घरफिचर्सख्रिसमस केक्स

ख्रिसमस केक्स

Subscribe

आता मला कोणी फोन करून त्रास देणार नव्हतं. आता मला कोणी त्रास देत नाहीये. पण त्याचाच तर त्रास आहे! तीन वर्ष झाली. ख्रिसमसला केक येत नाही, फक्त केकची आठवण असते. मला कोणीच म्हणत नाही ‘वन फॉर यु अ‍ॅण्ड वॅन फॉर रेस्ट ऑफ द स्टाफ.’

पाच सात वर्षाचं मुल वेळकाळ न बघता फोन फिरवतं. आई किंवा बाबा ऑफिसच्या कामात मग्न असतात. कोणतीही महत्त्वाची मिटिंग किंवा समोर मोठं काम घेऊन बसलेला क्लायंट बसलेला असतो. मूल या सगळ्याच्या पलीकडे. ते आई किंवा बाबाला डायरेक्ट सांगायलाच घेतं ‘आज येताना अमुक गेम आण, शाळेत मला ऋतूने असं केलं, आजी माझं ऐकत नाही…काय आणि काय!

या टोकाचं माणूस सांगत असतं ‘बाळा आत्ता मी कामात आहे, थोड्या वेळात फोन करू का’ पण छे, तिकडच्या व्यक्तीला ते तेव्हाच सांगायचं असतं. कारण त्याच्या दृष्टीने मिटिंग किंवा क्लायंट नव्हे तर त्याची गोष्ट अधिक महत्त्वाची असते. ‘आत्ताच ऐकायचं’ मग कामाच्या वेळी पर्सनल फोन अटेंड न करण्याचा नियम पार मोडीत निघतो.
असाच फोन माझ्या नव्वद वर्षांच्या बाळाचा येतो. मी कोणत्याशा फिगर्स टॅली करण्याच्या गडबडीत किंवा एटीएममध्ये कॅश लोड करण्याच्या हिशेबात. कधी क्लिअरिंगची वेळ टळून चालणार नसतं. ‘स्मिता आर यु बिझी राइट नाऊ?’ ‘हो’ म्हणावं की ‘नाही’ म्हणावं? खरंतर उत्तर असतं ‘…….’ पण मी असं सांगू शकत नाही .

- Advertisement -

नेहमीप्रमाणे मी म्हणते ‘बोला’ गाडी खुशीत निघते! ‘यु नो स्मिता ……’ मग त्यांना डीए एरियर्स कसे कमी मिळाले, ते देवळालीला असताना काय गमतीजमती व्हायच्या वगैरे सुरु होतं. इकडे घड्याळाचा सरकता काटा मला घाबरवू लागलेला असतो. मग गुडघेदुखी कशी वाढलीये आणि हिवाळ्याच्या दिवसात कसा त्रास होतो ते येतं. ख्रिसमसला मोठी लेक इंडियात येणार आहे म्हणून खुशीचा कोवळा स्वर निघतो. दोन टेबल्सपलीकडचा कलीग घड्याळाकडे बोट दाखवत खुणेनेच म्हणतो ‘काय चाललंय .. किती वेळ?’

त्याला मी काय सांगणार असते!
हे प्रकरण थोडक्यात आटोपणारं नाही लक्षात येता शेवटी मी म्हणते ‘अंकल शल आय कॉल यु आफ्टर सॅम टाइम?’
‘ठीक आहे ठीक आहे, सॉरी. मी तुझा फार वेळ घेतला का गं?’ म्हणूनही पुढची पाच-सात मिनिटं गेलेली असतात. समोर अकौंट होल्डर खोळंबलेला. आपण कानकोंडे.

- Advertisement -

मी १९८४ साली बँकेत लागले. अधून-मधून पेन्शन सेक्शनला काम असे. एक तारीख म्हणजे आम्ही दोघेतिघे ‘वेडे’ बँकर्स दोन गाड्या आधीच्या पकडून कामाला सुरुवात करत असू. कारण पेंशनवाली मंडळी ऑफिसच्या वेळेआधीच येऊन थांबलेली असत. आम्हाला बघून त्यांच्या चेहर्‍यावर छान हसू फुलून येई. वास्तविक पेन्शन पोस्टिंग सुरु करून पैसे प्रत्यक्ष अकाऊंटला जमा होण्याच्या प्रक्रियेला तासभर तरी लागे. पण या मंडळींची त्यासाठीसुद्धा थांबायची तयारी असे .
पेन्शनमध्ये रेल्वे, बीएमसी आणि आणखी कुठली-कुठली पेन्शन असत. त्यातलंच एक नेव्ही पेन्शन. आणि या पेन्शन लिस्टमधलं एक नाव म्हणजे मिस्टर एंड्र्यू केस्टेलीनो वाझ. वय पासष्टच्या आसपास. (ही गोष्ट १९८४ च्या आसपासची ) तर मिस्टर वाझ. उंचापुरा बांधा. तेज नजर, अगदी कमी बोलणे. थोडक्या वेळात त्यांची माझी ओळख झाली. फार गप्पा नसत; पण नंतर तर ते आले की मला शोधत येत. बिनशब्दाचं काहीतरी बांधलं गेलं आमच्यामध्ये.

पुढे त्यांनी सोय म्हणून मुंबईच्या उपनगरातल्या ज्या शाखेत अकौंट ट्रान्सफर करून घेतले, योगायोगाने माझी लगेचच्याच वर्षी त्याच शाखेत बदली झाली. मला तिथे पाहून त्यांच्या डोळ्यात जी चमक आली ती मी आजही विसरू शकले नाही.
वर्ष सरत होती. वय वाढत होतं. आता ऐंशीवं वर्ष पार झालं. गुडघे आवाज करत होते. तरीही अंकल हट्टाने बँकेत येत. थेट माझ्या काऊंटरला. मग पैसे त्यांच्या हाती पडून, ढकलदार उघडून त्यांना निरोप देईपर्यंत पूर्ण जिम्मा माझा असे. मी कामात असले की ते शांतपणे माझं काम संपायची वाट बघत उभे राहत. मग माझं त्यांना खुणेनेच ‘बसा,आलेच’ म्हणून सांगणं. प्रत्येक ख्रिसमसला त्यांच्याकडून एवढाले दोन केक येत. ‘वन फॉर यु एन्ड वॅन फॉर रेस्ट ऑफ द स्टाफ’ हे शब्दात न पकडता येणारं काहीतरी तलम प्रकरण होतं! ‘वन फॉर यु अ‍ॅन्ड वॅन फॉर रेस्ट ऑफ द स्टाफ’ हे वाक्य मी स्वतःशीच म्हणून आणखी ‘प्राऊड’ वगैरे वाटून घेई.

प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी ‘स्मिता’ म्हणण्याची त्यांची मजेदार सवय होती.
कधी लेकीने दुबईहून आणलेला उंची परफ्युम, तर कधी नक्षीदार शोपीस येई. मला हे असे कोणाकडून काही घेणे अजिबात आवडत नाही. पण अंकल वाझ ‘कोणीतरी’ नव्हते. मी त्यांना नेहमी म्हणे, ‘या अशा वस्तू देऊ नका. फक्त तुमचे ब्लेसिंग्स द्या!’ त्यावर ते मस्त हसत…

वय अठ्ठ्याऐंशी पार. आता चालणे अवघड.
मी आता तिसर्‍याच शाखेत. पेन्शन ज्या-त्या शाखेत घेण्याचा नियम मोडत, खास माणूस पाठवून, डॉक्टर सर्टिफिकेट जोडून दोन्ही शाखांच्या मॅनेजर्सकडून स्पेशल परवानगी मिळवून, त्यांचा मुलगा ब्रांडन माझ्याकडे येऊ लागला. अंकलचे फोन येत, ’तू माझ्यासाठी किती करतेस, मी तुला किती ट्रबल करतो’ वगैरे, आणि मग त्याच त्या लहान मुलाच्या तक्रारी, ’तब्बेत अशी आहे तशी आहे’ वगैरे, कधी त्यांच्या जुन्या दिवसांच्या आठवणी.

ब्रांडनचा अधून-मधून मेसेज “डॅड तुझी फार आठवण काढत असतात.” म्हटलं ’यायचं आहे त्यांना भेटायला’.

मध्ये एकदा अंकल म्हणाले, “वयाची शंभरी झाली की पेन्शन दुप्पट होते.’
मी म्हंटलं ’मी नक्की देईन तुम्हाला हे दुप्पट झालेलं पेन्शन!’
फोनवरूनसुद्धा मला जाणवलं, की हे वाक्य ऐकून ते खूप प्रसन्न मोकळं हसत होते. मला ते म्हणणं खरंखुरं झालेलं बघायचं होतं.
’यायचं आहे …यायचं आहे ….’ म्हणत चार वर्षं निघून गेली.
ऑफिसच्या बर्‍याच कहाण्या त्यातल्या पात्रांसकट घरी ठाऊक असल्यामुळे घरचे म्हणू लागले ’तुझी कारणं ठेव बाजूला, आधी त्यांना भेटून ये’
… आणि एक दिवशी पहाटे-पहाटे फोनचा मेसेज टोन अभद्र गुरकला . ब्रांडनचा मेसेज – ’Daddy passed away today morning…!!’

पहिल्यांदा वाचलं. काही क्षण जावे लागलेअर्थ मेंदूपर्यंत पोचायला. पुन्हा वाचायला गेले. काही दिसेना. डोळ्यात साठलेल्या अश्रूंच्या समुद्रात शब्द सारवले गेले होते.
आता मला कोणी फोन करून त्रास देणार नव्हतं. आता मला कोणी त्रास देत नाहीये. पण त्याचाच तर त्रास आहे!
तीन वर्ष झाली. क्रिसमसला केक येत नाही, फक्त केकची आठवण असते. मला कोणीच म्हणत नाही ’वन फॉर यु एन्ड वॅन फॉर रेस्ट ऑफ द स्टाफ.’

प्रत्येक ख्रिसमसला मी दाराकडे डोळे लावून बसलेली असते. अंकल वाझ अगदी आसपास असतात…
मी ब्रांडनला फोन करते त्याच्या ’सायलेंट’ क्रिसमससाठी ग्रिटींग्ससाठी…


स्मिता गानू-जोगळेकर
(लेखिका बँकेत कार्यरत आहेत)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -