घरफिचर्सवैशिष्ठ्यपूर्ण विविधरंगी भेंडीबाजार

वैशिष्ठ्यपूर्ण विविधरंगी भेंडीबाजार

Subscribe

मुंबईतील प्रत्येक बाजाराची स्वतंत्र ओळख आहे. तिथे मिळणार्‍या वस्तू, विक्रेते, दुकानांची रचना या बाजारची वैशिष्ठ्ये म्हणून गणली जातात. असाच एक परिसर म्हणजे भेंडी बाजार. तसा हा बाजार कपड्यांपासून सौंदर्य प्रसाधनांपर्यंतच्या अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. पण मुस्लीम समुदायातील कपडे, अलंकार, साहित्य इतकेच काय, खाद्यपदार्थ जाणून घेण्यासाठी हे मुंबईतील महत्त्वाचे ठिकाण ठरते.

क्रॉफर्ड मार्केटच्या मागील बाजूला असल्याने ब्रिटिश काळात ज्या परिसराला ‘बिहाइंड द बाजार’ असे संबोधले जात असे, तोच परिसर पुढे नावाचा अपभ्रंश होत ‘भेंडीबाजार’ बनला असे म्हटले जाते. काहींच्या मते या भागात भेंडीची शेती होत असे म्हणून त्याला हे नाव पडले. सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास असलेला हा परिसर तसा रहिवासी असला तरी रस्त्यांच्या कडेला असलेल्या प्रत्येक इमारतीच्या तळमजल्यावर सजलेली दुकाने पाहता आपण मोठ्या बाजारपेठेतच आल्याची जाणीव होते.

मुस्लीम संस्कृतीचे खाद्य, वस्त्र, अलंकार अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध असल्याने भेंडी बाजारात या समाजाच्या मंडळींचा राबता अधिक असतो. ईदसारख्या सणाच्या आधी मुंबईसह आसपासच्या शहरांतील मुस्लीम कुटुंबे या बाजारात खरेदीसाठी येतात. सुरुवातीला या भागात खोजा व बोहरा समाजातील लोकांची वस्ती होती. त्यावेळी गहू, तांदूळ या धान्याचा घाऊक बाजार चालविला जात होता. मात्र बाजाराचा आवाका वाढत गेल्याने सध्या या भागात प्रामुख्याने मुस्लीम समाजातील महिलांचा बुरखा, पुरुषांची टोपी, मफलर या वस्तू मिळतात. बुरख्यातही विविध नक्षीकाम केले जात असल्याने या परिसरात काही ठिकाणी बुरख्यावर नक्षीकाम करणारे कारागीर आहेत. तर काही माल उत्तर प्रदेशातून मागविला जातो. याशिवाय चपला, भांडी, लहान मुलांचे कपडे, महिलांचे कपडे यांच्या वेगवेगळ्या गल्ल्या आहेत. त्या गल्ल्यांमध्ये अधिकतर मुस्लीम महिलांना पसंतीस पडणारे कपडे पाहावयास मिळतात. भडक रंग, चंदेरी-सोनेरी नक्षीकाम असलेला घेरदार लेहंगा हे या बाजाराचे वैशिष्ठ्य त्यामुळे मुस्लीम महिलांची लग्नसमारंभाची खरेदी याच बाजारातून होते.

- Advertisement -

या बाजारात जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे उर्दू साहित्य, उर्दू साहित्याचा अभ्यास करणार्‍या मंडळींना या बाजारात हवे असलेले पुस्तक हमखास मिळते. या बाजारात अशी १५-२० दुकाने आहेत. तेथे उर्दू गझलांपासून कादंबर्‍यांपर्यंतची अनेक पुस्तके मिळतात. उर्दू ही भाषा गझल आणि शेर यांसाठी अधिक लोकप्रिय असल्याने अन्य भाषिकही येथे पुस्तके खरेदी करण्यासाठी येत असतात.

मुस्लीम समाजच नव्हे तर अन्य समाजाच्या लोकांना येथे खेचून आणणारी आणखी एक गोष्ट म्हणजे येथील खाद्यपदार्थाची दुकाने. मोहम्मद अली रोडवरील हॉटेलांमध्ये मिळणारे मोगलाई पदार्थ खाण्यासाठी दूरवरून खवय्ये येत असतात. येथे पूर्वीच्या काळी वझिरा नावाचे प्रसिद्ध कॅफे होते. तेथे नौशाद अली, गुलजार, जावेद अख्तर यांच्या मैफली रंगत, असे स्थानिक सांगतात. या संपूर्ण बाजारात हजारभर दुकाने असून हॉटेलांची संख्याच ५००च्या घरात आहे. एकीकडे मोठमोठे मॉल्स उभारले जात असताना दोनशे वर्षांपासून सुरू असलेल्या या बाजारात आजही विक्रेते हाळ्या देत ग्राहकांना बोलावत असतात. पारंपरिक बाजाराबद्दल असलेली ओढ आजच्या तरुण पिढीलाही खुणावते हे भेंडी बाजाराचे विशेष.गेल्या वर्षी या भागात भेंडी बाजार संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

आज भेंडी बाजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी या केंद्राचे प्रमुख झुबेर आझमी काम करीत आहेत. भेंडी बाजार हा केवळ बाजार नाही. या परिसराने देशाच्या लोकसंस्कृतीला अनेक गोष्टी दिल्या आहेत, असे आझमी म्हणतात. ‘खटिया खडी करना। हा वाक्प्रचार या बाजारातील लोकांच्या तोंडून सर्वप्रथम आल्याचे त्यांच्या संशोधनातून पुढे आले आहे. अशा अनेक गोष्टी आणखीही उजेडात येतील, असे ते म्हणतात.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -