घरफिचर्सशुक्रतारा!

शुक्रतारा!

Subscribe

अरूण दातेंच्या एका कार्यक्रमानंतर तो जेव्हा त्यांना भेटायला आला तेव्हा अरूण दातेंना खरंच धक्का बसला. कारण ’आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा’ हे शब्द आवडणार्‍या त्या गृहस्थाच्या हातात एक लाल-पांढरी काठी होती, त्याच्या डोळ्यांवर गॉगल होता...आणि हो, तो अरूण दातेंना पाहू शकत नव्हता, तो आंधळा होता. !

शुक्रतारा , मंद वारा, चांदणे पाण्यातुनी, चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद ह्या गाण्यातुनी, आज तू डोळ्यांत माझ्या, मिसळुनी डोळे पहा, तू अशी जवळी रहा.मंगेश पाडगावकरांचे त्या शांत जीवनातले ते तसेच शांतशीतल शब्द. नदीच्या संथ प्रवाहावर अणकुचिदार दगड भिरकावल्यावर त्यावर जसे अलगद तरंग उठावेत, तसं श्रीनिवास खळेंचं हळवं संगीत आणि अरूण दातेंच्या आवाजातली ती कुजबुजती मिठ्ठास, त्याचबरोबर सुधा मल्होत्रांची तिला लाभलेली तितकीच तरल साथ…हा सगळा एकमेकांना पूरक असा चौकोनी योग जुळून येऊन ’शुक्रतारा’ हे गाणं तयार झालं.

पन्नासपेक्षा जास्त वय आहे ह्या गाण्याचं, पण आजही हे गाणं ऐकताना वयात येतानाच्या गोडगुलाबी आठवणी मनात पुन्हा गोळा होतात. रेडिओच्या जमान्यात तर ह्या गाण्याची केवढीतरी क्रेझ होती! त्या एका काळात ’बघण्याच्या’ कार्यक्रमात मुलामुलींना हे गाणं गाण्याची म्हणे फर्माइश केली जायची!

- Advertisement -

..तर असं हे गाणं जेव्हा लोकप्रिय झालं तेव्हा ह्या गाण्यासोबत गायक अरूण दाते हे नावही कमालीचं लोकप्रिय झालं. अरुण दातेंच्या जेव्हा मैफली होऊ लागल्या तेव्हा हे गाणं गायल्याशिवाय, त्याला वन्समोअर दिल्याशिवाय लोक अरूण दातेंना जाऊ देत नसत.

ह्याच दरम्यान अरूण दातेंना एक फोन यायचा, फोनवरून तो पलिकडचा गृहस्थ म्हणायचा, ‘दातेसाहेब, मला हे तुमचं गाणं आवडतंच, पण ह्या गाण्यातली एक ओळ माझ्या मनाला जास्त भावते.‘ अरूण दाते विचारायचे, ‘कोणती ओळ?‘ तो म्हणायचा, ‘आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा,‘ ही ती ओळ! अरूण दातेंचे जिथे कुठे मैफली व्हायच्या तिथे तिथे हा गृहस्थ जायचा. मैफलीच्या शेवटी अरूण दाते ‘शुक्रतारा‘ गायचे, तो ते कान देऊन ऐकायचा आणि दुसर्‍या दिवशी फोन करून अरूण दातेंना म्हणायचा, ‘काल मी तुमच्या कार्यक्रमाला आलो होतो, तुमचं ’शुक्रतारा’ ऐकलं, पण त्यातली ती ओळ मला जास्त आवडली- ‘आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा!‘

- Advertisement -

अरूण दाते नेहमी त्याला म्हणायचे, ‘अहो, नेहमी तुम्ही माझ्या कार्यक्रमांना येता, दुसर्‍या दिवशी नियमितपणे मला फोन करता, माझं गाणं आवडल्याचं सांगता, पण मला येऊन भेटत का नाही? आता माझ्या कार्यक्रमाला याल तेव्हा मला कसंही करून भेटाच!‘ अरूण दातेंनी त्याला भेटण्याची चक्क गळच घातल्यामुळे त्याचाही नाईलाज झाला. अखेर अरूण दातेंच्या एका कार्यक्रमानंतर तो जेव्हा त्यांना भेटायला आला तेव्हा अरूण दातेंना खरंच धक्का बसला. कारण ’आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा’ हे शब्द आवडणार्‍या त्या गृहस्थाच्या हातात एक लाल-पांढरी काठी होती, त्याच्या डोळ्यांवर गॉगल होता…आणि हो, तो अरूण दातेंना पाहू शकत नव्हता, तो आंधळा होता. !

’शक्रतारा’ ह्या एकाच गाण्याबाबत असे बरेच किस्से सांगता येतील!…’शक्रतारा’ हे मूळ गाणं अरूण दातेंसोबत सुधा मल्होत्रांनी गायलेलं असलं तरी त्यानंतर हे गाणं अनुराधा पौडवाल ते रंजना जोगळेकरपर्यंत लहानथोर शेकडो गायिकांनी गायलं. मुळात इतक्या गायिकांना ते गाणं अरूण दातेंसोबत गावंसं वाटलं ही एक ह्या गाण्याची खासियत आहे. मूळ गायिका सुधा मल्होत्रा ह्या खरंतर पंजाबी, त्यांचं मराठीशी तसं काही नातं नव्हतं. पण तरीही त्या काळच्या रिहर्सल्सच्या जमान्यात त्यांनी त्या गाण्याचे मराठीचे शब्दोच्चार नीट घोकून घेतले आणि हे गाणं पेश केलं.

ह्याच गाण्यामुळे अरूण दातेंचं नाव बदललं. त्यांचं खरं नाव अरविंद होतं. पण रेकॉडिंगच्या वेळी हे गाणं ते गाऊन निघून गेले. पण रेडिओवर त्यांचं नाव काय घोषित करायचं, असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा अरूण दातेंचे वडील त्यांना त्या दरम्यान सतत अरू, अरू म्हणत होते म्हणून तिथल्या मंडळींनी त्यांचं नाव अरूण असणार, असं गृहित धरलं आणि त्यांचं नाव अरूण दाते असं देऊन टाकलं. तेव्हापासून त्यांचं अरविंद हे नाव मागे पडलं आणि ते अखंड महाराष्ट्राचे अरूण दाते म्हणूनच समोर आले.

मराठी मनाला भुरळ पाडणारी अरूण दातेंनी कित्येक गाणी त्यानंतर गायली, तरी ’शुक्रतारा’ आणि अरूण दाते हे एक अद्वैत होतं..म्हणूनच की काय अरूण दाते करत असलेल्या कायक्रमाचं नाव होतं – शुक्रतारा!

-सुशील सुर्वे

(लेखक संगितविषयाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -