घरफिचर्समुंबई शहर हाच बाजार

मुंबई शहर हाच बाजार

Subscribe

कधीकाळी हे बाजार मुंबईकरांची गरज म्हणून निर्माण झाले; पण आज तेच बाजार या शहरांची ओळख झालेली आहेत. बाजारात विकल्या जाणार्‍या वस्तूंपेक्षा त्यातून निर्माण होणारा पैसा हे सर्वस्व होत असताना बाजाराची ओळख पैशाची खाण अशी होत आहे. मात्र कधी काळी हेच बाजार मुंबईच्या सामाजिक, राजकीय जीवन, आंदोलनाचे केंद्रबिंदू होते. इंग्रजांच्याविरोधात उभे ठाकलेले स्वातंत्रसैनिक, क्रांतीकारकांना याच बाजारातील व्यापार्‍यांनी आर्थिक मदत केल्याची नोंद आहे.

मुंबई शहर हे स्वप्नांचे शहर मानले जाते. देशाची आर्थिक राजधानी असलेले या शहराने अनेकांना स्वप्ने विकली. काहींची ती पूर्ण झाली तर काही जणांचे आयुष्य या स्वप्नांच्या मागे संपले. पण मुंबई आजही तशीच आहे. हे शहर अस्तित्वात असेपर्यंत ते तसेच राहील. येथे विकणार्‍या स्वप्नांसाठी अनेकजण आपले घरदार सोडून येतात. फुटपाथवर, झोपडीपट्टीत राहतात. मुंबईचा रागलोभ करतात; पण हे शहर सोडून जात नाही. कारण हे शहर म्हणजेच एक बाजार आहे. येथे विक्रेता कधी गिर्‍हाईक असतो तर गिर्‍हाईक हा कधी विक्रेता असतो.

अनेकवेळा आपण कधी गिर्‍हाईक बनलो हे विक्रेत्याला कळत नाहीतर तसेच गिर्‍हाईकही आपल्या भूमिकेतून दुसर्‍या भूमिकेत कधी शिरतो हे त्याला उमजत नाही. या बाजारात प्रत्येकजण आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ते वाढवण्यासाठी झटत असतो. अनेकवेळा या बाजारात नितीमत्ता, मानवी मुल्ये विकली जातात. तर काहीवेळी या मुल्यांना घट्ट पकडून माणुसकी आपले दर्शन घडवत असते. मुंबईची ओळख तिच्या पोटात सामावलेल्या लहान मोठ्या बाजारपेठेतून निर्माण झाली आहे. कधीकाळी हे बाजार मुंबईकरांची गरज म्हणून निर्माण झाले; पण आज तेच बाजार या शहरांची ओळख झालेली आहे. बाजारात विकल्या जाणार्‍या वस्तूंपेक्षा त्यातून निर्माण होणारा पैसा हे सर्वस्व होत असताना बाजाराची ओळख पैशाची खाण अशी होत आहे.

- Advertisement -

मात्र कधी काळी हेच बाजार मुंबईच्या सामाजिक, राजकीय जीवन, आंदोलनाचे केंद्रबिंदू होते. इंग्रजांविरोधात उभे ठाकलेले स्वातंत्र्यसैनिक, क्रांतीकारकांना याच बाजारातील व्यापार्‍यांनी आर्थिक मदत केल्याची नोंद आहे. इतकंच काय या बाजारातून विकल्या जाणार्‍या भाजीपाला, वस्तूंच्या गोण्यांनी स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारकांना संदेश पोहचवण्याचे अमूल्य काम केले आहे. बाजारपेठा गरज म्हणून इंग्रजांनी बांधल्या. व्यापार करणारे व्यापारी हे भारतीय असले तरी त्यांनी आपले इमान विकले नव्हते. त्यांनाही इंग्रजांच्या जुलमी सत्तेची चीड होती. संताप होता. त्यामुळेच त्यांनी त्यांना जमले तशी क्रांतीकारकांना मदत केली.

मात्र हे जरी खरे असले तरी याच बाजारपेठेतील काही व्यापारी इंग्रजांच्या खबर्‍यांचेही काम करत होते. क्रॉफर्ड मार्केटमधील काही व्यापारी हे लोकमान्य टिळकांच्या राजकीय हालचालींची बित्तंबातमी इंग्रजांना द्यायचे, याची नोंद आहे. पण अशा व्यापार्‍यांचे प्रमाण फारच कमी होते. विशेषत: कामगार विभागातील बाजारपेठेतील व्यापारी हे नेहमीच स्वातंत्र्य सैनिकांच्या बाजूने राहिले आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढ्याचे गुप्त केंद्र मुंबईतील भायखळा मार्केट होते.

- Advertisement -

येथे काम करणारे मजूर, व्यापारी यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गुप्त आणि जाहीरपणे सहभाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि मुंबई महाराष्ट्रात राहण्यास या मजूर आणि व्यापार्‍यांचा मोठा सहभाग होता. मुंबईचा इतिहास या लोकांनी बदलला. मुंबईत स्वप्न घेऊन येणारे याच बाजारात मोठे झाले. कधी रस्त्यावर व्यापार केला तर कधी रेल्वे स्थानकाबाहेर. पण मेहनत करणार्‍यांना मुंबई कधीच विन्मुख होऊ देत नाही. तसेच ज्यांनी मेहनत केली, स्वत:ला सिद्ध केले तो या शहरात नावारुपाला आला. मुंबई आता कात टाकत असताना या शहरात अनेक गोष्टी बदलत आहेत. काही बाजार आज काळाच्या ओघात नामशेष झाले आहेत. तर काही बाजारांनी काळासोबत आपल्यातही आमूलाग्र बदल केले आहेत.

जे काळाच्या ओघात नष्ट झाले त्यांच्याबद्दल प्रत्येक मुंबईकराला हळहळ आहे. मोठ मोठाले मॉल शहरात स्थापन झाले असले तरी रस्त्यावरील काही बाजार आजही या मॉलपेक्षा जास्त गर्दी खेचत आहेत. विशेषत: चोर बाजारासारख्या बाजारांमध्ये केवळ गरीबच नाहीतर शहरातील अनेक श्रीमंत व्यक्ती हमखास हजेरी लावतात. पुन्हा ज्यांना मॉल परवडत नाहीत त्यांना हे रस्त्यावरचे बाजारच एकमेव आधार आहेत. जोपर्यंत गिर्‍हाईक आहेत तोपर्यंत बाजारांचे अस्तित्व कायम राहणार आहे. मात्र त्यात शहराच्या विकासासोबतच काही बदल नक्कीच होतील.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -