घरफिचर्सकरोना, भारत आणि जग

करोना, भारत आणि जग

Subscribe

करोनाच्या विरोधात अवघ्या जगातील छोटे मोठे सर्वच देश संघर्ष करत आहेत, मात्र यामुळे अर्थव्यवस्था थांबवण्याची हिंमत अमेरिकेसह ब्रिटन, इटली या देशांनी केली नाही, लोकांचा मृत्यू झाला तरी चालेल; पण संपूर्ण देशात लॉकडाऊन करायचा नाही, अशी भूमिका या देशांनी घेतली, याउलट भारताने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ देशातील एका राज्यात किंवा शहरात लॉकडाऊन जाहीर केला नाही तर संपूर्ण देश बंद ठेवला, जान है तो जहान है, लोकांचे प्राण वाचले पाहिजेत, अशी भूमिका घेतल्याने भारतात करोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे, त्यामुळेच जगभरात भारताचे कौतुक होत आहे.

भारत करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. दोन दिवसांपूर्वी स्वित्झर्लंडने आल्प्स् पर्वतरांगांमधील १४ हजार फूट उंच पर्वतावर लेझर किरणांद्वारे भारताचा नकाशा तिरंग्याच्या रंगात दाखवून भारताला अनोखी मानवंदना दिली. भारत देशांतर्गत करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करण्यासमवेत जगातील अनेक देशांना औषधांचाही पुरवठा करत आहे. भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा जगातील १३ देशांना केला आहे. अमेरिका, ब्राझिल, इस्रायल या देशांनी भारताने संकटकाळात केलेल्या सहाय्याविषयी आभार मानले आहेत. अमेरिका, इंग्लंड ते युगांडापर्यंतच्या ५५ देशांना भारत हे औषध पुरवणार आहे. भारत हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा सर्वांत मोठा उत्पादक देश आहे आणि प्रतिवर्षी ५०० कोटी रुपयांच्या औषधाची निर्यात केली जाते. जगातील हायड्रोक्सीक्लोरोक्वीन उत्पादनापैकी एकट्या भारताचा वाटा ७० टक्के आहे.

करोनाच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील अनेक देशांशी संपर्क साधला आणि या लढ्यात त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. मार्चमध्ये पंतप्रधान मोदी यांनी दक्षिण आशियाई सहकार संघटना (सार्क) देशांसाठी कोरोना विषाणूच्या संकटाविरुद्ध निधीची घोषणा केली आणि १० लाख डॉलर्स देण्याचे घोषित केले. काश्मीरविषयी पाकिस्तानला उघडपणे समर्थन करणारे तुर्कस्तान आणि मलेशिया यांनीही भारताला हे औषध पाठवण्याची विनंती केली आहे. दोन्ही देशांशी भारताचे मुत्सद्दी संबंध काही काळासाठी तणावपूर्ण बनले होते. कदाचित यापुढे दोन्ही देश पाकची बाजू घेऊ शकणार नाहीत; मात्र मानवतेच्या दृष्टीने भारताने त्यांना साहाय्य केले आहे. भारताच्या या प्रयत्नांमुळे जगातील भारताचे स्थानही बळकट होत चालले आहे. चीन जगात सर्वांत अधिक श्वसनयंत्रे आणि ‘पी.पी.ई. किट्स’ बनवतो, तर भारत सर्वांत अधिक प्रमाणात स्वस्त अशी ‘जेनेरिक’ औषधे बनवतो. मागील काही वर्षांमध्ये भारताने सर्वांत स्वस्त औषधे बनवून ती जगाला निर्यात केली आहेत. त्यामुळे जगभरात कमी खर्चात लोकांवर उपचार होत आहेत. भारत नेहमी गरजूंना सहाय्य करत आला आहे. एच.आय.व्ही. सारख्या आजाराविरुद्ध आफ्रिकेला औषधे पाठवून लाखो लोकांचा जीव भारताने वाचवला आहे. भारत पैसा कमावण्यासाठी नव्हे, तर जगाला सहाय्य होण्याच्या दृष्टीने कृती करतो, हे जगाला आता अवगत होत आहे.

- Advertisement -

करोना विषाणूचा संसर्ग जगभर होऊ लागल्यावर विदेशातील एका विचारवंताने ‘भारत या विषाणूचा सामना कसा करतो, हेच मला पहायचे आहे’, असे कुत्सितपणे वक्तव्य केले होते. ‘बीबीसी’ने भारताच्या उपाययोजनांवर उपहासात्मक व्यंगचित्र दाखवून भारताचा अवमान केला होता. अशा परिस्थितीतही भारताने उपलब्ध साधनसामुग्री आणि योग्य निर्णय घेत बर्‍यापैकी करोनावर नियंत्रण मिळवले होते; मात्र एक दुर्घटना म्हणा की षड्यंत्र म्हणा तबलिगी जमातचा कार्यक्रम झाला अन् देशभर करोनाचा अतिवेगाने संसर्ग झाला. जेथे या आजाराचे नावही नव्हते, त्या राज्यांमध्ये अनेक पटींनी बाधितांची संख्या वाढली. तरीही ही साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा लढा देत आहे. भारताला नावे ठेवणार्‍यांच्या डोळ्यांमध्ये भारतावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अनेक देशांकडून होत असलेल्या कौतुकाच्या वर्षावाद्वारे अंजनच घातले गेले आहे. एवढेच कशाला भारताविरुद्ध आतंकवादाचा एककलमी कार्यक्रम राबवणारा पाकही भिकेचा कटोरा घेऊन भारताकडे औषधांचे सहाय्य मागत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेतील काही संघटना आणि संयुक्त राष्ट्रे भारताला ‘कट्टरतावाद रोखा’, असे आवाहन करत आहेत. ‘जणूकाही भारतातील बहुसंख्य कट्टरतावादी असून तो अल्पसंख्याक असलेल्या अन्य धर्मियांना त्रास देत आहे’, असे चित्र निर्माण केले जात आहे. विशेषत: अमेरिकेतील धार्मिक स्वातंत्र्य आयोग असे दिशाभूल करणारे, खोट्यानाट्या माहितीवर आधारित अहवाल तयार करण्यात आघाडीवर असतो. अगदी तबलिगी प्रकरणातही काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी यानिमित्ताने ‘इस्लामोफोबिया’ निर्माण करण्यात येत असल्याचे सांगत भारतावर टीका केली. भारताने प्राचीन काळापासून सहिष्णुतेचा परिचय दिलेला आहे. जगात ज्यूंना कोणी आश्रय देत नसताना भारताने त्यांना आश्रय दिला आहे. तसेच इराणमधून धर्मांधांनी पारशांचा वंशविच्छेद करून त्यांना त्यांच्याच देशातून पिटाळून लावल्यावर भारताने आश्रय दिला होता. असे असूनही भारतात बहुसंख्याकांना कट्टरतावादी ठरवणे, हीच मुळी असहिष्णुता आहे.

- Advertisement -

संपूर्ण जग भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून पहाते. जगात लोकसंख्येत भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारतात गरीब, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत ते अतीश्रीमंत असे विविध उत्पन्नाचे गट अस्तित्वात आहेत. त्यामुळे जगातील विकसित आणि अविकसित देशांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी आणि नफा कमावण्यासाठी भारत एक चांगले माध्यम वाटतो. भारतानेही मुक्त बाजारपेठ म्हणून इतरांनाही येथे उत्पादने विकण्यासाठी मुभा दिली आहे. शेजारील देश चीनची अनेक मोबाईल कंपन्याने भारतात येऊन बक्कळ पैसा कमावत आहेत. असे असूनही चीन सीमावादापासून अनेक गोष्टींमध्ये भारताला डोळे वटारून दाखवत आहे. पाकिस्तान विनाकारण संयुक्त राष्ट्रांमध्ये काश्मीरचा प्रश्न उपस्थित करत आहे. याविषयी खरे तर आंतरराष्ट्रीय समुदायाने मानवता दाखवत भारताचे समर्थन करण्याचा आणि भारताने केलेल्या उपकारांची परतफेड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हेच खरे !

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -