घरफिचर्सबोल बोलता गाणं...

बोल बोलता गाणं…

Subscribe

आनंद बक्षींनी लक्ष्मीकांत-प्यारेलालचं आव्हान मजेमजेत स्वीकारलं..आणि क्षणार्धात ते म्हणाले, ‘हम तुम एक कमरे में बंद हो, और चाबी खो जाय.’ हे शब्द उच्चारताच ते तिघंही हसू लागले आणि त्यांचा हा हास्यकल्लोळ सुरू असतानाच राज कपूरनी त्या रूमचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडला जाताच आनंद बक्षी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलालचा तो हास्यकल्लोळ एका क्षणात बंद झाला. पण तरीही राज कपूरच्या कानावर तो हास्यकल्लोळ गेलाच होता आणि आनंद बक्षी काहीतरी म्हणाल्याचं त्यांच्या तिखट कानावर पडलं होतं.

राज कपूरचा ‘मेरा नाम जोकर’ तिकिट बारीवर आदळला होता. वास्तविक ‘मेरा नाम जोकर’बद्दल राज कपूरचं वेगळं स्वप्न होतं. राज कपूर त्या कथेच्या अतिशय प्रेमात होते. पण लोकांनी मात्र काही त्या कथेबद्दल इतकं प्रेम दाखवलं नव्हतं. राज कपूरचे त्या सिनेमाबद्दलचे आडाखे साफ चुकले होते. तसं सहसा त्यांचे आडाखे चुकत नसत, पण ‘मेरा नाम जोकर’च्या वेळी मात्र लोकांचं मन वाचण्यात राज कपूर कमी पडले होते. खरं तर त्या सिनेमाचं बजेटही मोठं होतं. आपला हा सिनेमा लोकांना खूपच आवडेल ह्या अंदाजाने त्यांनी ह्या घोड्यावर जरा जादा पैसे लावले होते. पण घोडा लंगडा निघाला, त्यामुळे पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने आपल्या पुढच्या सिनेमासाठी फार मोठं बजेट ठेवू नये असं त्यांच्या मनाने घेतलं होतं.

पुढे ‘बॉबी’ करायचं त्यांच्या डोक्यात घोळू लागलं. ‘बॉबी’ हातात घेईपर्यंत झालं होतं असं की राज कपूरसोबतच्या काही मंडळींनी ह्या जगाचा निरोप घेतला होता. ज्यांच्यावर संगीताचं काम सोपवलं की कायम कानामनाला सुखावणारंच संगीत निर्माण होणार ते राज कपूरचे लाडके शंकर-जयकिशन राहिले नव्हते, राज कपूरनी नुसतंच म्हटलं की ताकभात ओळखणारे त्यांचे जानी दोस्त गीतकार शैलेन्द्र राहिले नव्हते. एकूण काय तर राज कपूर म्हटलं की त्यांच्या टीमचा जो भक्कम बुरूज होता त्याला आता काळाचे आघात सहन करावे लागले होते आणि आता नवी माणसं धुडाळून आपलं काम करण्यावाचून त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

- Advertisement -

अशाच काळात ‘बॉबी’ करायचं त्यांनी पक्कं केलं. त्या सिनेमातून त्यांना आपला मुलगा ऋषी कपूरला पेश करायचं होतं. त्यासाठी नेहमीसारखाच सर्वांगाने सुंदर सिनेमा लोकांसमोर यावा ह्यासाठी त्यांनी मेहनत घ्यायला सुरूवात केली होती. ‘बॉबी’साठी संगीताची जबाबदारी त्यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलालकडे सोपवली होती.

‘बॉबी’साठी लक्ष्मीकांत-प्यारेलालकडे संगीताची जबाबदारी सोपवल्यावर एके दिवशी राज कपूरनी त्यांना आपल्या आर. के. स्टुडिओमध्ये भेटायला बोलवलं. राज कपूरचे जसे गीतकार शैलेन्द्रंशी मनाचे धागे जुळलेले असायचे तशीच त्या काळात लक्ष्मीकांत-प्यारेलालची केमिस्ट्री गीतकार आनंद बक्षींशी जुळलेली असायची. लक्ष्मीकांत-प्यारेलालनी म्हणूनच राज कपूरकडे जाताना त्या दिवशी गीतकार आनंद बक्षींना घेऊन जायचं ठरवलं.

- Advertisement -

लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि आनंद बक्षी आर. के. स्टुडिओमध्ये बोलवलेल्या वेळेत पोहोचले. त्यांना राज कपूरच्या ज्या रूममध्ये बसायला सांगितलं होतं त्या ठिकाणी राज कपूरची वाट पहात ते बसून राहिले. पण राज कपूर नावाच्या कलावंताची एक वेगळी दिनचर्या असायची. त्यांचा दिवस जरा उशिरा सुरू व्हायचा. त्यामुळे त्या दिवशीही लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि आनंद बक्षींनाही वाट पहात बसावं लागलं. कुणाचीही वाट पहात असताना कुणाचीही थोडी चुळबुळ सुरू होतेच. लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि आनंद बक्षींचीही तशीच चुळबुळ सुरू झाली. ते ज्या रूममध्ये बसले होते त्या रूमचा दरवाजा थोडा जरी करकरला तरी त्या तिघांना सावरून बसायला लागायचं. ह्या अशाच सावरण्यात-आवरण्यात बराच वेळ गेल्यानंतर त्या तिघांची आपापसात चेष्टामस्करी सुरू झाली. ते तिघं बसले होते ती रूम तशी बंदिस्त होती म्हणून आनंद बक्षी त्या बंदिस्तपणावर कोट्या करू लागले. ते लक्ष्मीकांत-प्यारेलालना म्हणाले, ह्या बंदिस्तपणावरही आमच्यासारख्या कवी-गीतकारांची प्रतिभा खुलू शकते, ती कशी काय बंदिस्त राहणार?

लक्ष्मीकांत-प्यारेलालनी आनंद बक्षींचं हे म्हणणं ऐकलं आणि गंमतीगंमतीतच छेडलं, आनंद बक्षींना म्हटलं, ‘मग एक काम करा की आता ह्या बंदिस्त रूममध्ये तुमच्या प्रतिभेचा फुलोरा फुलवून दाखवा बघू!’

आनंद बक्षींनीही लक्ष्मीकांत-प्यारेलालचं हे आव्हान मजेमजेत स्वीकारलं..आणि क्षणार्धात ते म्हणाले, ‘हम तुम एक कमरे में बंद हो, और चाबी खो जाय.’ हे शब्द उच्चारताच ते तिघंही हसू लागले आणि त्यांचा हा हास्यकल्लोळ सुरू असतानाच राज कपूरनी त्या रूमचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडला जाताच आनंद बक्षी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलालचा तो हास्यकल्लोळ एका क्षणात बंद झाला. राज कपूर हे सिनेमा इंडस्ट्रीतलं एक बडं प्रस्थ होतं. त्या नावाचा तो एक आदरार्थी दबाव होता. पण तरीही राज कपूरच्या कानावर तो हास्यकल्लोळ गेलाच होता आणि आनंद बक्षी काहीतरी म्हणाल्याचं त्यांच्या तिखट कानावर पडलं होतं.

त्यांनी त्या रूममध्ये येताच त्या तिघांना सॉरी वगैरे म्हणण्याचे उपचार पार पाडले, पण खुर्चीत बसल्या बसल्या ते म्हणाले, ‘आता हे आनंद बक्षी नेमकं काय म्हणाले? ते कोणत्या गाण्याची ओळ म्हणाले काय?’

राज कपूर हे शब्दात लय, ताल, रंग, रूप शोधणारे जातिवंत कलावंत होते. शब्दाशब्दांत आपल्याला भावणारे भाव हुडकण्याची कला त्या अवलियाच्या अंगी होती. आपण दारात प्रवेश करताक्षणी आनंद बक्षी काय म्हणाले हे त्यांना जाणून घ्यायचं होतं.

लक्ष्मीकांतनी राज कपूरच्या मनात काही वावगं येऊ नये म्हणून आधी राज कपूरकडे हे स्पष्ट केलं की आमची ह्या बंदिस्त रूमबाबतीत गंमतजंमत चालली होती. पण नंतर आनंद बक्षींनीच आपला संकोच बाजूला ठेवला आणि आपण काय म्हटलं ते स्पष्टच सांगून टाकलं.

आनंद बक्षी राज कपूरना म्हणाले, ‘राजसाहेब, आपल्या स्टुडिओतली ही रूम इतकी बंदिस्त, इतकी कडेकोट आहे की मी सहज म्हणालो – हम तुम एक कमरे में बंद हो…और चाबी खो जाय!…’

राज कपूरनी आनंद बक्षींच्या तोंडून ही ओळ ऐकली मात्र…आणि आनंद बक्षींची ती ओळ पूर्ण करत ते म्हणाले – ‘तेरे नैना के भुलभलय्या में बॉबी खो जाय.

आनंद बक्षी आणि राज कपूर ह्या दोघांच्या कल्पनांचा हा मिलाफ होऊन नंतर ‘बॉबी’ ह्या सिनेमातलं किती हिट गाणं झालं हे आजही सर्वांना माहीत आहे. त्या काळात गाणं कसं बोल बोलता व्हायचं त्याचा हा खास नमुना!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -