertisement -

वर्तमानात ‘शेतकरी आत्महत्या’ हा नित्याचाच शब्द. ‘रोज मरे त्याला कोण रडे’, अगदी हे ओठावर येणारे वाक्य, हेच ना! म्हणून निर्विकारपणे अशी बातमी दाखवली, ऐकली, पाहिली, छापली जाते. यात आता काही विशेष ब्रेकिंग बातमीची ‘व्हॅल्यू’ उरली नाही, असा समूह मनाचा सूर. एकूणच दिवसेंदिवस ‘कुरुप’ होत जाणार्‍या या सामाजिक वास्तवाकडे पाहण्याची समाजाचीच संवेदना जिथे ‘मेली’ तिथे शासन, प्रशासनातील माणसं वेगळी कशी असतील! सामान्य कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर हतबल होऊन स्वतःला उद्ध्वस्त करीत आयुष्य संपवत निघाला आणि आम्ही आकड्यांच्या खेळात पटाईत झालो. ‘मूलभूत’ आणि ‘शाश्वत’ असे आम्हाला काही करायचे आहे असे कुठेही दिसत नाही. आम्हाला फक्त आकडा वाढला की नोंदवत राहायचा सरकारी दप्तरात. म्हणजे आमचे इतिकर्तव्य संपते….!

तर गोष्ट अशी आहे की गेल्यावर्षी कपाशीवर बोंडअळी पडली म्हणून हातातोंडाशी आलेलं पीक गेले. बचत गटाचे घेतलेले कर्जाचे हप्ते फेडायचे कसे या विवंचनेपोटी एका महिला शेतकर्‍याने आत्महत्या केली. नंतर याच परिसरात बापावर लग्नाचा बोजा नको म्हणून एका मुलीने आत्महत्या केली. या दोन आत्महत्या स्रियांच्या होत्या. हे आणखी भयानक. शेतकरी ‘स्त्री’ गंभीर आहे, सहनशील आहे. वगैरे या दांभिक विचारवंतांच्या कल्पना इथे खोट्या ठरू लागल्या. ‘जगण्याचे दोर कापले गेले की स्त्री असो पुरुष तो टोकाचे पाऊल उचलतो. हे यातले सत्य. पण पुढे काय? तर वर्तमानपत्रात बातमी येते, उद्या त्याची रद्दी होते. दप्तरात दोन आकड्यांची वाढ. या पलिकडे सरकारी पातळीवर या मृत्यूचे ‘मूल्य’ काय हो! निगरगट्ट राजकीय व्यवस्था आणि सुस्त प्रशासन या जोखड्याने घेतलेले असे अनेक ‘बळी’ उघड्या डोळ्यांनी आपण फक्त पाहत बसायचे. बाकी तसे आपल्या हातात उरते काय?

- Advertisement -

१९७६ च्या आसपास आमच्या परिसरातील सर्वात मोठे मातीचे धरण तत्कालीन पंतप्रधानांच्या हस्ते देशाला अर्पण करण्यात आले. या घटनेला चार दशकांहून अधिकचा काळ लोटला. या धरणाची उभारणी सुरू झाली. त्याचा लाभ क्षेत्रात येणार्‍या हजारो शेतकर्‍यांना होणार म्हणून समाधानाचे भरते आले. खरं तर या धरणासाठी सुपीक जमीन मोजून काही माणसं विस्थापितांचे दुःख काळजात घेऊन रस्ता मिळेल तशी विखुरली. धरणाच्या आजुबाजूच्या परिसरातील माणसं आपल्या हक्काचे पाणी आपल्याच परिसरातील गावा-गावात नवी ‘वहिवाट’ घेऊन येईल, म्हणून फुलारुन आली. मात्र चार दशकांहून अधिकचा काळ लोटला तरी धरणाच्या ईशान्य बाजूच्या पायथ्याशी वस्तीला असलेला सत्तर टक्के समूह तहानलेलाच राहिला. ‘धरण उशाला कोरड घशाला’ ही म्हण जर कोणी जाणत्या माणसाने प्रसवली असेल तर तो याच परिसरातील असला पाहिजे, अशी माझी खात्री आहे. विस्तीर्ण, महाकाय जलाशयाच्या ईशान्य दिशेला असलेला या भूभागाला वाकुल्या दाखवत पोटात पाणी घेऊन वाहणारे ‘पाट’सरळ जेव्हा एका रेषेत पूर्वेला निघून जातात तेव्हा माणसं आपल्या आयुष्याची दिशा बदलली म्हणून फक्त नशिबाला दोष देतात.

उशाला धरण असताना टँकरसाठी तहानलेली गावं जगाच्या पाठीवर कुठे पहायची असतील तर या भागात दुष्काळी पर्यटनाला मोठा वाव आहे. गेल्या साडेतीन दशकाहून अधिक काळ हा दुष्काळी भाग सिंचन व पिण्यास हक्काचे पाणी मिळावे म्हणून संघर्ष करतो आहे. परंतु लालफितीत अडकलेल्या शेतकर्‍यांच्या डोळ्यातले हे स्वप्न सत्यात उतरत नाही. निवडणुकीचा हंगाम आला की मंत्री, संत्री येतात. योजनेच्या घोषणा देतात. कार्यभाग साधला की परागंदा होतात. पदरात काही पडत नाही. वीस वीस वर्षे कागदावरची योजना प्रत्यक्षात येत नाही. आलीच तर तिला निधीअभावी ‘मारली’जाते. उरली सुरली नेते, अधिकारी, गुत्तेदारांच्या घरात ती ‘पाणी’वाहते. सामान्य माणसांच्या डोळ्यातल्या स्वप्नांची ‘होळी’ करणार्‍या या ‘औलादी’ याच मातीत पोसल्या गेल्यात हे विशेष. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर या परिसरातील शेतीसाठी एक उपसा सिंचन योजना मंजूर झाली. अल्पावधीत कामाने गती घेतली. परंतु शासन बदलले तशी योजना गाळात रुतली. वर्षाकाठी थोडा फार निधी देऊन फक्त योजना जिवंत ठेवली जाते. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कंत्राटदारांच्या साटेलोट्याने योजना लुटली जाते. वर्षानुवर्षे योजना सडली की तोट्यात जाते. तोट्यात गेली की झालेली कामे मातीत जातात. योजना पूर्ण होण्याचे स्वप्न पाहणार्‍या डोळ्यातल्या स्वप्नांची माती होते. गंमत अशी की गेली नऊ वर्षे एका योजनेसाठी भूसंपादन केल्यानंतरही शेतकर्‍यांच्या जमिनीचे ‘भाव’ ठरविण्यासाठी सरकारी अधिकार्‍यांना वेळ मिळत नाही. हे विश्वास न बसणारे सत्य. हे उदाहरण येथे प्रातिनिधिक समजायला काय हरकत, पण सत्य आहे.

मुद्दा इथे हजारोंच्या संख्येने राज्यात आत्महत्या होत असतानाही आमचे शासन व प्रशासन शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर किती गंभीर आहे याचा हा नमुना. आपल्या भागात येत्या काळात धरणाचे पाणी येईल आणि आपली तहान भागेल हे ‘ओले’ स्वप्नं डोळ्यात घेऊन तीस चाळीस गावाच्या पट्ट्यात गेल्या चार वर्षांत तीस-चाळीस शेतकर्‍यांनी स्वतःला उद्ध्वस्त करून घेतले. हे ‘बळी’ कोणी घेतले? हे सांगायला कोणाची गरज नाही. आज मरणारा शेतकरी कोरडवाहू, अल्पभूधारक आणि जास्तीत जास्त कापूस उत्पादक आहे. त्याच्या शेतीला पाणी नाही, पिकाला भाव नाही, उत्पादन खर्चात झालेली भरमसाठ वाढ आणि दुसरीकडे अस्मानी सुलतानीचे संकट यात आमचा सामान्य कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर भरडला जातोय. त्याच्यासाठी फक्त चहुबाजूने ना ना वल्गना तितक्या ऐकू येतात. प्रत्यक्षात ‘लालफितीत’ अडकून त्याचा ‘बळी’ घेण्यापलिकडे काहीही घडत नाही हे सत्य..!

डॉ.गणेश मोहिते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -